वृत्तसेवा मुंबई, ता. 10 : माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी मी पूर्ण करू शकलो नाही तर तुम्हाला पुन्हा तोंड दाखविणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील "मनसे'च्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांच्या प्रचारासाठी एव्हरार्डनगर येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते.लोकसभेत लाचार माणसे खासदार म्हणून पाठवलीत तर प्रश्न कसे सुटणार? राज्याच्या भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकही खासदार संसदेत बोलला नाही. कारण त्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. पैशाची कामे रखडतील म्हणून ते बोलत नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. माझ्या उमेदवारांना एक संधी द्या. त्यांच्यावर माझा अंकुश असेल, ते कसे बोलत नाहीत ते मी बघेन, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेप्रमाणे "मनसे'तही रिमोट कंट्रोलचे राजकारण राहील, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.राज यांनी कॉंग्रेस आणि शिवसेना-भाजपवरही टीकेची झोड उठवली. कॉंग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अफजल गुरूला फाशीची भाषा करणारे भाजपवाले देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रकरणातील आरोपींचे पैशासाठी वकीलपत्र घेणाऱ्या राम जेठमलानींना आणि आता त्यांच्या मुलाला उमेदवारी देतात, अशी टीका त्यांनी केली. राममंदिर बांधणार बांधणार म्हणता, बांधा ना मंदिर, मग तुम्हाला अडवले कोणी? निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भूलथापा देण्याचे आता बंद करा, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. शिवसेनेच्या मराठी प्रेमावरही त्यांनी सडकून टीका केली. एनडीए सरकारमध्ये असताना शिवसेना सीमाप्रश्नावर का बोलली नाही, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. सगळ्याच पक्षांच्या जाहीरनाम्यात दहा वर्षांपूर्वीचेच मुद्दे आहेत. एवढ्या वर्षांत कोणतेच प्रश्न सुटले नाहीत हे यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. प्रिया दत्त यांना खासदार म्हणून मतदारसंघात कोणी ओळखत नाही. त्यांनाच पुन्हा निवडून देणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अबू आझमींचाही त्यांनी समाचार घेतला. आपला पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment