Wednesday, December 23, 2009

हिंदीतूनच शपथ घेणार : अबू आझमी

मुंबई, ता. 2 : नवनिर्वाचित आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी; अन्यथा त्यांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला असतानाच समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मात्र आपण हिंदी भाषेतूनच आमदार म्हणून शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे आणि आझमी यांच्यातील धुमश्‍चक्रीत भर पडणार आहे.
नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांच्या हिंदी प्रेमावर मनसेने कडवट टीका केली आहे. या पर्श्‍वभूमीवर आझमी यांनी आपण मुंबईत 40 वर्षे राहत असून विधानसभेत निवडून आल्यामुळे मराठी भाषेचे धडेही गिरवणार असून मराठीला स्वप्नातही विरोध करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती इंग्रजी, मराठीप्रमाणे हिंदी भाषेतून मिळावी, अशी मागणी अबू आझमी यांनी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन नुकतीच केली होती. आमदार म्हणून शपथही हिंदीतूनच घेणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली होती. त्यामुळे मनसेला पुन्हा एकदा आंदोलनाचा आयता विषय मिळाला. आझमींच्या लाठ्याकाठ्या वाटपाच्या वक्तव्याने यापूर्वी मनसेच्या हाती आयते कोलीत दिले होते. आझमींच्या नव्या मागणीवर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "आझमी यांनी उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये चालते व्हावे', असे सुनावले आहे.
मराठी भाषेबद्दल आदर असल्याचे सांगत आझमी यांनी मराठीचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषेतून शपथ घेण्याची घटनेत तरतुद आहे. त्यामुळे आपण हिंदीतून शपथ घेणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
"हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. या भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, हा आपल्या मागणीमागील हेतू होता; मात्र त्याचा विपर्यास करून मला मराठीद्वेशी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोप आझमी यांनी मनसेचे नाव न घेता केला आहे.
...........

No comments: