Wednesday, December 23, 2009

मतदारांची "कृपा' कॉंग्रेसवर?

कालिना विधानसभा मतदारसंघात या वेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि शिवसेना-भाजप युतीचे ऍड. दीनानाथ तिवारी यांच्यात प्रमुख लढत होणार असून, मनसेच्या चंद्रकांत मोरे यांचे "रेल्वे इंजिन' युतीच्या मार्गात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कालिनामध्ये "कमळ' फुलण्याची शक्‍यता कमी आहे. कॉंग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांचा "हात' उत्तर भारतीय आणि झोपडीवासीयांच्या "साथ' राहिल्याने त्याचा फायदा कृपाशंकर यांना होणार आहे.

सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कालिना हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता; मात्र दिल्लीतील वजन वापरून कृपाशंकर सिंह यांनी कालिनाची उमेदवारी मिळविली. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कृपाशंकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कृपाशंकर यांना विजयाची खात्री वाटत आहे.

कालिना मतदारसंघात उत्तर भारतीय, मुस्लिम आणि झोपडीवासीय मतदारांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन भाजपनेही येथून ऍड. तिवारी यांच्या रूपाने अमराठी उमेदवार देऊन कृपाशंकर सिंह यांना शह दिला आहे. त्यामुळे येथे खरी टक्कर या दोन अमराठी उमेदवारांत होईल. ऍड. तिवारी यांचाही मतदारसंघात चांगला संपर्क आहे. उत्तर मध्य मुंबई जिल्हा भाजपचे ते अध्यक्ष आहेत. मृदू स्वभाव आणि मतदारांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या कलेचा त्यांना फायदा होऊ शकतो. मनसेचा मराठी उमेदवार रिंगणात असल्याने येथील मराठी मते भाजपच्या पारड्यात किती पडतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

मनसेने लोकसभा निवडणुकीत पहिल्याच दणक्‍यात या मतदारसंघात 23 हजार 678 मतांची कमाई केली होती. विधानसभेतही हा प्रभाव कायम राहिल्यास त्याचा तडाखा युतीच्या उमेदवाराला बसेल. कॉंग्रेस आघाडी आणि युतीच्या अमराठी उमेदवारांसमोर चंद्रकांत मोरे यांना मनसेने आखाड्यात उतरविले आहे. दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार अमराठी असल्याने मराठी मते "रेल्वे इंजिना'वर पडण्याची शक्‍यता आहे; मात्र या दोन उमेदवारांच्या तुलनेत मनसेचे मोरे यांचा राजकीय अनुभव कमी आहे. मतदासंघातील त्यांचा संपर्क कमी आहे. त्यामुळे आपले चिन्ह आणि चेहरा संपूर्ण मतदारसंघात पोहचविण्यासाठी त्यांना जास्त कष्ट करावे लागत आहेत. अमराठी भाषकांचा मतदारसंघ असल्याने त्यांच्या मराठी बाण्यालाही येथे प्रचारात हिंदीचा साज चढवावा लागला आहे. हिंदी भाषेतील प्रचारपत्रके वाटून त्यांना मतदारांना साकडे घालावे लागत आहेत.
एकूणच येथील अमराठी मतदारच निकाल ठरविणार असून, त्यामुळे कॉंग्रेसला विजयाची अधिक संधी दिसते.

झोपडपट्टी पुनर्वसन आणि पावसाळ्यात कालिना परिसरात भरणारे पाणी आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळशेजारील झोपडीवासीयांचे पुनर्वसन आदी प्रमुख प्रश्‍न या मतदारसंघात आहेत.
......
कालिना विधानसभा मतदारसंघ
पुरुष - 142798
स्त्री - 110245
एकूण - 253058

No comments: