Wednesday, December 23, 2009

"रेल्वे इंजिना'च्या धडकेने शिवसेना "जायबंदी'

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीने विजय मिळविला आहे, तर कॉंग्रेसचे आमदार जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करीत शिवसेनेचे नगरसेवक बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात युतीचा भगवा फडकावला व युतीची लाज राखली. कालिना मतदारसंघातून गृहराज्यमंत्री (शहर) नसीम खान यांनी दणदणीत विजय मिळवीत हॅट्ट्रिक साधली आहे. अन्य मतदारसंघात मात्र कॉंग्रेसला युती आणि मनसेच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली. मनसेच्या "रेल्वे इंजिना'ने युतीला धडक दिल्याने युतीवर जायबंदी होण्याची पाळी आली.

लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठे मताधिक्‍य संपादन करीत कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत निर्माण केलेला वरचष्मा कायम राखला आहे. कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक असे बलाबल या लोकसभा मतदारसंघात तयार झाले आहे.

आघाडीने जिंकलेल्या पाचपैकी वांद्रे-पश्‍चिम आणि विलेपार्ले या जागा निसटत्या मतांच्या फरकाने आल्या. युती आणि मनसेच्या उमेदवारांची एकत्रित मते आघाडीच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक आहेत. मनसे व युती एकत्रित असते, तर चांदिवली वगळता अन्य मतदारसंघात चित्र काही वेगळेच दिसले असते.

विलेपार्लेत हेगडेंचा निसटता विजय
मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यात "कॉंटे की टक्कर' अपेक्षित होती. मनसेचा फटका राऊत यांना बसेल असा होरा होता. घडलेही तसेच. अटीतटीच्या लढतीत कृष्णा हेगडे यांचा 1 हजार 704 मतांनी निसटता विजय झाला. राऊत यांना 42 हजार 634 मते मिळाली. मनसचे उमेदवार शिरीष पारकर यांनी 35 हजार 156 मतांची कमाई केली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. राऊत आणि पारकर यांच्यात मराठी मतांचे विभाजन झाल्याने राऊत यांना तिसऱ्यांदा पराभवाचे पाणी चाखावे लागले. स्थानिक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करीत राऊत यांनी चांगली लढत दिली होती. मात्र रेल्वे इंजिनाचा धक्का बसल्याने राऊत तोंडघशी पडले; तर विजयाचा दावा करणारे शिरीष पारकर यांनी कॉंग्रेसच्या विजयात हातभार लावला. मात्र लोकसभेच्या तुलनेत मनसेने या वेळी येथून जास्त मतांची कमाई केली आहे.

"वांद्रे-पश्‍चिमे'त सिद्दीकींची दमछाक
या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असे वाटत होते; मात्र भाजपच्या आशीष शेलार यांनी त्यांना चांगले झुंजविले. त्यामुळे केवळ 1 हजार 691 मतांची सिद्दीकी यांना आघाडी मिळाली. वांद्रे पश्‍चिम हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे; मात्र शेलार यांनी सिद्दीकी यांची दमछाक केली. मनसेचा उमेदवार या मतदारसंघात नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत झाली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेली आघाडी कायम राखण्यात सिद्दीकी यांना यश मिळाले आहे.

"वांद्रे-पूर्व'मध्ये भगवा
लगतच्या मतदारसंघात हाराकिरी होत असताना शिवसेनेच्या प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांनी वांद्रे पूर्वमध्ये विजयश्री खेचून आणली. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या "मातोश्री'चा अंतर्भाव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. बाळा सावंत यांच्या समोर मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांचे आव्हान प्रामुख्याने होते. मात्र मनसेला मात देत सावंत यांनी भगवा फडकावला आहे. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत यशाने त्यांना हुलकावणी दिली होती. या वेळी मात्र त्यांनी जनार्दन चांदुरकर यांचा पराभव करून वचपा काढला. त्यांना 7 हजार 420 एवढे मताधिक्‍य मिळाले. मनसेच्या शिल्पा सरपोतदार या तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या असून त्यांना 19 हजार 109 मते मिळाली आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिल्पा सरपोतदार यांना अपयशाचा सामना करावा लागला.

कालिनात मनसेचे आव्हान
कालिना मतदारसंघात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी 12 हजार 921 मतांनी विजय मिळवला आहे. मनसेच्या चंद्रकांत मोरे या नवख्या उमेदवाराने त्यांना अनपेक्षित लढत दिली. कॉंग्रेस आणि युती यांच्यात प्रामुख्याने लढत होईल, असे मानले जात होते. मात्र भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दीनानाथ तिवारी हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. त्यांना अवघी 13 हजार 994 मते मिळाली आहेत; तर मनसेच्या मोरे यांनी 38 हजार 284 मते मिळवली आहेत. कृपाशंकर सिंह यांचा येथील उत्तर भारतीयांशी असलेला संपर्क आणि कॉंग्रेसचे वर्चस्व पाहता कृपाशंकर यांना मोठ्या मताधिक्‍याची अपेक्षा होती. मात्र मनसेने त्याच्या विजयी वारूचा वेग रोखून धरला. धरला त्यामुळे त्यांना अपेक्षित मताधिक्‍य मिळवता आले नाही.

चांदिवलीवर कॉंग्रेसची पकड
कुर्ला मतदारसंघातून आतापर्यंत दोन टर्म विधानसभेवर धडक देणाऱ्या गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी या वेळी मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या चांदिवली मतदारसंघातून मनसेच्या दिलीप लांडे यांचा 33 हजार 715 मतांनी पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांचा हा विजय एकतर्फी मानला जात आहे. नसीम खान यांना 82 हजार 616 मते मिळाली आहेत. दिलीप लांडे यांना 48 हजार 901 मते मिळाली. शिवसेनेने मात्र येथे हाराकिरी केली. सेनेच्या उमेदवार चित्रा सांगळे यांना 22 हजार 782 मते मिळाली आहेत. नसिम खान यांची मतदारसंघावरील पकड यामुळे अधिकच घट्ट झाली आहे; तर मनसेला मिळालेली मते उत्साहवर्धक आहेत. सेनेला मात्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पुढील काळात धडपडावे लागणार आहे.

"कुर्ल्या'त राष्ट्रवादीला लाभ
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल कांबळे यांनी कुर्ला मतदारसंघात शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांचा 6 हजार 971 मतांनी पराभव केला. त्यांना 41 हजार 891 मते मिळाली असून कुडाळकर यांना 34 हजार 920 मते मिळाली. शिवसेनेच्या विजयाचा मार्ग येथे मनसेने रोखून धरला. मनसे आणि सेनेच्या उमेदवारांची मते पाहता हे चित्र स्पष्ट होते. मनसेच्या सदाशिव लोखंडे यांनी 33 हजार 967 मतांची कमाई केली. मनसे आणि शिवसेनेच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ झाला. कुर्ला मतदारसंघ राखीव झाल्याने कामगार मंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी या मतदारसंघाचा वारसा अनिल कांबळे यांच्याकडे आला. कांबळे यांनी पहिल्याच प्रयत्नात विजयश्री मिळवली आहे. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' या शिवसेनेच्या प्रचाराला मराठी मतदारांनी केराची टोपली दाखवली आहे. बहुतांश मतदारसंघात शिवसेनेची पीछेहाट झाली असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
..........

No comments: