Saturday, July 25, 2009

डॉक्‍टरांअभावी राज्यातील शासकीय रुग्णालये अत्यवस्थ

रिक्त पदांचा सुकाळ; जनतेच्या आरोग्याची हेळसांड
योगेश पवार : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 : राज्य सरकारच्या आरोग्य सेवेतील "अ' वर्ग दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुमारे दोन ते अडीच हजार पदे रिक्त आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्‍टरांचाही दुष्काळ आहे. त्यामुळे राज्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची हेळसांड होत असून, रुग्णालयांची स्थिती अत्यवस्थ झाली आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपकरणांसह तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत, अशी स्थिती बहुतांश ठिकाणी आढळते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. परिणामी येथील रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणेसारख्या शहरात धाव घ्यावी लागते, तर काही वेळा रुग्ण उपचारांअभावीच मृत्यूपंथाला लागतात.सध्या आरोग्य खात्यात "अ' वर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ आदी; तसेच पदव्युत्तर पात्रता असणाऱ्या डॉक्‍टरांच्या सरासरी 50 टक्के जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, अशी माहिती "आरोग्य सेवा अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य' यांनी दिली.राज्यात 1,817 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण, कुटीर, उपजिल्हा रुग्णालये यांची संख्या 443 असून, मनोरुग्णालय, स्त्रीरुग्णालय, क्षयरोग रुग्णालये 17 व जिल्हा रुग्णालये 23 आहेत. शासकीय सेवेत मिळणारा कमी पगार आणि सुविधा यामुळे डॉक्‍टरांची नवी पिढी सरकारी सेवेकडे वळत नसल्याचे मत आरोग्य सेवा अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अशोक कांबळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. जिल्हा रुग्णालये, मनोरुग्णालये, स्त्रीरुग्णालये, कुटीर व उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्यवसाय रोध भत्ता मिळत नाही. हा भत्ता सुरू केल्यास; तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोग शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होईल. त्यामुळे केवळ पैसे नाहीत म्हणून खासगी सेवेकडे वळणारे तज्ज्ञ डॉक्‍टर शासकीय सेवेकडे वळतील, असा विश्‍वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.
वर्ग मंजूर जागा रिक्तवैद्यकीय अधिकारी
गट "अ'- 7281 2200
जिल्हा शल्यचिकित्सक- 611 371
जिल्हा आरोग्य अधिकारी- 277 96
तज्ज्ञ डॉक्‍टर- 516 348
................................................

No comments: