Thursday, July 30, 2009

बाजारात तुरी...

लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात विधानसभा निवडणुकीची पोळी भाजण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. विधानसभेच्या निवडणुकाही काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या पुढाऱ्यांनी लोकसभेच्या प्रचारात जरा जास्तच झोकून दिलं होतं. काहीजण तर आपणच उमेदवार असल्याच्या थाटात कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात फिरत होते; तर काही "आमदार झालोच', अशा थाटात वावरत होते. मुंबईतल्या कॉंग्रेसच्या एका स्टार उमेदवाराच्या प्रचारातही असाच एक स्थानिक नेता सहभागी झाला होता. या महाशयांना विधानसभेचं स्वप्नं पडलं आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान फिरताना त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा त्यांच्या सोबतच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याला बोलून दाखविली. त्यावर साहेबांच्या सुरात सूर न मिसळता त्या कार्यकर्त्याने त्याला "तुम्ही विधानसभेवर निवडून येणार नाही... पडाल', असं प्रामाणिकपणं सांगितलं. त्यामुळं "महत्त्वाकांक्षी' नेत्याचं टाळकं भडकलं. त्यानं रागाच्या भरात त्या कार्यकर्त्याच्या पार्श्‍वभागावर लत्ताप्रहार केला. "माझं खाऊन माझ्या विरोधात बोलतोस...', असं सुनावलं. या अपमानामुळे कार्यकर्ताही भडकला. त्यानंही नेत्यावर प्रतिहल्ला करीत लत्ताप्रहार केला आणि दोघांच्यात चक्क हाणामारी सुरू झाली. अखेर आजूबाजूचे हा तमाशा पाहणारे कार्यकर्ते धावत आले. त्यांनी हे भांडण सोडवलं. मग वरिष्ठ नेत्याच्या कोर्टात वाद गेला. वरिष्ठांनी विधानसभेचं अजून कशात काही नसताना तुम्ही पडणार की निवडून येणार यावरून का हाणामारी करता, असा सवाल केला. तेव्हा दोघंही निरुत्तर झाले.
..........
योगेश पवार...

No comments: