Wednesday, December 23, 2009

मनावरच्या जखमा अजूनही वाहत आहेत...

मुंबई : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या सीएसटी रेल्वेस्थानकावर हातात एके-47 रायफल घेऊन अमानुषपणे गोळीबार करणारे दहशतवादी... जीवाच्या आकांताने धावणारे प्रवासी... धावता धावता रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेले लोक, त्यांच्या किंकाळ्या... रेल्वेस्थानकावर झालेले हॅण्डग्रेनेडचे स्फोट... दहशत आणि दहशतवाद्यांचा तो नंगानाच आजही "त्यांच्या' नजरेसमोर जसाच्या तसा उभा राहतो. दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी केवळ त्यांच्या शरीरावरच जखमा केल्या नाहीत; तर त्यांच्या मानसिकतेवरही आघात केलेला आहे. त्यांच्या मनावरच्या जखमा आजही ओल्याच आहेत.
ंत्या हल्ल्यात गोळ्या लागून अपंगत्व आलेल्या लोकांच्या अंगावर आजही तो प्रसंग काटा उभा करतो. तेव्हाच्या आठवणी सांगताना अनेकांच्या भावना अनावर होत होत्या. दहशतवादाबद्दलची प्रचंड चीड, संताप त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
पूनम सिंग या आपला सहा वर्षांचा मुलगा सचिनला घेऊन, त्या दिवशी वाराणसीला निघाल्या होत्या. सीएसटी रेल्वेस्थानकावर कसाब व त्याच्या साथीदाराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोघेही जखमी झाले होते. ""सचिनच्या हाताला आणि पायाला दोन गोळ्या लागल्या. सुदैवाने आम्ही दोघेही बचावलो; पण सचिनच्या वाट्याला अपंगत्व आले. त्याच्या हातात रॉड घालण्यात आला आहे. पायाची त्वचा कापून, त्याच्या हाताला लावण्यात आली आहे. मृत्यूचे ते थैमान मला अजूनही विसरता येत नाही'', असे पूनम यांनी सांगितले.
रेल्वे पोलिस सुशांत पांडा हे त्या दिवशी सीएसटीला फलाट क्रमांक 1 वर होते. ""स्टेशनमध्ये स्फोटांचे आवाज आल्यानंतर काहीतरी गंभीर घडत असल्याची जाणीव मला झाली. तोवर दोन लोक फायरिंग करीत येत असल्याचे दिसले. मी लोकांना बाहेर काढत होतो, एवढ्यात माझ्या पोटात गोळी लागली आणि मी कोसळलो. दहशतवाद्यांचे ते अमानुष क्रौर्य आणि लोकांची झालेली ती कत्तल कधीही विसरता येणार नाही'', असे सांगताना पांडा यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या होत्या.
त्या दिवशी विजय खोत गोव्याला निघाले होते. भावाची बायको व मुलगी सोबत होती. ते सांगतात, ""मी प्लॅटफॉर्मवरील टॉयलेटमध्ये जाऊन परत येत असताना अचानक स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाठोपाठ फायरिंग सुरू झाले. प्लॅटफॉर्मवर एकच धावपळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागले. मी अतिरेक्‍यांच्या डाव्या बाजूला होतो. दोन्ही अतिरेक्‍यांचे एकमेकास कव्हर करीत शांतपणे फायरिंग सुरू होते. त्यांचे चेहरे निर्विकार होते. एक गोळी माझ्या मगटावरच्या घड्याळाला भेदून हातात शिरली. मी खाली पडलो. अर्धवट शुद्धीत अतिरेक्‍यांचा तो हैदोस मी पाहत होतो. लोक रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले होते. माझ्या समोरच धावणारे दोघे जण गोळ्या लागून कोसळले आणि बहुधा गतप्राण झाले. संपूर्ण स्टेशनवर जणू त्या दहशतवाद्यांचेच राज्य होते. सगळे लोक चिडीचूप होते. फक्त रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता. मी अर्धवट शुद्धीत असताना मला हातगाडीवर घालून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजही गोळ्यांचा तो आवाज आणि त्यानंतर झालेला आक्रोश, रक्ताच्या थारोळ्यातील ती दृश्‍ये मला छळतात. नीट झोपसुद्धा लागत नाही.''
सोलापूरच्या शब्बीर दलाल यांची रुग्णालयातून नुकतीच सुटका झाली. त्यांच्या पायात दोन गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना अपंगत्व आले नि त्यांचे घरच बसले. दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या शब्बीरचा आता परिस्थितीशी झगडा सुरू आहे. त्यांची आता एकच मागणी आहे- कसाबला फाशी द्या.

No comments: