Wednesday, December 23, 2009

स्कूल बस आता होणार अधिक सुरक्षित

परिवहन विभागाने उगारला नियमांचा दंडुका


मुंबई, ता. 26 : असुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि त्याची जबाबदारी झटकणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर परिवहन विभागाने आता नियमांचा दंडुका उगारला आहे. नवीन नियमावलीमुळे स्कूल बस आता अधिक सुरक्षित होणार आहेत.
परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, परिवहन विभागाचे आयुक्त दीपक कपूर यांच्या उपस्थितीत आज माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात "शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक' या विषयावर चर्चासत्र झाले. वाहतूक विभागाने प्रस्तावित नियमावलीबाबत या वेळी सूचना व हरकती ऐकून घेतल्या. या वेळी विद्यार्थी बस वाहतूक संघटनेने स्कूल बसचे आयुर्मान आठ वर्षे ठेवण्यास विरोध करीत ते वाढविण्याची मागणी केली. तसेच स्त्री काळजीवाहक मिळणार नाही, असा सूर लावला.
आजवर स्कूल बसला अपघात झाल्यास शाळा-व्यवस्थापन त्याची जबाबदारी झटकत असे; आता मात्र स्कूल बसच्या कंत्राटदारासह शाळेच्या मुख्याध्यापकांनाही जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे स्कूल बसच्या वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापनाला लक्ष देणे भाग पडणार असून, विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीला लगाम बसू शकेल.
स्कूल बसचा रंग पिवळा असावा, त्यावर दोन्ही बाजूंना निळा अथवा लाल रंगाचा पट्टा असावा, दोन्ही बाजूंना स्कूल बस म्हणून पाटी असावी; अन्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्कूल बसवर 10 इंचांचा निळ्या रंगाचा पट्टा असावा, स्कूल बसला उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असावा, स्कूल बसचालकाला वाहतुकीचा तीन वर्षांचा अनुभव असावा, चालक आणि काळजीवाहकाला पोलिसांकडून सद्‌वर्तनाचा दाखला घेणे बंधनकारक राहणार आहे. मुलींच्या स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्‍यक, बसचालकाचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे, बसचालक आणि काळजीवाहक यांनी वाहतूक विभागाकडून आपत्कालीन प्रशिक्षण घ्यावे. स्कूल बस रस्त्यावर उभ्या न करता विद्यार्थ्यांची ने-आण शाळेच्या आवारातून करावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, रक्तगट असे रेकॉर्ड असावे, खिडक्‍यांना ऍल्युमिनियमच्या जाळ्या बसवाव्यात आदी प्रस्तावित नियमावली आजच्या चर्चासत्रात मांडण्यात आली. परिवहन विभागाकडून या नियमावलीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही नियमावली विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना लागू करण्यात येणार असून, स्कूल बसबाबत शाळांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
या वेळी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्कूल बस वाहतूकदार, पालक संघटना, शाळांचे प्रतिनिधी यांच्या सूचना ऐकून घेतल्या. राज्यातील अन्य शहरांतही चर्चासत्रे आयोजित केली जाणार असून, त्यानंतर या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
...........
नवी नियमावली
* स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असाव्यात.
* उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असावा.
* आठ वर्षांपेक्षा जुन्या स्कूल बस वाहतुकीसाठी वापरू नयेत.
* बसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड, प्रथमोपचाराची पेटी व आगप्रतिबंधात्मक यंत्रणा ठेवणे बंधनकारक.
* मुलींच्या स्कूल बसमध्ये महिला काळजीवाहक आवश्‍यक.

चौकट :
परवाना नसल्यास कारवाई
स्कूल बससाठी तयार करण्यात आलेले नियम विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्‍सी, मारुती, टाटा सुमो आदी गाड्यांना लागू करण्यात येणार असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा परवाना घ्यावा लागणार आहे. परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई करू, अशी माहिती परिवहन सचिव संगीतराव यांनी दिली.
-----------------

No comments: