मुंबई, ता. 25 : हैवानालाही लाजवेल अशा पद्धतीने निरपराध नागरिकांची आणि पोलिसांची गोळ्या झाडून चाळण केली, त्या क्रूरकर्म्या अजमल कसाबचे आणि अतिरेक्यांच्या मृतदेहांचे संरक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आलीय. त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील... देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांना एव्हाना फासावर चढवायला हवे होते; मात्र त्यांचे चोचले पुरविले जात आहेत. हीच गोष्ट मनाला डागण्या देतेय... अशा शब्दांत मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्याला पकडण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची मुलगी वैशाली हिने "सकाळ'कडे आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
मुंबईवर झालेल्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला पकडण्यासाठी ओंबळे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यामुळे आज पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्याची संधी भारताला लाभली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे; मात्र या हल्ल्यातील आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही. याची खंत वैशालीसह सर्व हुतात्म्यांच्या नातेवाइकांना आहे.
अतिरेक्यांच्या एके-47 रायफलला वाघाच्या छातीने सामोरे जाणाऱ्या तुकाराम ओंबळे यांच्यातील प्रेमळ बाबांच्या आठवणी ओंबळे कुटुंबीयांच्या मनात कायम घर करून राहिलेल्या आहेत. या आठवणींना उजाळा देताना वैशालीला भावना आवरल्या नाहीत. ""बाबांना लहान मुले खूप आवडायची. त्यांच्याशी खेळायला त्यांना आवडायचे. चांगले माणूस म्हणून जागा. लोकांच्या उपयोगी पडा'', अशी त्यांची शिकवण होती. म्हणूनच मी शिक्षक व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. बाबांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा कर्ता-धर्ता हरपला. त्यामुळे आमचे कशातच मन रमत नव्हते. मात्र या साऱ्या अडचणींवर मात करीत हे कुटुंब खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बी.एड्. पूर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे'', असे वैशाली अभिमानाने सांगते.
रक्षाबंधनच्या दिवशी ते आम्हाला त्यांना राखी बांधायला सांगत. आम्ही त्यांच्या मुली होतो आणि बहिणीही. असे त्यांचे प्रेमळ वागणे होते. गतवर्षी 26 नोव्हेंबरला मला केक खाण्याची इच्छा झाली होती. मी आईला म्हटले बाबांनी आज केक आणला, तर किती बरे होईल. तेवढ्यातच नाईट ड्युटी संपवून सकाळी 10 वाजता बाबा घरी आले. तेव्हा त्यांच्या हातात केक होता. मी त्यांना विचारले, "बाबा तुम्हाला कसे कळले, मला केक खायचा आहे...' त्यावर ते हसत म्हणाले, "मी तुमचा बाप आहे. मुलांची इच्छा बापालाच कळणार.' त्या वेळी पुढच्या संकटाची कोणालाच कल्पना आली नाही. त्याच दिवशी रात्री अतिरेक्याला पकडताना बाबा हुतात्मा झाले, असे सांगताना वैशालीचा कंठ दाटून आला.
मुंबईसह देशभरातील लोकांनी आम्हाला आधार दिला. लोक पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आम्ही सावरू शकलो; पण आता सहानुभूतीच्या पाठलाग करणाऱ्या नजराही आम्हाला नकोशा वाटतात. शासनाने कितीही मदत दिली तरी आमचे बाबा परत येणार नाहीत. देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा, त्यांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहेच; पण त्या एके-47 रायफलला वाघाच्या छातीने सामोरे जाणाऱ्या प्रेमळ बाबांच्या आठवणी मनात कायम घर करून राहिल्या आहेत.
इन्फोबॉक्स :
बदलीची टांगती तलवार आणि कामाचे अमर्याद तास, कमी पगार या समस्या असल्याने बाबांना आम्ही पोलिस दलात जावे, असे वाटत नव्हते; मात्र आपल्या खात्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची त्यांची वृत्ती होती. त्याच भावनेतून प्राणाची आहुती दिली. 26/11 च्या घटनेतून धडा घेऊन सरकारने पोलिसांच्या कामाचे तास कमी केले पाहिजेत. त्यांना अत्याधुनिक शस्त्रे द्यावीत. सोई-सुविधा द्याव्यात, अशी मागणी तिने या वेळी केली.
........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment