Wednesday, December 23, 2009

ऐक्‍याचा केवळ जप; नेत्यांची तोंडे परस्परविरुद्धच


मुंबई, ता. 4 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन आणि शिवाजी पार्कच्या हिरवळीवरील रिपब्लिकन ऐक्‍याच्या कोरड्या घोषणा, हे वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत मर्यादित अर्थाने ऐक्‍य झाले; पण त्याचा परिणाम मात्र रिपब्लिकन जनता अधिक विमनस्क होण्यात झाला. त्यामुळे येत्या रविवारी ऐक्‍याची राहुटी शिवाजी पार्कवर पडणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांत शंका आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी 6 डिसेंबरनिमित्त बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी "मला यावर काही बोलायचे नाही', असे सांगून विषय संपविला.
बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या गोरगरीब जनतेचा महासागर 6 डिसेंबर (महापरिनिर्वाणदिन) रोजी दादर येथील चैत्यभूमीवर लोटतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी गोळा होते. ही आयतीच संधी साधून रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटाचे नेते आपापल्या स्वतंत्र सभा घेऊन भाषणे ठोकतात. वेळोवेळी ऐक्‍याची गाजराची पुंगी वाजविली जाते. ऐक्‍य व्हावे अशी आजवर जनतेची इच्छा व तसा दबाव असे; आता मात्र या ऐक्‍यावर विश्‍वास राहिलेला नाही. हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. रिपब्लिकनच्या काही गटातटांनी रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्यासह एकत्रित येऊन एकीकृत रिपब्लिकन म्हणून रिडालोसला सोबत घेऊन निवडणूक लढवली; पण रिपब्लिकन पक्षाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. त्यामुळे यावेळी ऐक्‍याच्या घोषणेतील हवा गेली असून नेत्यांना काहीतरी वेगळी घोषणा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या ऐक्‍यात रिपब्लिकनचे प्रमुख गट सामील झाले नाहीत. भारिपचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉ. राजेंद्र गवई, टी. एम. कांबळे बाहेर राहिले. त्यामुळे महापरिनिर्वाणदिनाला येणाऱ्या जनतेसमोर होणाऱ्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाच्या अभिवादन सभेत ऍड. प्रकाश आंबेडकर सामील न झाल्याने अपयश आले, असे दाखविण्याचा प्रयत्न हे नेते करण्याची शक्‍यता आहे. ऍड. आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यांनी ऐक्‍य करून त्याचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडत प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले यांनी आंबेडकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
"प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत', असे रामदास आठवले आणि कवाडे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. ऐक्‍यातून बाहेर पडून पुन्हा कॉंग्रेसच्या गोटात दाखल झालेल्या डॉ. राजेंद्र गवई यांनीही "प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यासह प्रमुख नेत्यांचे ऐक्‍य झाले तरच आपल्याला त्यात रस आहे. अन्यथा वाघ आणि उंदरांचे ऐक्‍य होऊ शकत नाही', असे सांगत ऐक्‍यात फारसा रस नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यावेळीही ऐक्‍याचे वारे कोरडेच राहणार असून नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करणार, असे मानले जाते.

No comments: