मुंबई, ता. 14 : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली निवडणुकीची धामधूम काल मतदानानंतर थंडावली आणि राजकीय ताणतणावाखाली वावरणाऱ्या उमेदवारांनी पहिला अध्याय संपल्याने आज हुश्श म्हणत सुटकेचा निःश्वास सोडला. कोणी निवांत झोप घेतली, कोणी स्वीमिंगला गेले; तर कोणी मासळीबाजारात जाऊन मासे आणले. महिला उमेदवारांनी दिवाळीच्या फराळाला हात घातला. निकालाचा काथ्याकूट आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासही उमेदवार विसरले नाहीत.
राजकीय आघाड्या, व्यूहरचना, प्रचारसभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, शह-काटशह यामुळे नेते आणि उमेदवारांच्या डोक्याचा अक्षरशः भुगा झाला होता. झोप आणि जेवणाचे तीन-तेरा वाजले. मतदारसंघात पदयात्रा काढून उमेदवारांचे जोडे झिजले. प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये भाषणे ठोकून घशाला कोरड पडली; तर मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरले. या साऱ्या धावपळीमुळे त्यांची चांगलीच दमछाक झाली. मंगळवारी मतदानानंतर जनमताचा कौल आणि उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आणि नेत्यांची धावपळ थांबली.
दिवाळीनंतर निकालाचा फटाका फुटणार असल्याने त्याची धाकधूक सर्वच उमेदवारांना असली, तरी गेल्या महिनाभराच्या धावपळीतून त्यांना आज मिळालेला निवांतपणा त्यांनी सत्कारणी लावला. त्यामुळे आज ते रिलॅक्स होते. मनसेचे विलेपार्लेतील उमेदवार शिरीष पारकर यांनी आज मासळी बाजार गाठला. मुलीला शाळेत सोडले आणि दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी मात्र दिवसभर मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. निकालाचा अंदाज घेतला. कॉंग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे यांनी स्वीमिंगला जाऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आणि रात्री कुटुंबासमवेत डीनरचा बेत आखला.
नबाव मलिक रमले कुटुंबात
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अणुशक्तीनगरमधील उमेदवार व कामगार मंत्री नवाब मलिक यांनी आपला वेळ आज लहानग्या नातवाला दिला. त्याच्याशी ते मनसोक्त खेळण्यात रमले. त्यानंतर कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी झालेले मतदान आणि निकालांची आकडेमोड केली. भाजपचे मलबार हिलचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी देवदर्शन केले. वांद्रे पूर्वचे उमेदवार बाळा सावंत, भांडुपचे उमेदवार सुनील राऊत यांनी सकाळी विश्रांती घेऊन दुपारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वांद्रे पूर्वच्या मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांनी मात्र दिवाळीच्या स्वागतात स्वतःला झोकून दिले आणि बाहेरची लढाई संपवून त्या घरच्या आघाडीवर रुजू झाल्या.
दिवाळी तोंडावर आल्याने काही उमेदवारांनी "होम मिनिस्टरला' वेळ देत दिवाळीत गोडवा कायम राखण्याचा प्रयत्न केला. बहुतांशी उमेदवारांनी आजचा दिवस कुटुंबासोबत घालवला. काहींनी निवांत झोप घेणे पसंत केले; तर काही नेत्यांनी घराबाहेर जाण्याचे टाळत कार्यकर्त्यांना घरीच बोलावून निकालाचा अंदाज घेण्यासाठी आकड्यांची उलटसुलट मांडणी केली. आपापल्या मतदारसंघांत झालेले मतदान, मतदानाला बाहेर पडलेले नागरिक, कोणत्या पॉकेटमध्ये किती प्रतिसाद मिळाला, त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचा प्रमुख कार्यकर्त्यांसोबत काथ्याकूट करीत निकालाचा अंदाज घेतला. प्रसारमाध्यमे आणि काही संस्थांनी वर्तवलेल्या जनमत चाचण्यांचा अंदाज घेत स्वतःची गणिते मांडण्यात धन्यता मानली.
..........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment