Wednesday, December 23, 2009

तिसऱ्या दिवशीही "कॅट'चा सावळागोंधळ

देशभरातील चार हजार विद्यार्थ्यांना फटका

मुंबई, ता. 30 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)च्या कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट अर्थात "कॅट' परीक्षेतील तांत्रिक बिघाडाचा सावळागोंधळ आज तिसऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे मुंबई, बंगलोर आणि गाझियाबाद येथील पाच केंद्रांवरील विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या तीन दिवसांत देशभरातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला आहे.
गेल्या शुक्रवारपासून ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडाचे विघ्न आल्याने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षाच देता आली नाही. आज मुंबईतील साबुसिद्दिकी कॉलेज, फादर ऍग्नेल कॉलेज, वांद्रे येथील परीक्षा केंद्रांवर तांत्रिक बिघाडाचा सावळागोंधळ झाल्याने अनेक जणांना परीक्षा न देताच मागे परतावे लागले. बंगलोर येथील गार्डन सिटी कॉलेज आणि गाझियाबाद येथील एका परीक्षा केंद्रावरही असाच गोंधळ उडाला. काल बंगलोर (11 ठिकाणी), भोपाळ (आठ ठिकाणी), लखनौ (सहा ठिकाणी), दिल्ली (पाच ठिकाणी), गाझियाबाद (चार ठिकाणी) तसेच वाराणसी, हैदराबाद, भुवनेश्‍वर, चंडिगड, नागपूर, कोलकत्ता, कोइमतूर आदी ठिकाणीही सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा होऊ शकली नव्हती. देशातील सात आयआयएम इन्स्टिट्यूट व अन्य महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही परीक्षा होत आहे. या वर्षी प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्याचा फियास्को झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाणार असून त्यांच्यासाठी सुधारित वेळापत्रक ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातून कळवले जाईल, असे "आयआयएम'कडून सांगण्यात आल्याचे एका परीक्षार्थीने सांगितले.

चौकट.....

दोष कुणाचा?
सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले युजर्स नेम आणि पासवर्ड संगणकामार्फत स्वीकारले न जाणे या समस्येने सोमवारीही परीक्षार्थींचा पिच्छा पुरवला. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. व्हायरसमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याची शक्‍यता परीक्षा संचालकांमार्फत व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर कॅटचे वर्ग चालविणाऱ्या टाइम इन्स्टिट्यूटने मात्र यावर आक्षेप नोंदवत "आयआयएम'मधील अप्रशिक्षित लोकांमुळे यंत्रणेत गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. व्हायरस असेल तर ऍन्टिव्हायरसचा वापर का केला नाही, असा सवाल "टाइम'ने केला आहे.

No comments: