Wednesday, December 23, 2009

विलेपार्ल्यात कॉंग्रेसचा निसटता विजय

मनसेने खोडा घातल्याने शिवसेना तोंडघशी

ंमुंबई, ता. 22 : उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे कृष्णा हेगडे यांना निसटता विजय मिळाला असून, शिवसेनेचे विनायक राऊत यांचा 1704 मतांनी पराभव झाला. कॉंग्रेसला कडवी झुंज देणाऱ्या राऊत यांना लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही वेळी मनसेमुळेच एकप्रकारे धोबीपछाड खावी लागली. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विलेपार्ले मतदारसंघात नऊ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या वेळी मात्र कॉंग्रेसच्या कृष्णा हेगडे यांना 1704 मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. दहाव्या फेरीपर्यंत विनायक राऊत आणि हेगडे यांच्यात पाठशिवनीचा खेळ सुरू होता. कधी हेगडे, तर कधी राऊत आघाडीवर राहत असल्याने दोन्ही पक्षांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राऊत यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेल्या आघाडीमुळे ते निसटती बाजी मारणार असे वाटत असतानाच हेगडे यांनी प्रत्येक फेरीत दोन हजार मतांची कमाई करीत 11 व्या फेरीत आघाडी घेतली. राऊत यांच्या पारड्यातील मते कमी होत असतानाच शिरीष पारकर यांच्या पारड्यातील मते वाढत गेली. शेवटच्या दोन फेऱ्यांपर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढाईत अखेर कॉंग्रेसने बाजी मारली.

हेगडे यांना 44 हजार 338 मते मिळाली, तर राऊत यांना 42 हजार 634 मतांवर समाधान मानावे लागले. मनसेचे पारकर यांनीही मतांची जोरदार कमाई करीत एकप्रकारे कॉंग्रेसच्या विजयाला हातभारच लावला. पारकर यांना 35 हजार 156 मते मिळाली. मनसे आणि शिवसेना यांच्या भांडणात कॉंग्रेसने बाजी मारली. मनसेमुळे झालेला हा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र होते. हेगडे यांना विजयी घोषित करताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत परिसर दणाणून सोडला.
-------------------

No comments: