मुंबई, ता. 18 : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी आज पाठिंबा देत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या घटक पक्षात खळबळ उडाली. रिडालोसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी घटक पक्षांनी आठवलेंच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत या मागणीला रिडालोसचा यत्किंचितही पाठिंबा नाही, असे स्पष्ट केले.
स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने पुन्हा डोके वर काढले आहे. रामदास आठवले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यासाठी 22 डिसेंबर रोजी विदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकनमार्फत निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. "वैदर्भीय जनतेच्या मागणीचा विचार करून स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली पाहिजे,' असे मत आठवले यांनी व्यक्त केले. मनसे आणि शिवसेना यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध करून वैदर्भीय जनतेच्या मागणीचा, त्यांच्या भावनांचा अनादर केला असून, त्यांनी आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, असा उपदेशाचा डोसही आठवले यांनी या वेळी दिला.
दरम्यान, रिडालोसच्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेचा स्वीकार करण्यात आला असताना रिडालोसमधील मोठा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या या पूर्णतः वेगळ्या मागणीमुळे घटक पक्षात अस्वस्थता पसरली आहे. "स्वतंत्र विदर्भाची मागणी म्हणजे कुणाच्या तरी लग्नाच्या मांडवात आपल्या मुलाची मुंज उरकून घेण्याचा प्रकार आहे', अशी बोचरी टीका शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. "आठवले यांच्या मागणीशी आम्ही यत्किंचितही सहमत नाही. रिडालोसमध्ये आहोत म्हणून आम्ही त्यांच्या मागणीशी सहमत नाही, आंदोलनाला पाठिंबा देणार नाही', असे एन. डी. पाटील यांनी सांगितले;
तर भाकपचे सरचिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी यांनीदेखील भाकपची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची असून, आठवले यांचा तो वैयक्तिक निर्णय असल्याचे स्पष्ट केले. "समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र या भूमिकेसाठी आम्ही काम करीत असून, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे रेड्डी यांनी ठामपणे सांगितले. जनता दल (सेक्युलर) पक्षही संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता असल्याने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमुळे आठवले एकाकी पडले आहेत. नजीकच्या काळात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा रिडालोसच्या विभाजनास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
..................................
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment