नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू
मुंबई, ता. 13 : विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने रिपब्लिकन डावी लोकशाही समितीतील घटक पक्षांत अस्वस्थता पसरली असून काही पक्ष पुढील काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवी समीकरणे जुळवू लागले आहेत. त्यामुळे काही घटक पक्ष रिडालोसला रामराम करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या रिडालोसचा भ्रमनिरास झाला. राज्यात पर्यायी आघाडी म्हणून रिडालोसने स्वत:ला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र सतरा पक्षांच्या रिडालोसला 17 जगाही जिंकता आल्या नाहीत. सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन युनायटेड आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता राखणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघनेकडून मोठी अपेक्षा होती. ती फोल ठरली. रिपब्लिकनची पाटी कोरी राहिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार भारत भालके कॉंग्रेसच्या तंबूत डेरेदाखल झाले.
निवडणुकीनंतर झालेल्या या पडझडीचा अंदाज घेण्यासाठी "रिडालोस'च्या सर्व घटक पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आत्मचिंतनात गुंतले आहेत. माजी खासदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकनचे विभागवार चिंतन मेळावे होणार आहेत; तर शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष यांनीही यशापयशाचा आढावा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही "वनबैठकी'त आत्मचिंतन केले. "रिडालोस'च्या माध्यमातून लढल्यामुळे पक्षाला काही प्रमाणात फटका बसल्याचे मत या वेळी काही नेत्यांनी मांडले. येत्या काळात नवी समीकरणे जुळवून रिडालोसला सोडचिठ्ठी देण्याची मागणी काही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले. "रिडालोस'मध्ये "लॉस' आमचाच झाला, अशी खंत एका वरिष्ठ नेत्याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
रिपब्लिकन युनायटेडच्या नेत्यांमध्येही अशीच भावना आहे. रिडालोसच्या माध्यमातून लढल्यामुळे रिपब्लिकनचे नुकसान झाले. रिपब्लिकन नेत्यांची मते घटक पक्षाच्या उमेदवारांना पडली; मात्र रिपब्लिकनच्या उमेदवारांना घटक पक्षांच्या वोट बॅंकेचा फायदा झाला नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात रिपब्लिकन पक्षही नव्या सवंगड्याचा शोध घेण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रिडालोसचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव यांनी, रिडालोस पुढील काळातही अखंड राहील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, कामगार, वाढती महागाई, वादळ, पाऊस यामुळे झालेले नुकसान आदी प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
(चौकट)
जोशी-शेट्टी एकत्रित येणार?
शेतकरी कामगार संघटनेचे नेते शरद जोशी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment