Wednesday, December 23, 2009

रिपब्लिकन युवक कार्यकर्ते बनणार "पॅंथर'

मुंबई, ता. 9 : दलित समाजातील युवकांच्या "मनसे'प्रवासामुळे रिपब्लिकन नेते आता खडबडून जागे झाले असून, हातातून निसटणाऱ्या युवाशक्तीला रोखण्याची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यासाठी "रिपब्लिकन युवक संघटनांची नव्याने बांधणी करून, त्या संघटनेलाच "पॅंथर' बनवले जाणार आहे', असे रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार रामदास आठवले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
नेत्यांच्या सुंदोपसुंदीला कंटाळलेली दलित जनता रिपब्लिकन पक्षापासून दूर गेली आहे. शिवसेनेचे वारे जोरदार वाहत असताना आक्रमक राजकारणामुळे दलित युवक शिवसेनेकडे आकर्षिला गेला होता. शिवशक्ती आणि भीमशक्तीचे नारेही काही काळ दिले गेले; मात्र शिवसेनेचे हिंदुत्वाचे राजकारण आंबेडकरी विचारांच्या युवकांच्या पचनी पडणारे नसल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेशी घरोबा झाला नाही. शिवशक्ती-भीमशक्तीच्या नाऱ्यांतील आवाज क्षीण झाला. सध्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरुणांचा ओढा आहे. यातून दलित समाजाचा युवकही सुटलेला नाही. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी समाजातील अनेक युवकांनी आपल्याला मनसे खुणावत असल्याचे सांगत नव्या "राज'कारणाची दिशा स्पष्ट केली.
रिपब्लिकन पक्षाची भावी पिढी मनसेसारख्या पक्षात दाखल झाली, तर रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती नेत्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे भविष्यात दलित तरुणांच्या फुरफुरणाऱ्या बाहूंना, त्यांच्या मनगटातील ताकदीला रिपब्लिकन पक्षातच आक्रमक कार्यक्रम देण्याची गरज नेत्यांना वाटू लागली आहे. त्यासाठी ज्येष्ठ कवी पद्मश्री नामदेव ढसाळ, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
दलित समाजातील युवकाला अन्य पक्षांत जाण्यापासून रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात रिपब्लिकन युवक संघटनेलाच "दलित पॅंथर'सारखे स्वरूप व आक्रमक कार्यक्रम देण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.
""नेते संधिसाधू असतील; पण आंबेडकरी युवक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला असतो. औटघटकेच्या राजकारणासाठी त्याने मनसेत जाऊ नये. राजकारणासाठी नाही; तर आंबेडकरी मिशनसाठी काम करावे, राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्यांवर भाळू नये'', असे आवाहन प्रा. कवाडे यांनी केले. "ऐक्‍यात विलीन झालेल्या गटांच्या युवक संघटनांची एकत्रित "युथ फोर्स' उभी करून, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आक्रमक कार्यक्रम देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे' कवाडे म्हणाले.
समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची परंपरा राज ठाकरे चालवतील, असे मला वाटत होते; मात्र त्यांच्या डोक्‍यात यादवी आहे. त्यामुळे देश तुटण्याचा धोका असून, त्याचा सर्वाधिक फटका दलितांना बसेल. त्यामुळे आंबेडकरी विचारांचा खरा तरुण मनसेकडे जाणार नाही, असे मला वाटते, असे सांगत नामदेव ढसाळ यांनी दलित तरुणांना व्यापक कार्यक्रम देण्याचा रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले.
-----------------------

No comments: