ंमुंबई : भारतीय नौदलाची एकेकाळी शान असलेली "आयएनएस-विक्रांत' ही विमानवाहू युद्धनौका नौदल सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली असून, विजयाची अनोखी गाथा ठरलेल्या या युद्धनौकेला पाहण्यासाठी आबालवृद्धांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. तीन दिवसांत 28 हजार मुंबईकरांनी "विक्रांत'च्या पराक्रमाला सलाम केला.
नौदलाच्या सेवेतून "विक्रांत' निवृत्त झाली असली, तरी आजही तिच्याबद्दलचे आकर्षण प्रत्येकाच्या मनात कायम आहे. भारतीय नौदलाचे सामर्थ्य नागरिकांना पाहता यावे यासाठी या युद्धनौकेचे टायगर गेटजवळ वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून, पराक्रमाच्या खुणा आपल्या अंगावर मिरविणाऱ्या "विक्रांत'ला पाहून अनेकांचा उर अभिमानाने भरून येतो. पाकिस्तानबरोबर झालेल्या 1971 च्या युद्धात "विक्रांत'ने अजोड
कामगिरी बजावली होती. शत्रुराष्ट्राच्या नौदलाचे कंबरडे "विक्रांत'ने मोडले होते. त्यामुळे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या गळ्यातील ताईत बनली. पराक्रम गाजविणाऱ्या या युद्धनौकेला भंगारात न काढता तिचा इतिहास आजच्या पिढीसाठी जिवंत ठेवण्यात आला आहे. नौदल सप्ताहानिमित्त सध्या 6 डिसेंबरपर्यंत "विक्रांत' मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी मुंबईकरांची रीघ लागली आहे. "विक्रांत'च्या पराक्रमाची गाथा ऐकलेली असल्याने तिला प्रत्यक्ष पाहण्याचा मोह वयोवृद्धांनाही आवरता येत नसल्याचे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे पाहिल्यानंतर जाणवते.
युद्धनौकेचा प्रचंड विस्तारलेला डेक, त्यावरील सी-हॉक बॉम्बर विमाने, चेतक हेलिकॉप्टर, सी हॅरीअर, बरजेट अलाईज, मशीन्सगन्स्... हे सारे कुतूहलपूर्ण न्याहाळतानाच मनोमन तिला सॅल्यूट करायला नागरिक विसरत नाहीत. देशासाठी "विक्रांत'ने बजावलेल्या कामगिरीमुळे देशाभिमानाने उर भरून येतो.
असा आहे इतिहास
"विक्रांत'चे मूळ नाव "एचएमएस हेरकुलर्स' (आर-49) होते. इंग्लंडमधील विकेर आर्मस्ट्रॉंग / हारलॅण्ड वुल्फ यांनी या अजस्र युद्धनौकेची बांधणी केली. 22 सप्टेंबर 1945 रोजी ब्रिटनच्या सेवेत ती दाखल झाली. दुसऱ्या महायुद्धात तिने पराक्रम गाजवला. त्यानंतर भारताने "एचएमएस हेरकुलर्स' खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1957 मध्ये इंग्लंडने ती भारताला विकली. त्या वेळी इंग्लंडमधील भारताच्या उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी करारावर स्वाक्षरी केली. 1961 मध्ये विक्रांत भारतात आली. मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिचे स्वागत केले आणि "एचएमएस हेरकुलर्स'चे नाव बदलून संस्कृत नावावरून "विक्रांत' म्हणजे "धैर्य' असे तिचे नामकरण करण्यात आले.
अजोड कामगिरी
भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या बांगलादेशमुक्तीच्या युद्धात "विक्रांत'ने अजोड कामगिरी करीत आपले नाव सार्थकी लावले. पाकिस्तानचा धुव्वा उडविला. "विक्रांत'च्या डेकवरून उडणाऱ्या बॉम्बर्सनी ऑक्सबाजारमध्ये बॉम्बिंग करून हलकल्लोळ उडविला. पाकिस्तानला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. बांगलादेशचे युद्ध भारताने जिंकले. प्रीतम सिंग हे या युद्धनौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर होते. वीस वर्षे भारतीय नौदलाची सेवा केल्यानंतर "विक्रांत' निवृत्त झाली; मात्र "विक्रांत'च्या पराक्रमाची गाथा आजही या युद्धनौकेवर जाणाऱ्या प्रत्येकाला स्फूर्ती देते. म्हणून आजही मुंबईकरांची पावले "विक्रांत'कडे वळत आहेत.
.......
अशी आहे "विक्रांत'
जेस्टिक क्लास
19,500 टन वजन
704 फूट लांबी
128 फूट रुंदी
............
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment