बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे कॉंग्रेसच्या वाटेवर
मुंबई, ता. 28 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार न करता "आईसमोर सर्व पर्याय खुले आहेत. ती आपला निर्णय योग्य वेळी जाहीर करेल,' असे स्पष्ट करीत स्मिता ठाकरे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांनी आज दुजोरा दिला. राज ठाकरे यांच्या बंडानंतर ठाकरे घराण्यात दुसऱ्या बंडाची शक्यता त्यामुळे निर्माण झाली असून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते. स्मिता ठाकरे आणि राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांची युतीचे सरकार असल्यापासून मतैक्य आहे.
शिवसेनेत गळचेपी होत असल्याची स्मिता यांची भावना झाली आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी त्या इच्छुक होत्या; मात्र त्यांना डावलून पत्रकार भारतकुमार राऊत यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'मध्ये लेख प्रसिद्ध करण्यास बंदी घातली गेली. तेव्हापासून त्या उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. आपल्याला उद्धव यांच्यामुळेच "मातोश्री' सोडावे लागले, अशी ठाम धारणा असतानाच पुढील घटनांमुळे या नाराजीत भर पडली. राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचे कधीही सख्य नव्हते. युतीच्या काळात अखेरच्या टप्प्यात राणे यांना मुख्यमंत्रिपदी आणण्यात स्मिता ठाकरे याच कारणीभूत होत्या. राणे आणि स्मिता यांच्यातील या एकीमुळेच त्यांचा कॉंग्रेसप्रवेश अनुकूल होण्यास राणेच जाबाबदार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे; मात्र त्याला राणे यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही. ठाकरे कुटुंबातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोचला असल्याने त्यात दबावतंत्राचा भाग म्हणून स्मिता ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. कुटुंबाशी संपूर्णपणे संबंध तोडण्याची स्मिता ठाकरे यांची आत्ताच इच्छा दिसत नाही. आपल्या सासऱ्यांविषयी म्हणूनच त्यांनी कोणतेही कटू विधान केलेले नाही. शिवसेनेचा आत्मविश्वास ढळला असतानाच स्मिता ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्यास तो ठाकरे घराण्याला, पर्यायाने शिवसेनेला धक्का मानला जातो.
दिल्लीतून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिग्विजय सिंह हा विषय हाताळत असल्याचे येथे समजते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्मिता यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावीत झालो आहोत. कॉंग्रेसचे आणि आपले विचार जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेमध्ये जाण्याचा आपला कधीच विचार नव्हता, असेही त्यांनी नमूद केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच त्यांनी, ठाकरे घराण्यातील काही व्यक्तींनी आपले चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप केला. बाळासाहेबांनी आपला लेख "सामना'मध्ये छापला नाही, अशी नाराजीही त्यांनी मुलाखतीत प्रकट केली. या पार्श्वभूमीवर आज राहुल ठाकरे यांनी आपल्या आईच्या वतीने पत्रकारांकडे खुलासा केला. "आईसमोर सर्व पर्याय खुले आहेत; मात्र कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय झालेला नाही. राजकारणाकडे ती सत्ताकेंद्र म्हणून नाही, तर सामाजिक कार्याच्या दृष्टीने पाहते,' असे सांगतानाच शिवसेनेत त्यांची गळचेपी झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. "माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे. त्यांना दुखविण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ते आदरणीय राहतील. स्मिता ठाकरे या योग्य वेळी आपला निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील,' असे राहुल यांनी स्पष्ट केले.
...............
चौकट :
उद्धव ठाकरे :
"प्रत्येक जण निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे,' या एका वाक्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्मिता ठाकरे यांना आपल्या लेखी काहीही किंमत नसल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवले.
...............
ठाकरेंचा हिरवा कंदील
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी "स्मिता ठाकरे कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यांना विरोध असण्याचे कारण नाही,' असे सांगत त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment