लोकसभा निवडणूक ः "नॅशनल इलेक्शन वॉच'चा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 : विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 लोकसभा मतदारसंघांत तब्बल 41 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यात शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रत्येकी चार उमेदवारांचा समावेश आहे, असा दावा "नॅशनल इलेक्शन वॉच' या सामाजिक संस्थेने आज पत्रकार परिषदेत केला. सत्तावीस करोडपती उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शिक्षणाच्या दृष्टीनेही उमेदवारांची बोंब असल्याचे सांगण्यात आले.राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना नॅशनल इलेक्शन वॉचने राज्यातील पहिल्या टप्पात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांच्या कुंडलीवर प्रकाशझोत टाकला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 जागांसाठी तब्बल 223 उमेदवार रिंगणात आहेत. पैकी 41 उमेदवारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक मतदारसंघात दोन-तीने उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. चंद्रपूर आणि अमरावती मतदारसंघात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. अपक्ष 95 उमेदवारांपैकी 11, तर अन्य पक्षांच्या 83 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी चार, बसपचे पाच, तर कॉंग्रेसचे सात करोडपती उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. अकोला, हिंगोली, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ-वाशिम येथे करोडपती उमेदवारांची संख्या जास्त आहे. शिक्षणाच्या बाबतीतही भावी नेत्यांची जागृती फारशी उत्साहवर्धक नाही. सुमारे 100 उमेदवार पदवीधर आहेत, तर 58 उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंतही झालेले नाही.कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड आवश्यक बनले असताना विदर्भ मराठवाड्यातील 151 उमेदवारांकडे पॅन कार्ड नाही. करोडपती उमेदवारांचाही यात समावेश असल्याचे संस्थेचे संचालक अजित रानडे यांनी सांगितले. आपला प्रतिनिधी निवडून देताना मतदारांमध्ये जागृती व्हावी, यासाठी आपण ही माहिती उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे, असे रानडे यांनी स्पष्ट केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment