Wednesday, December 23, 2009

दलित समाजातील युवकांचा मनसेकडे ओढा

मुंबई, ता. 7 : रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांना आंबेडकरी जनता कंटाळलेली असतानाच आता उरलीसुरलेली युवाशक्तीही मनसेकडे आकर्षित होत आहे. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी समाजातील युवकांशी संवाद साधला असता बहुतांशी युवकांनी आपल्याला राज ठाकरेंचा करिष्मा खुणावत असल्याचे सांगितले. दलित तरुणांचा ओढा मनसेकडे असल्याने रिपब्लिकन नेतेही चिंतेत पडले आहेत.

रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले झाली आहेत. ऐक्‍याच्या आणाभाका नेत्यांनी प्रत्येक महापरिनिर्वाणदिनी घेतल्या. पुढे त्या मोडल्याही. नेत्यांच्या आपापसातील कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या आंबेडकरी जनतेचा नेत्यांवर विश्‍वास राहिलेला नाही. पक्षाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. परिणामी परिब्लिकन पक्षाचा उरलासुरला जनाधारही तुटला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आले. दलित पॅंथर भरात असताना रिपब्लिकन चळवळीकडे आकृष्ट झालेला युवक पॅंथर फुटल्यानंतर संभ्रमात पडला. रिपब्लिकन पक्षात सध्या युवा कार्यकर्त्यांची वानवा निर्माण झाली असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी अस्तित्वात नाही. या पार्श्‍वभूमीवर चैत्यभूमीवर दाखल झालेल्या आंबेडकरी समाजातील युवकांशी संवाद साधला असता सध्या युवकांत असणारा "मनसे बूम' येथेही जाणवला. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणाला आपण कमालीचे कंटाळलो असल्याचे युवकांनी सांगितले. तुम्हाला कोणत्या पक्षाचे काम करायला आवडेल, असे विचारले असता बहुतांशी युवकांनी "मनसे' असे उत्तर दिले. "राज ठाकरे यांचा करारी स्वभाव आवडतो. मनसेत जातपात मानली जात नाही. त्यामुळे त्या पक्षात काम करायला आवडेल', असे पाचोरा येथून आलेल्या दिनेश ब्राम्हणे या युवकाने सांगितले. कोकणातून आलेल्या रूपेश कांबळे या युवकाला मनसेच्या झेंड्यात निळा रंग असल्याने हा पक्ष आंबेडकरी विचारांना मानणारा आहे, असे वाटते. "राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातील विचारांचा अनेक वेळा दाखला दिला आहे. त्यामुळे मनसे अन्य पक्षांपेक्षा बरा वाटतो', असे त्याने सांगितले.
नागपूर, जालना, पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून आलेल्या युवकांनीही आपल्याला मनसेचे राजकारण आवडते, अशी प्रतिक्रिया दिली. तर "मनसे'चे राजकारण बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या परस्परविरोधी आहे. त्यामुळे हा पक्ष आंबेडकरी विचारांचा विरोधक असल्याचे मत अमर कांबळे, अरुण मोरे या युवकांनी नोंदविले. मनसेचे मारझोडीचे राजकारण घातक असल्याचेही काहींनी नमूद केले.
दरम्यान, युवकांचा बदलता कल पाहून रिपब्लिकन नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच रामदास आठवले यांना मनसेचे राजकारण आंबेडकरी विचारांच्या विरोधी असल्याची टीका चैत्यभूमीवरील जाहीर सभेत करावी लागली. प्रा. जोगेंद्र कवाडे, ऍड्‌. संघराज रूपवते यांनाही मनसेच्या झेंड्यातील निळ्या रंगाला युवकांनी भुलू नये, असे आवाहन करावे लागले. तसेच रिपब्लिकन पक्षांची युवक संघटना मजबूत करून तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले.
..................

No comments: