Wednesday, December 23, 2009

अखेर "म्हाडा'ने परीक्षा पुढे ढकलली

सरकारी समन्वय नसल्याने एकाच दिवशी तीन परीक्षा


ंमुंबई, ता. 11 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हाडा आणि ठाणे वनविभाग यांनी विविध पदांसाठी एकाच दिवशी (ता. 29 नोव्हेंबर 2009) परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्यासमोर उभा केलेला पेचप्रसंग "म्हाडा'ने आपली परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अखेर टळला आहे. सरकारी खात्यातील समन्वयाचा अभाव, एकाच दिवशी परीक्षांचे होणारे आयोजन, ऐनवेळी बदलण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा यामुळे हजारो परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागत असून सरकारी बाबूंच्या या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी 29 नोव्हेंबर 2009 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर "म्हाडा'मार्फतही वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक या दोन पदांसाठी याच तारखेला परीक्षा घेतली जाणार होती. तशी तारीखही जाहीर करण्यात आली होती. तर ठाणे वनविभागाच्या वतीनेही 29 नोव्हेंबरलाच लेखापाल व वनपाल पदांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या तिन्ही परीक्षांसाठी अर्ज दाखल केले आहेत. सुरुवातीला एमपीएससी आणि म्हाडाच्या परीक्षांच्या तारखा वेगळ्या होत्या. त्यात पुन्हा बदल करण्यात आला. मात्र हा बदल करताना संबंधित अधिकाऱ्यांनी अन्य विभागांशी समन्वय साधला नसल्याने तिन्ही परीक्षा एकाच दिवशी जाहीर झाल्या. त्यामुळे विद्यार्थी काळजीत पडले. एकाच दिवशी तीन विभागाच्या परीक्षा झाल्यास या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना मुकावे लागले असते.

दरम्यान, तिन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याचा साक्षात्कार उशिरा का होईना संबंधित विभागांना झाला; त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे. "म्हाडा'ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने 29 रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा आता 20 डिसेंबर रोजी घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. शासनाच्या कार्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केला आहे.
............

No comments: