Saturday, July 25, 2009

चिमटे, कोपरखळ्या आणि मैत्रीची ग्वाही...!"

ंमुंबई, ता. 27 : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे एकमेकांचे राजकीय विरोधक. ते एका व्यासपीठावर आले की त्यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगते. राज्याच्या सीमा ओलांडून दिल्लीच्या तख्तावर दाखल झालेल्या या दोन्ही प्रभृती आज घरच्या व्यासपीठावर एकत्र आल्यावर त्यांच्यातील जुगलबंदीला उधाण आले आणि त्यातच पार पडला, मराठवाडा विकास मंचातर्फे यशवंत नाट्यमंदिरात आयोजित पुरस्कार सोहळा. मंचाच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना "मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन आज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकमेकांना चिमटे काढीत, एकमेकांच्या टोप्या उडवितानाच दोघांनीही आपण राजकीय विरोधक असलो तरी एकमेकांचे मित्र असल्याची ग्वाही यानिमित्त दिली. स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल आणि श्रीफळ असे मुंडे यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप होते. विलासराव देशमुख यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. "मराठवाडा गौरव' पुरस्काराने पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, उद्योजक बी. बी. ठोंबरे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क खात्याच्या संचालिका श्रद्धा बेलसरे-खारकर, "चिंतामणी ज्वेलर्स'चे अरुण कायगावकर, हिमालयाची मोहीम सर करणारा प्रमोद राठोड, दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेली शिल्पा हिरेमठ आणि "सारेगमप' लिटील चॅम्पची विजेती कार्तिकी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंनी हा सत्कार सोहळा आयोजित केला असला, तरी आरक्षणाची वा पक्षीय वादाची झालर सोहळ्यात नव्हती.सत्काराला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांनी, आपल्या आईनेच केलेला हा सत्कार असल्याचे नमूद केले. ""ज्या ज्योतिषाला मी हात दाखवला त्याने मला केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. आपण केंद्रात गेलो तर विलासराव तेथेही पोहोचले. ते आता राज्यात नसल्यामुळे राज्यात परतायला हवे,'' असे मुंडे आधीच्या वक्‍त्यांच्या भाषणातील धागा पकडून म्हणाले. त्यावर आपल्या भाषणात विलासरावांनी, मुंडे यांनी आपला ज्योतिष बदलावा, असा सल्ला त्यांना दिला. ""मराठवाड्याच्या जनतेने आपल्याला प्रचंड मताने दिल्लीत पाठवले आहे. तेव्हा त्यांचा मान राखा, तेथेच राहा. भाजपमधील घडामोडी पाहता तुमची तिथे गरज आहे. येथे येऊनही काही फायदा नाही. सहा महिन्यांत स्थिती बदलणार नाही,'' अशी कोपरखळीही त्यांनी मारली. "गरज पडली तर मी आहे. मी अजून विधानसभेचाच सदस्य आहे,' असे सांगायलाही विलासराव विसरले नाहीत. त्यांच्या या विधानानंतर सभागृह हास्यकाल्लोळात बुडाले. "मुंडे यांना दीर्घायुष्य लाभो! विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द बहरत राहो' अशा शब्दांत विलासरावांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बऱ्याच वक्‍त्यांनी विलासरावांचा उल्लेख आपल्या भाषणात "जड खात्याचे मंत्री' असा केला. तो धागा पकडत मुंडेंनी विलासरावांची फिरकी घेतली. "सोनियांची भेट घेऊन आपण यांचे खाते बदला' असे त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नाही. आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास आपला पाठिंबा असल्याचे मुंडेंनी या वेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांवर टीकाकार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण ऐनवेळी न आल्याने विनायक मराठवाडा लोकमंचाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी त्यांच्यावर टीका केली. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे काम चव्हाण यांनी करावे, असा सल्ला त्यांनी दिला. विलासराव देशमुख यांनीही आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांना कोपरखळी लगावली.............

ब्रिटिशकालीन "वॉटर हायड्रण्ट' सध्या धूळ खात पडले

योगेश पवार : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : शहरात आपत्कालीन स्थितीत अत्यंत उपयोगी ठरणारे ब्रिटिशकालीन "वॉटर हायड्रण्ट' सध्या धूळ खात पडले आहेत. बहुतांशी वॉटर हायड्रण्ट रस्ता रुंदीकरणामुळे जमिनीत गाडले गेले असून, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दलाला घटनास्थळी पोचण्यासाठी बराच वेळ जातो. शहरातील काही भाग आता विकासामुळे व नव्या बांधकामांमुळे अरुंद आणि चिंचोळे झाले आहेत. झोपडपट्टी भागात आग लागल्यास तिथपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे तत्काळ आग आटोक्‍यात आणणे सहज शक्‍य होत नाही. वांद्रे येथील बेहरामपाड्यात नुकत्याच लागलेल्या आगीनंतर प्रकर्षाने ही गोष्ट पुढे आली. आग विझविण्यासाठी पाणी तत्काळ उपलब्ध व्हावे यासाठी ब्रिटिशांनी जमिनीखालील जलवाहिनीला जोडलेले "वॉटर हायड्रण्ट (पाण्याचे खांब) शहरातील मोक्‍याच्या जागी, रस्त्यालगत जागोजागी उभारले होते. ब्रिटिशांनंतर महापालिकेने ही यंत्रणा स्वीकारली खरी; मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची पूर्णतः वाताहत झाली आहे. काही वॉटर हायड्रण्ट मोडले आहेत. काही रस्त्याच्या आणि पदपथांच्या कामात जमिनीत गाडले गेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत यातून पाणी उपलब्ध होऊ शकत नाही; शिवाय अत्यंत हलगर्जीपणे ते जमिनीत गाडल्याने ते पदपथावर अडथळा बनले आहेत.सर्व्हे करण्याची मागणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत आता आवाज उठविला असून, मनसेचे प्रभाग संघटक मिलिंद पांचाळ यांनी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे "वॉटर हायड्रण्ट'चा सर्व्हे करावा आणि ते पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख टी. डी. करगोप्पीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वॉटर हायड्रण्टचा सध्या वापर होत नसल्याचे सांगितले. शहरात मोठी आग लागल्यास ती विझविण्यासाठी वॉटर हायड्रण्टद्वारे पाणी घेतले जात असे. मोक्‍याच्या जागी असणाऱ्या वॉटर हायड्रण्टमुळे आग विझविण्यासाठी मोठी मदत होत असे. पूर्वी यामध्ये सातत्याने पाणी असायचे; मात्र कालांतराने अन्य पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी कबूल केले."वॉटर हायड्रण्ट' जुन्या जलवाहिनीला जोडण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करायचा झाल्यास जलवाहिनी कार्यरत करावी लागेल, असे करगोप्पीकर यांनी स्पष्ट केले. हे "वॉटर हायड्रण्ट'चे पुनरुज्जीवन होणार काय, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे...............................

रामदास आठवले नव्या भिडूंच्या शोधात

योगेश पवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 4 : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले नव्या भिडूंच्या शोधात आहेत. आठवलेंच्या समोर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणे, डाव्यांच्या सेक्‍युलर आघाडीशी सलगी करणे किंवा रिपब्लिकन गटांचे ऐक्‍य घडवून आणणे, असे पर्याय असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे अन्य नेतेही ऐक्‍याची भाषा बोलत असल्याने आगामी काळात हे गट एकत्र येण्याची शक्‍यता आहे.कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपल्याला पराभूत केले, अशी भावना झालेले आठवले सध्या दोन्ही कॉंग्रेसवर खट्टू आहेत. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी दोन्ही कॉंग्रेसशी काडीमोड घेऊन शिवसेना- भाजपशी युती करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आठवले युतीच्या तंबूत जाणार, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिवसेना-भाजप किंवा "मनसे'बरोबर जाणार नसल्याचा निर्वाळा दिला. कार्यकर्त्यांचा युतीसोबत जाण्याचा आग्रह असला, तरी तो आता मावळल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनवणे यांनी पक्षाची भूमिका धर्मनिरपेक्ष असल्याने आपण शिवसेना-भाजपबरोबर जाण्याचा प्रश्‍न येत नसल्याचे सांगितले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप या पक्षांच्या व्यतिरिक्त एखादी सेक्‍युलर आघाडी स्थापन करण्याचा विचार सुरू असून, रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे ऐक्‍य घडवून आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार्य करण्यास तयार नसेल, तर स्वबळावर निवडणूक लढू, पक्षाची ताकद आजमावू, असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. सध्या पक्षाच्या विविध ठिकाणी बैठका सुरू असून, कार्यकर्त्यांची मते जाणून निर्णय घेतले जात आहेत, असे सोनवणे यांनी सांगितले.प्रा. कवाडेंचा ऐक्‍यासाठी पुढाकारपीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी, रिपब्लिकन ऐक्‍याची गरज असून, यासाठी आपण प्रत्येक गटाच्या नेत्याची भेट घेऊन ऐक्‍यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. ऐक्‍य झाले नाही, तर स्वतःच्या गटाचे अस्तित्व कायम ठेवून सामुदायिकरीत्या रिपब्लिकन गटांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेक्‍युलर म्हणविणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस जर पुण्यात शिवसेनेशी युती करीत असेल, तर त्या पक्षाशी आठवलेंची मैत्री सेक्‍युलर कशी समजायची, असा सवाल त्यांनी केला. युती सोबत न जाण्याचा आठवलेंचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचे ते म्हणाले. जिथे आठवले तेथे भारिप नाहीरामदास आठवले ज्या आघाडीत असतील तेथे आपण जाणार नाही, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाने स्पष्ट केली आहे. आठवले जातील तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध असतो. त्यामुळे आठवलेप्रणीत आघाडीत जाऊन आम्ही आमच्या पायावर राजकीय धोंडा मारणार नाही, असे भारिपचे प्रवक्ते बाबूराव पोटभरे यांनी सांगितले. रिपब्लिकन (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते टी. एम. कांबळे यांनीदेखील रिपब्लिकन ऐक्‍याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

-----------------

ममतांकडूनही "समता' नाही

योगेश पवार

रेल्वे बजेट : मुंबई, महाराष्ट्राच्या अपेक्षा फोल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 3 : मुंबई उपनगरी रेल्वेच्या रखडलेल्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी निधी मिळेल, अशी अपेक्षा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून असताना त्यांनी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेतून अब्जावधी रुपयांचा महसूल मिळत असताना या सेवेबाबत रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक शब्दही न उच्चारल्याने मुंबईसह राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईला नेहमीच सावत्र वागणूक दिली गेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील उपनगरी रेल्वे सेवा अन्य राज्यांच्या तुलनेत त्यामुळे उपेक्षित राहिली. ममतांच्या कारकिर्दीत तरी महाराष्ट्राला समान वागणूक मिळेल, अशी आशा होती; पण आज तीही फोल ठरली. वाजपेयी सरकारच्या काळात मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. चार हजार 174 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध योजना एमयूटीपी-1 योजनेंतर्गत 2006 पर्यंत पूर्ण करावयाच्या होत्या; मात्र मार्च 2009 पर्यंत दोन हजार 800 कोटी रुपयेच या प्रकल्पावर खर्च झाले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी एक हजार 374 कोटी रुपयांची गरज आहे."एमयूटीपी-2' प्रकल्पात पाच हजार 300 कोटी रुपयांच्या योजना आहेत. या प्रकल्पाला मान्यताही देण्यात आली आहे; मात्र त्यावर प्रत्यक्षात 31 मार्चअखेर अवघे 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी अजून एक हजार 700 कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वे अर्थसंकल्पात ही तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली. विरार-डहाणू रोड मार्गाचे रुंदीकरण प्रलंबित आहे. 12 डब्यांच्या नव्या अत्याधुनिक 129 गाड्यांपैकी आणकी 78 गाड्या दाखल व्हायच्या आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आमूलाग्र बदलाची गरज आहे. मुंबईत लोकल गाड्यांना सकाळी व सायंकाळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्‍चिम व मध्य रेल्वेमार्गावर आणखी महिला विशेष गाड्या सुरू करण्याची गरज आहे. मुंबईची तशी मागणी असताना रेल्वेमंत्र्यांनी चेन्नई व कोलकत्ता येथे महिला विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. गेल्या दोन अर्थसंकल्पांत द्वितीय श्रेणीचे भाडे कमी करण्यात आले; परंतु यातून मुंबई उपनगरी रेल्वे सेवेला मात्र वगळण्यात आले. ममतांच्या अर्थसंकल्पामध्येही हा अन्याय दूर झालेला नाही. महाराष्ट्राच्या अन्य भागांसाठीही काही देण्यात आलेले नाही. एकंदरीत रेल्वेमंत्र्यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आदी रेल्वेस्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा दिलासादायक आहे. नाशिकमध्येही नाराजीनाशिक-मुंबई अशा दोन गाड्या सुरू कराव्यात, इगतपुरी-भुसावळ शटल सेवा सुरू करावी, अशा नाशिककरांची मागण्या होत्या; त्याही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. धुळे-इंदूर मार्गाचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. धुळे-चाळीसगाव-मुंबई गाडी सुरू करावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलने होत होती. त्यामुळे अर्थसंकल्पात या मागणीचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती; ती फोल ठरली आहे. औरंगाबादच्या पदरातही रेल्वेमंत्र्यांनी निराशाच घातली आहे. बीड-नगर रेल्वेमार्ग, नांदेड-मुंबई अशी नवी रेल्वेगाडी सुरू करावी, उत्तर भारताला जोडण्यासाठी नांदेडहून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात आदी मागण्या होत्या; मात्र या साऱ्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने मराठवाडाही नाराज आहे. हैदराबाद-उस्मानाबाद ही गाडी पुण्यापर्यंत चालविण्याचा निर्णय समाधानकारक आहे.पश्‍चिम महाराष्ट्राला दिलासापश्‍चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे. बेंगळूरु-हुबळी-सोलापूर आणि पुणे-दौंड-सोलापूर या गाड्या सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे; तर सोलापूर-हैदराबाद गाडी सुरू करण्याची मागणी मंजूर झालेली नाही. रेल्वे डबे बनविण्याच्या कुर्डुवाडी येथील कारखान्याला 250 कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अर्थसंकल्प संतापजनकमाजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक व संतापजनक असल्याची जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बजेट तयार करण्यापूर्वी आपण ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन मुंबईच्या समस्या मांडल्या होत्या; मात्र महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.रेल्वेच्या जागा विकसित करण्याची घोषणा प्रत्येक अर्थसंकल्पात केली जाते. माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनीही तशी घोषणा केली होती; मात्र ती कागदावरच राहिल्याची टीका नाईक यांनी केली. वांद्रे येथील जागा पडून असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. संसदेत चर्चेदरम्यान अर्थसंकल्पात दुरुस्ती करावी आणि मुंबईसाठी निधी द्यावा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

....

रखडलेले प्रकल्प आवश्‍यक निधी

मुंबईतील एमयूटीपी प्रकल्प-1 - एक हजार 374 कोटी

एमयूटीपी प्रकल्प-2 - एक हजार 700 कोटी

नवीन रेल्वेगाड्यांच्या खरेदीसाठी - एक हजार 751कोटी

सोलापूर-कुर्डुवाडी रेल्वे डबा कारखाना - 250 कोटी

ये रे घना ये रे घना...

ये रे घना ये रे घना...
माझ्या घराच्या खिडकीतून तो वाऱ्याबरोबर आत शिरतो म्हणून मी कधिचा खिडकीला प्लास्टिकचा कागद लावून ठेवला. आमच्या घराशेजारील दत्ताच्या मंदिरातही तो असाच अवचित घुसतो आणि जलाभिषेक करून जातो. दरवर्षीचा त्याचा हा नित्यक्रम. म्हणून पुजाऱ्यानेही त्या जागेवर मेन कापड लावून ठेवलेय. तू असा, साऱ्यांना त्रास देतोस खरा पण तू अगदी अवचित पावलांनी यावं आणि आमच्यासह झाडं, वेली, प्राणी अगदी सिमेंटच्या इमारतींनाही चिंब भिजवून टाकावेस असं वाटतं. म्हणूनच तुझी आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहतोय. होय अगदी अधीर झाले आहेत आम्ही तुझ्या आगमनासाठी. तू केव्हा येतोस? त्या वेध शाळेवाल्यांनी तुझ्या आगमनाची वर्दी दिलीय पण तू तुझ्या सवयीप्रमाणे त्यांना हुलकावणी दिलीसच. वेधशाळेला चकविण्यात आणि त्यांची हुर्ये उडविण्यात तुझा हातखंडाच आहे म्हणा. असो पण तुझं काय झालंय ? का रुसला आहेस ? गेले काही वर्षे अगदी मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अचानक हजर व्हायचास. आणि बेसावध असणाऱ्या नवरा, नवरीला मांडवात लग्न लागत असतानाच चिंब भिजवून काढायचा. पाऊस आला पाऊस आला म्हणत मग व्हराडाची एकच धावपळ उडायची. लोक तुझ्या नावाने बोटं मोडत. पण दुसरीकडे भीषण पाणी टंचाईने होरपळलेले असल्याने तुझ्या आगमनासरशी ते सुखावून जात. त्यांचा तो राग अगदीच लटका आणि तात्पुरता असायचा. ते तुलाही माहीत आहे. मग तू का रागावलायस ? अजून तुझा साधा शिडकावाही नाही किंवा तुझ्या येण्याची खबर देणारा वळीवाचा पाऊसही आला नाही. काय चुकले आमचे? आम्ही निसर्गावर केलेल्या आक्रमणाची शिक्षा तू आम्हाला देतोस? कदाचित तसेच असेल. आम्ही बेभान झालोय. निसर्गाच्या चक्रातील आम्ही एक़ इवलासा घटक आहोत हे विसरलो आहोत. बुद्धीच्या जोरावर निसर्गचक्रात ढवळाढवळ करून ते बिघडविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कदाचित सारे विस्कळित झाले असावे. माफ कर आम्हाला. तू खरच आता धुवाधार बरस. फार अंत पाहू नको रे आमचा. गोठ्यातील जनावरेही पाठीवर तुषारांचा शिडकावा व्हावा म्हणून आसुसली आहेत. एव्हाना "जोत' शेतात फिरत असते. शेतकरी कुटुंबासह क्षणभर विश्रांतीसाठी बांधावर बसून भाकरीचा तुकडा मोडायचा. पण हे सारे थांबलेय तुझ्यासाठी . गावातील घरांना गवताची झडी बांधून पूर्ण झाली आहे. पावसाळी जळणासाठी लागणारे सर्पन घरात भरून झालेय. शेतमळ्या स्वच्छ करून झाल्या आहेत. विहिरीचा कोरडा तळ साफ करून ठेवला आहे. तुझ्या आगमनाने काळ्या कातळाला पाझर फुटेल. विहीर काठोकाठ भरून जाईल. खरं म्हणजे एव्हाना ती भरायला हवी होती. पण तू रुसला आहेस ना. विहिरीच्या काठच वडाच भलं मोठं झाड आणि त्यावर बसणारे पक्षी चातकाप्रमाणे तुझी आळवणी करीत आहेत. त्यांची तरी किमान पर्वा कर. ंबईत तू कोसळलास की, जागो जागी पाणी तुंबत. रेल्वे रस्ते जाम होतात. अशा वेळी तुझी चीड येते. पण खरं सांगू ती तेवढ्यापुरतीच. म्हणूनच 26 जुलैच्या भयंकर प्रलयानंतरही मुंबईकर तुझी तेवढ्याच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अगदी सिमेंटच्या इमरतींही क्षणभर शिडकाव्यासाठी कासावीस झाल्या आहेत. मग कधी येतोस...
.....योगेश पवार

मान्सून आला तरी "तहान' कायम!

मान्सून आला तरी "तहान' कायम!

टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या झाली दुप्पट

योगेश पवार ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 26 : मान्सूनचा पाऊस दाखल झाला असला तरी राज्यातील पाणीटंचाईने सरकार आणि जनतेच्या नाकीनऊ आणले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या गतवर्षाच्या तुलनेत जूनअखेरपर्यंत दुप्पट असून, या आठवड्याअखेरीस राज्यातील दोन हजार 467 गावे आणि दोन हजार 884 वाड्यांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त भागाची तहान भागविण्यासाठी हजारो टॅंकर्स युद्धपातळीवर कार्यरत असून, तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत 55 कोटी 49 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यातील मराठवाडा व कोकण विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मान्सून दाखल झाला असला तरी चालू आठवड्याच्या अखेरीस दोन हजार 467 गावे आणि दोन हजार 884 वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत या आठवड्यात 100 गावांची आणि तीन वाड्यांची भर पडली आहे. विशेषतः औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांतील 965 गावे आणि 509 वाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 530 गावे व 1043 वाड्या तहानलेल्या आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर येथील 122 गावे, 308 वाड्या आणि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील 208 गावे, 910 वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 423 गावे आणि 24 वाड्यांत तर नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीटंचाई कमी आहे. टंचाईग्रस्त भागांना दोन हजार 119 टॅंकर व 44 बैलगाड्या अहोरात्र पाणीपुरवठा करीत आहेत.गतवर्षी 21 जूनअखेरीस एक हजार 548 गावे आणि 1036 वाड्यांमध्ये पाणीटंचाई हाती. या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाईची होरपळ वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या दुप्पट झाली आहे. मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला असला तरी काही भागांत तो अद्यापही कागदावरच आहे. तलाव क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईचा आलेख वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.राज्यातील पाणीटंचाई 30 जूनअखेरपर्यंत राहील, असे गृहीत धरलेले असते; मात्र या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्याने पाणीटंचाई जुलैअखेरपर्यंत टिकण्याची शक्‍यता असल्याचे मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.

.इन्फोबॉकस

पाणीपुरवठ्यासाठी झालेला खर्च (कोटीमध्ये) मराठवाडा - 12.97

अमरावती - 18.35

नागपूर - 6.27

कोकण - 5.63

नाशिक - 4.12

पुणे - 8.16

शाळेभोवती तळे साचून बच्चेकंपनीला सुट्टी!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 8 : सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, अशी आपल्या बोबड्या शब्दांत भोलानाथाकडे विचारणा करणाऱ्या बच्चेकंपनीच्या शाळेभोवती आज खरेच तळे साचले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सुट्टीचे गिफ्ट मिळाले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने शाळा भरल्या नाहीत. तर काही शाळा तत्काळ सोडण्यात आल्या. त्यामुळे शाळेच्या वाटेवर रस्त्यात साचलेल्या पाण्यातून दंगामस्ती करीत घराकडे जाताना विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला पुन्हा एकदा जलमय केले. दक्षिण मुंबईत जागोजागी पाणी साचले होते. वडाळा, परळ, दादर, भायखळा, माझगाव, काळाचौकी आदी भागातील रस्ते बुडाले होते. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली, तर काही ठिकाणी शाळा भरल्यानंतर त्या तत्काळ सोडण्यात आल्या. आपल्या आई-बाबांचे बोट धरून रस्त्यात तुंबलेल्या पाण्यातून घराकडे निघालेले विद्यार्थी जागोजागी दिसत होते. काही अल्लड आणि खोडकर विद्यार्थ्यांनी पाण्यातच खेळ सुरू करून धम्माल केली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत खेळणाऱ्या या विद्यार्थ्यांना पाठीवरील दप्तर आणि शाळेचा गणवेश, छत्री याचेही भान राहिले नव्हते. भोलानाथने त्यांचे आर्जव मान्य करून दिलेल्या सुट्टीचा पावसात भिजून त्यांनी मनमुराद आनंद घेतला.