सकाळ/वृत्तसेवा
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचा झपाट्याने विकास होत आहे. या विकासात सुसूत्रता असावी. हे शहर न्यूयॉर्क, टोकियो या शहरांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांशी स्पर्धा करणारे असावे; मात्र शहराचा विकास करताना त्याचा मानवी चेहरा हरवता कामा नये, यासाठी मी येत्या पाच वर्षांच्या काळात अधिक जोमाने काम करणार आहे. तसेच मुंबईच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करू, अशी ग्वाही लोकांशी "हार्ट टू हार्ट' संवाद साधणारे नवनिर्वाचित खासदार एकनाथ गायकवाड यांनी "सकाळ'च्या "मुंबई टुडे'च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त दिली. मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रश्नांचा वेध घेणाऱ्या "मुंबई टुडे'च्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा देताना गायकवाड यांनी मुंबईच्या समस्या आणि त्यांचे निराकरण याविषयी आपली स्पष्ट मते मांडली. दिल्लीत सेंटर हॉलच्या छताखाली अन्य राज्यातील खासदार एकत्रित येऊन त्यांच्या राज्यातील विकासकामांबाबत धोरणे ठरवतात; मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रातील खासदार कोणत्याच प्रश्नावर एकत्रित येत नाहीत. मुंबईतून आम्ही कॉंग्रेसचे सहा खासदार दिल्लीत गेलो आहोत, तर महाराष्ट्रातील एकूण 48 खासदार दिल्लीत आहेत. या सर्वांनी अन्य राज्यांच्या खासदारांप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे. यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे.विकास निधीसाठी पाठपुरावांमुंबईच्या विकासाचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहेत. वाहतुकीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या "मोनो रेल', "मेट्रो रेल' प्रकल्पासाठी विकास निधी उपलब्ध व्हावा, म्हणून केंद्रात पाठपुरावा करणार आहे. मिठी नदी विकास प्रकल्प, ब्रिमस्टोवॅड, मुंबईला पाणीपुरवठा करणारा मध्य वैतरणाचा प्रकल्प यांसाठी निधी मिळावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा ही जीवनवाहिनी आहे. या सेवेवर पडणारा ताण कमी व्हावा, रेल्वेच्या विकास योजनांना निधी मिळावा यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करणार आहे. मुंबईतील विकासाचे हे प्रकल्प मार्गी लागले तरच मुंबईकरांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे.विकासाला मानवी चेहरा हवा मुंबईचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने बदलत आहे; मात्र यातून सामान्य माणूस दूर फेकला जाऊ नये, त्यालाही सहज जीवन जगता येईल असा विकास असावा, असा माझा प्रयत्न आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजना राबविताना केवळ सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. यात बदल झाला पाहिजे. "एसआरए' योजना राबविताना तेथील रहिवाशांचा सर्वंकष विकास लक्षात घ्यायला हवा. त्यांना आरोग्य, शैक्षणिक सुविधेसह सर्व सुख-सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी मी सरकारी पातळीवर आग्रही आहे. सामान्य माणसाला आयुष्यात एकदाच घर मिळते. त्यामुळे त्याला मिळणारे घर दर्जेदार असायला हवे. यासाठी "एसआरए'च्या योजना अधिक चांगल्या व्हाव्यात. जनतेचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धारावीच्या झोपडपट्टी विकासाची योजनाही मानवी चेहरा असणारी असावी, असा माझा प्रयत्न आहे. येथील लोकांना घरे मिळावीत, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठीही मी प्रयत्नशील राहणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न सध्या आवासून उभा आहे. शहरात रोजगार उपलब्ध व्हावेत, आर्थिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण झाले तरच रोजगार उपलब्ध होईल आणि बेरोजगारीची समस्या सुटेल. शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन काही लोक राजकारणासाठी कृत्रिम शत्रू उभा करीत आहेत. कधी उत्तर भारतीय, कधी दलित, कधी छत्रपती शिवाजी महाराज, अशा भावनिक मुद्द्यांना हात घालून मूळ प्रश्नांपासून दूर नेत आहेत. उत्तर भारतीय लोक मुंबईत येऊन व्यवसाय करतात. ते व्यवसाय येथील स्थानिक मराठी माणूस का करीत नाही? स्थानिकांनी हे रोजगार हस्तगत केले तर अन्य लोकांना तेथे शिरकाव करण्याची संधीच राहणार नाही. त्यामुळे मराठी माणसाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. भाषा, प्रांत, विभाग यांचे लढे उभारून मुंबईचा विकास होणार नाही. जनतेच्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक विकासाकडे लक्ष द्यायला हवे. आज उत्तर भरतीयांविरोधात लढणारे दलित, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींना त्यांच्या विकासासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधांच्या विरोधात आंदोलने करतात. सवलती मिळणारी ही माणसे मराठी नसतात का? सोयीनुसार रंग बदलून लोकांना खऱ्या प्रश्नापासून दूर नेणाऱ्यांपासून सावध राहण्याची आज गरज आहे....चौकट : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणारमुंबईच्या वैभवात भर टाकण्यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य स्मारक सरकारने उभारावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. चैत्यभूमीची जागा अपुरी असल्याने "एनटीसी' गिरण्यांच्या जागेची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनकार्याची माहिती देणारी आर्ट गॅलरी उभारण्याचाही माझा प्रयत्न आहे.
........
ठळक मुद्दे :- मुंबई जागतिक दर्जाचे सुंदर शहर व्हावे
- वाहतूक, राहणीमान, आरोग्याच्या समस्या सोडविण्यावर भर
- सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर भर
- विकास सर्वसामान्यांना सामावून घेणारा हवा
- बेरोजगारीवर मात करण्यासाठी गुंतवणूक वाढली पाहिजे
योगेश पवार......
No comments:
Post a Comment