ंमुंबई : रायफलीतून गोळ्या झाडत दोघे जण त्या दिवशी सीएसटी रेल्वेस्थानकात शिरले. बेफामपणे गोळीबार करीत ते धडाधड माणसं मारत होते. लोक सैरावैरा पळत होते. त्यात माझा सख्खा भाऊसुद्धा होता. ते पाहून मी घाबरले... काय करायचे मला कळत नव्हते. एवढ्यात कोणी तरी ओरडले, "मरना है क्या' आणि मी भानावर येण्यापूर्वीच माझ्या पायाला एक गोळी लागली. मी कोसळले आणि माझ्यासमोर माझ्या भावाच्या छातीत गोळी लागून तो ठार झाला. 26/11 ला सीएसटी रेल्वेस्थानकात मृत्यूचे भयाण तांडव अनुभवणाऱ्या बोरिवली येथील विजयादेवींना त्या दिवशीचा प्रसंग सांगताना आपले अश्रू आवरता येत नव्हते.
ंमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणी वडील, कोणी आई, मुले तर कोणी अख्खा परिवार गमावला. प्रत्येकाच्या दुर्दैवाचे दशावतार वेगळे. प्रत्येकाची कहाणी काळजाला घरे पाडणारी.
विजयादेवी आपल्या नातेवाईकांसह गोरखपूरला निघाल्या होत्या. त्यांचा पती, भाऊ आणि अन्य दोन महिला त्यांना निरोप देण्यासाठी सीएसटीपर्यंत आल्या होत्या. विजयादेवींच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग आजही अगदी स्पष्ट आहे. ""स्थानकावरील स्वच्छतागृहात जाऊन मी परतत असतानाच अचानक फायरिंग सुरू झाली. लोक धावत होते. माझ्याही पायाला गोळी लागली. मी कोसळले; पण कोसळताना मेस्त्रीलाल मौर्य या माझ्या सख्ख्या भावाला गोळी लागल्याचे मी पाहिले. त्याला वाचवायची ताकद माझ्यात नव्हती. माझ्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू झाला. तो क्रूर हल्ला... मी आयुष्यात असा प्रसंग कधी पाहिला नव्हता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक आणि क्रूरकर्म्याचा तो अमानुष गोळीबार आजही विसरता येत नाही. माझा जीव वाचला; पण भावाचा मृत्यू झाल्याची सल मनात कायम आहे. निरपराध लोकांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवाद्यांना फाशीच दिली पाहिजे.''
विजयादेवींची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पतीला पक्षाघात झाल्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. बांगड्यांचा व्यवसाय करून त्या घर चालवत असत; मात्र पायाला गोळी लागल्याने त्या आता पुरत्या जायबंदी झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय बसला, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दहशतवादी हल्ल्यातून त्या बचावल्या असल्या, तरी रोजच्या लढाईने त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्या सांगतात, दोन लहान मुलांना घेऊन आता मी परिस्थितीशी दोन हात करीत आहे.
......................
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment