Wednesday, December 23, 2009

एसएनडीटी विद्यापीठाच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका

ऐनवेळी प्रश्‍नपत्रिका तयार करून परीक्षा उरकली


ंमुंबई, ता. 9 : एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभाराचा चांगलाच फटका आज विद्यार्थांना बसला. "पोस्ट ग्रॅज्युएट अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' या अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्र परीक्षेची प्रश्‍नपत्रिका वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल चार तास विद्यार्थ्यांना परीक्षागृहाबाहेर ताटकळत बसावे लागल्याने मनस्ताप सहन करवा लागला.

एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन' शाखेत 13 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथमसत्राची लेखी परीक्षा आजपासून (ता. 9) सुरू झाली. परीक्षा विभागाने याबाबतचे वेळापत्रक सुमारे पंधरा दिवस आधीच जाहीर केले होते, असे असताना आज पहिल्या पेपरलाच परीक्षा विभागाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. सकाळी 10.30 वाजता "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाची परीक्षा होती. मात्र सकाळी परीक्षागृहात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षेची कोणत्याही प्रकारची तयारी नसल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता परीक्षा होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी तेथेच ठिय्या दिला आणि परीक्षा घेतली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे धाव घेतली. त्यामुळे परीक्षा विभागाने ऐनवेळी धावाधाव करून नव्याने प्रश्‍नपत्रिका तयार करून दुपारी दोन वाजता कशीबशी परीक्षा उरकून घेतली, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली.

दरम्यान "ज्या प्राध्यापकांनी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका तयार केल्या होत्या ते सध्या दूरस्थ शिक्षण विभागात कार्यरत नाहीत. "चाइल्ड डेव्हलपमेंट' या विषयाच्या प्रश्‍नपत्रिका त्यांच्याकडेच राहिल्या आहेत. त्यामुळे नव्याने प्रश्‍नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावी लागली', अशी सारवासारव विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक चंद्रकांत पुरी यांनी "सकाळ'शी बोलताना केली.

विद्यापीठाच्या या गोंधळी कारभारामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला जबाबदार कोण, असा सवाल केला जात असून विद्यापीठाच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनविसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी दिला आहे
...........

No comments: