मुंबई, ता. 10 : राजकारणात गुन्हेगारांची वाढती संख्या आणि धनिकांच्या हाती जाणाऱ्या सत्तेच्या चाव्या याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हेच चित्र निर्माण झाले आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघांतील तब्बल 588 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. मुंबई आणि उपनगरातील सर्वाधिक 87 उमेदवारांचा यात समावेश आहे; तर 461 करोडपती उमेदवार जनतेकडे मतांचे "दान' मागत आहेत. नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थेने आज प्रसिद्ध केलेल्या पाहणी अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
एनईडब्ल्यू आणि सहकारी संस्थांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या अधारे ही पाहणी केली आहे. या पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा शिवसेना, भाजप आणि मनसे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या 153 उमेदवारांपैकी 98 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर भाजपच्या 114 पैकी 66, मनसेच्या 141 पैकी 81 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस आघाडी मात्र पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 112 पैकी 40 आणि कॉंग्रेसच्या 164 पैकी 56 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चेत राहणाऱ्या "बसप'च्या 276 उमेदवारांपैकी 47 उमेदवारांवर विविध गुन्हे आहेत.
करोडपतींमध्ये कॉंग्रेसचा वरचष्मा
करोडपती उमेदवारांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. राज्यात एकूण 461 करोडपती मतांचे "दान' मिळविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसचे 103, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 83, भाजपचे 59, मनसेचे 34, शिवसेनेचे 69, बसपचे 17 करोडपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उमेदवारांपैकी 58 टक्के उमेदवार करोडपती आहेत.
उच्च शिक्षणाच्या बाबतीत मात्र सर्व पक्षांच्या उमेदवारांची बोंब आहे. केवळ 36 टक्के उमेदवार पदवीधर आहेत. 580 उमेदवारांचे दहावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही; तर 1029 उमेदवारांकडे स्वतःचे पॅनकार्ड नसल्याचे पाहणीत उघड झाल्याचे नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
..................
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment