Thursday, July 30, 2009

जीव गेला तरी बेहत्तर, आता माघार नाही!

एक ऑगस्टपासून "ऐलान-ए-जंग'
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 28 : "उपोषणाचा इशारा दिला की, सरकारने आश्‍वासने देऊन स्वतःची सुटका करून घ्यायची व पुढे काहीच करायचे नाही, हे आता चालणार नाही. आपल्या मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय दिल्याशिवाय माघार घेणार नाही. मग जीव गेला तरी बेहत्तर', अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सरकारच्या विरोधात 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणाऱ्या "ऐलान-ए-जंग'चा निर्धार व्यक्त केला. या लढाईत जनतेने रस्त्यावर उतरून साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.पीपल्स ऍक्‍शन कमिटी आणि लोकभारतीच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात "शिक्षण, आरोग्याचे बाजारीकरण आणि शिक्षणाचे गुन्हेगारीकरण या विरोधातील इशारा सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती दरवर्षी संकेतस्थळावर जाहीर करावी, नगरसेवकांना परत बोलाविण्याचा कायदा करावा, विकासनिधीच्या खर्चासाठी वॉर्ड सभेची मंजुरी घेण्याचा कायदा करावा, निवडणुकीत नापसंतीचा अधिकार द्यावा, दारूबंदीचा कायदा अंमलात आणावा, राज्यातील पतसंस्था व बॅंकांमधील ठेवी बुडालेल्या ठेवीदारांचा पैसा सरकारने द्यावा, आदी मागण्या हजारे यांनी केल्या आहेत. मी काही पक्षांच्या विरोधात निवडणुकीच्या तोंडावर आंदोलने करतो असा काही लोकांना भास होतो. पण कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. कोणी भ्रष्टाचारात ग्रॅज्युएशन केले आहे तर कोणी पीएचडी केली आहे. त्यामुळे कोणाची बाजू घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चर्चा झाली. मात्र राज्याच्या ग्रामीण भागात गावगुंडांच्या दहशतीखाली जगणाऱ्या जनतेची अवस्था त्याहीपेक्षा वाईट असून सरकारला त्याची अजिबात काळजी नाही.महाष्ट्राचा बिहार करणार काय ?राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव झाला आहे. बिहारमधले सुपाऱ्यांचे लोण राज्यातही आले आहे. माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली. राजकारणी महाराष्ट्राचा बिहार करीत असून सत्ताधारी बेहोश झाले आहेत, अशी टीका हजारे यांनी केली. येत्या निवडणुकीत जनतेने चारित्र्यवान प्रतिनिधी निवडावेत. राजकारणाला गटारगंगेची अवकळा आली असली तरी ती साफ करण्यासाठी चांगल्या लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. इशारा सभेत बोलताना आमदार कपिल पाटील यांनी व खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा केल्याचे त्यांनी सांगितले.
..........
27/7/09

No comments: