तेव्हा आर. आर. यांनी आवाज का उठवला नाही?
ंमुंबई, ता. 14 : धान्यापासून दारू गाळण्याच्या प्रकल्पांना यापुढे परवानगी दिली जाणार नाही, ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांची घोषणा फसवी आहे. सन 2007 मध्ये सरकारने धान्यापासून दारू गाळण्यास मंजुरी दिली तेव्हा उपमुख्यमंत्रिपदी असणारे आबा मूग गिळून का बसले होते, असा सवाल भीमशक्ती विचार मंचचे अध्यक्ष चेतन कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
धान्याधारीत मद्यार्क योजनेचा लाभ उठविण्यात सत्ताधारी पक्षातील माजी मंत्री, नेते यांचाच पुढाकार असून सत्ताधारी आणि विरोधकांचे धोरण एकाच प्याल्यातले आहे, असा आरोप त्यांनी केला. धान्यापासून दारू गाळण्यास मोठ्या प्रमाणावर सुरवात झाल्यास सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास हिरावला जाईल. सरकारने राज्याची मधुशाला करण्याचे धोरण आखले आहे, अशी चौफेर टीका सरकारच्या निर्णयावर झाल्यानंतर यापुढे धान्यापासून दारू गाळण्याच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही, असे आर. आर. पाटील यांनी घोषित केले; मात्र आबांचे हे आश्वासन म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. राज्य मंत्रिमंडळाने सन 2007 मध्ये राज्यात 23 धान्याधारित मद्यार्क प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यांना मुक्त हस्ते सबसिडी दिली आहे. तेव्हा आबांना सर्वसामान्यांची आठवण झाली नाही का? त्यांनी त्या वेळी मौन धारण का केले, असे प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केले.
राज्यात यापूर्वीच सोलापूर, लातूर, अमरावती, सातारा येथे धान्यापासून दारू गाळण्याचे प्रकल्प सुरू आहेत. साधारणतः 25 हजार टन ज्वारीपासून एक कोटी लिटर दारू गाळली जाते. जर सर्वच कारखाने पूर्ण क्षमतेने दारू गाळू लागले तर जनतेला खायला अन्न मिळणार नाही. सडलेल्या धान्यापासून दारू गाळली जाईल, असे सरकारमार्फत सांगितले जात असले, तरी असे किती टन धान्य सडते? या माध्यमातून लोकांना जास्त पैसे मिळाले, तर शेतकरी धान्य दारूसाठी सडवणार नाहीत, याची खात्री कोण देणार? त्यामुळे धान्यापासून दारू गाळण्यास परवानगीच देऊ नये, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
धान्याधारित मद्यार्क योजनेचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी पक्षातील माजी मंत्री, नेते आणि त्यांचे नातेवाईक आघाडीवर आहेत. विरोधी पक्षही त्यात मागे नाहीत. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार गोविंदराव आदिक, माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे यांच्यासह बड्या नेत्यांचे दारू गाळण्याचे प्रकल्प माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाल्याचे कांबळे यांनी सांगितले.
हे आहेत प्रकल्पांचे संचालक
- विराज अल्कोहोल ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. कपारी, शिराळा. संचालक : मानसिंग नाईक, रामसिंग नाईक.
- अल्कोप्लस प्रोड्युसर्स प्रा. लि. संचालक : अमित आणि धीरज (विलासराव देशमुख यांचे पुत्र).
- मे. आनंद डिस्टिलरीज, अमरावती. संचालक : आनंद व अभय भमोरे.
- मे. धवल प्रतापसिंह मोहिते-पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज, सोलापूर. संचालक : धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील.
- मे. व्हिक्टोरिया ऍग्रो फूड प्रोसेसिंग. संचालक : संभाजीराव दिलीपराव पाटील.
- जी. एन. ऍग्रो केमिकल्स, सोलापूर. संचालक : शशिकांत बिराजदार (उपमहापौर, नवी मुंबई).
- मे. रॅडरीक एन. व्ही. डिस्टिलरीज. संचालक : पंकजा चारुदत्त पालवे, चारुदत्त पालवे. (गोपीनाथ मुंडे यांची कन्या व जावई).
- मे. मुकुंदराज शुगर मॅन्युफॅक्चरिंग, बीड. संचालक : विमल मुंदडा (माजी आरोग्यमंत्री).
- मे. सिद्धिविनायक एंटरप्रायजेस, कोल्हापूर. संचालक : विनायक सुभाष सोनावणे, विक्रांत सोनावणे.
.......................
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Good article.We should take a stand against this kind of actions.
For more information please visit http://foodtoalcohol.wordpress.com/
Post a Comment