मुंबई, ता. 14 : उत्तर प्रदेशात राहणाऱ्या मुकेशला (नाव बदललेले) मुंबईचे आकर्षण होते. त्याला सिनेमात दहा दहा गुंडांना लोळवणाऱ्या अभिनेता हृतिक रोशनला भेटायचे होते. म्हणून तो घरातून पळून मुंबईत आला खरा, पण मुंबईत पाऊल ठेवताच इथली गर्दी पाहून तो भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानकात फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली. त्याच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे. दिल्लीतील सुखवस्तू कुटुंबात राहणारी आशा (नावात बदल) घरातून पळून आली आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्याने आई-वडिलांपासून दूर डोंगरीच्या बालसुधारगृहात राहणाऱ्या शेकडो मुलांचा हाही बालदिन सुधारगृहातच साजरा झाला.
मुंबई म्हणजे स्वप्नांचं मायाजाल. मुंबईची आणि इथल्या चंदेरी दुनियेची भुरळ पडून दरवर्षी अनेक मुले आपल्या आवडत्या हिरोला भेटण्यासाठी घरातून पळून मुंबईत येतात; मात्र येथे आल्यावर आपण फसलो याची जाणीव त्यांना होते आणि त्यांची रवानगी बालसुधारगृहात होते; तर कही जण वाईट मार्गाला लागतात.
मुंबईच्या मायाजालात स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक येतात; मात्र लहान मुलांमध्ये मुंबईचे आकर्षण असते ते चित्रपटात झळकणाऱ्या आपल्या आयडॉलला भेटण्याचे. मुंबईत गेल्यावर ते सहज भेटतील, त्यांच्याशी बोलता येईल, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला मिळेल, या आशेने ते बेधडक घरातून पळून थेट मुंबई गाठतात; मात्र इथे आल्यावर त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि पाठीमागे लागतो तो दुर्दैवाचा फेरा. मुकेशलाही हृतिक रोशनला भेटायचे होते, म्हणून तो घरातून पळून मुंबईत आला. दिल्लीत राहणारी आशा (नावात बदल) शाळेत जायची. आशालाही मुंबई पाहायची होती. वर्गातील वात्रट मुले तिला वर्गातल्याच एका मुलाच्या नावाने चिडवायची. हे सारे घरी कळले तर... या विचाराने आशा घाबरली. त्यामुळे ती घरातून एक लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन मुंबईत पळून आली. मुंबईत तिची गाठ एका तरुणाशी पडली. काही वेळ त्याच्यासोबत राहिल्यावर तिच्या लक्षात आले, की आपल्याला फसविण्याचा त्याचा इरादा आहे. त्यामुळे तिने तडक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तिची बालसुधारगृहात रवानगी केली. तेथून नुकतेच तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले, असे बालसुधारगृहाचे अधीक्षक एच. ए. जाधव यांनी सांगितले.
डोंगरीच्या बालसुधारगृहात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधून पळून आलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील मुलांचे प्रमाण कमी असल्याचे जाधव यांनी सांगितले. घरातल्या भांडणाला कंटाळून, घरी काम करायला लागते म्हणून, आई-वडील मारतात म्हणूनही अनेक मुले पळून येतात. रेल्वे स्थानके, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणांहून काही सामाजिक संस्था, पोलिस यांच्यामार्फत ही मुले बालसुधारगृहात दाखल होत असल्याचे ते म्हणाले. बालकामगार म्हणून सोडविण्यात आलेली, पालकांनी सांभाळण्याची झंझट नको म्हणून टाकलेली मतिमंद मुलेही या सुधारगृहात आहेत. बालदिनाच्या निमित्ताने आज सुधारगृहात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
............
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment