मुंबई, ता. 22 : मी मी म्हणणाऱ्या काही बड्या नेत्यांना आज मतदारांनी घरी बसवले; तर काहींना विजयाने थोडक्यात हुलकावणी देत त्यांची सत्त्वपरीक्षा घेतली. मात्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना मात्र भिवंडी पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन्ही मतदारसंघात विजयाची लॉटरी लागली असून "भगवान देता है तो छप्पर फाडके' या म्हणीचा प्रत्यय त्यांना आला. दरम्यान, आझमी यांना एका मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार असल्याने येथे पोटनिवडणूक अटळ आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून नशीब अजमावणारे माजी खासदार अबू आझमी आज दोन मतदारसंघांतून निवडून आले. लोकसभेत हुलकावणी देणारे त्यांचे नशीब विधानसभा निवडणुकीत फळफळले आहे. रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या पाठिंब्यावर भिवंडी पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा सेफ गेम अबू आझमी खेळले होते. या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आझमी यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. भिवंडी पूर्व मतदारसंघात आझमी यांनी 17 हजार 981 मतांनी प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला; तर मानखुर्द येथे 14 हजार 117 एवढे मताधिक्य मिळवून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चीतपट केले. समाजवादी पक्षाला नवापूर आणि भिवंडी या अन्य दोन जागांवर विजय मिळाल्याने विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पोटनिवडणूक होणार
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार आझमी यांना एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यामुळे त्यांना भिवंडी किंवा शिवाजीनगर मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार आहे; त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आझमी यांनी कोणत्याही एका मतदारसंघातून राजीनामा सादर केल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्यात येईल, असे सांगितले.
..........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment