Thursday, July 30, 2009

भाजप आळवतोय "चलो ! फिर दीप जलाये'

लोकसभेतील पराभवाचे चिंतन; विधानसभेची तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे मुंबईत पानिपत झाल्याने भाजपची अवस्था "भरी दुपहारी में अंधियारा...' अशी झाली आहे. निराश झालेल्या युतीच्या कार्यकर्त्यांत पुन्हा नव्याने जान फुंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काव्य पक्तींचाच आधार सध्या वाटत आहे. लोकसभा निवडणुकीतील श्रम परिहार करण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी "भरी दुपहारी में अंधियारा...चलो ! फिर दीप जलाये...' चे सूर आळवत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून माजीमंत्री राम नाईक तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून ऍड्‌. महेश जेठमलानी हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले. या पराभवाने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने लोकसभेतील पराभवाची मरगळ झटकून कार्यकर्त्यांना रिफ्रेश करण्यासाठी भाजपने मेळावे सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाट्याला आलेला पराभव हे वास्तव असले तरी त्याचा सूड आपण विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ, असा इशारा विरोधकांना दिला आहे. लोकसभेच्या निकालामुळे कार्यकर्त्यांनी हताश होण्याचे कारण नाही. लोकसभेत जनतेने ना "भाजप'ला पूर्णपणे नाकारले ना कॉंग्रेसला संपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळे पक्षाला अजूनही चांगली संधी आहे, असा दावा तावडे यांनी केला.केंद्रीयमंत्री राम नाईक यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात मनसेमुळे कॉंग्रेसचा विजय झाला व आपल्याला हार पत्करावी लागल्याचे सांगितले. आगामी काळात राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून नवीन रणनीती ठरविण्याची गरज असल्याचे राम नाईक यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची, "चलो ! फिर दीप जलाये' कविता म्हटली. मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या निवडणुकीतही लोकसभेतील आव्हानेच पुढे उभी राहणार असल्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य वेधले. तर शिवसेना विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांनी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून उत्तर मुंबईत पुन्हा युतीचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला उत्तर मुंबईतील युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
.........
5/6/06

No comments: