मुंबई, ता. 24 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार बशीर पटेल यांनी आज नाट्यमय घडामोडींनंतर समाजवादी पक्षात प्रवेश केला असून समाजवादी पक्षातर्फे त्यांनी मुंबादेवी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, "सपा'चे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी 17 उमेदवारांची आज घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमरखाडी येथील आमदार बशीर पटेल यांच्या मतदारसंघात पुनर्रचनेनंतर मोठा फेरबदल झाल्याने लगतच्या मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती; मात्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण फडकावत ते "सपा'त दाखल झाले आहेत. कॉंग्रेसशी आघाडी असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या बशीर पटेल यांच्याऐवजी नवाब मलिक मंत्री झाल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी समाजवादी पक्षाला अलविदा करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र या वेळी जागावाटपात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आहे. मुंबादेवी मतदारसंघातून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते आता तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी बशीर पटेल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आमदार पटेल मात्र या वेळी उपस्थित नव्हते. आझमी यांनी "सपा'च्या 17 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवार पुढीलप्रमाणे : नवापूर- संजय गवळी, सिंदखेड- विजयसिंग राजपूत, बाळापूर- डॉ. सुधीर ढोले, रिसोड- शिवा बंगी, मालेगाव- चंद्रशेखर देवरे, नाशिक मध्य- सय्यद मुशीर, कोपरी- पाचपाखाडी- रामनारायण यादव, दिंडोशी- श्रीकांत मिश्रा, वर्सोवा- चंगेश मुलतानी, कालिना- अहमद आझमी, वांद्रे (पश्चिम)- रिझवान मर्चंट, वांद्रे (पूर्व)- शब्बीर हुसेन, भायखळा- सर्फराज आरजू, मुंबादेवी- बशीर पटेल, इंदापूर- वसंत मोरे, चिंचवड- राम शरमाळे, कसबा पेठ- अनिल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची घोषणा उद्या (ता. 25) करण्यात येणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
कॉंग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याक दलितांवर अन्याय केला आहे. त्याचा जाब राज्यातील जनता कॉंग्रेसला निवडणुकीत विचारेल, असा विश्वास अबू आझमी यांनी व्यक्त केला.
.......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment