Thursday, July 30, 2009

अमरावतीच्या कांचनमालाचे सागराला आव्हान

अंधत्वार मात : "लिम्का' बुककडून विक्रमांची
सकाळ वृत्तसेवा ंमुंबई, ता. 7 : स्वत:च्या डोळ्यांनी तिने कधीही जग पाहिले नाही; मात्र या जगावर अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांशा तिने मनाशी बाळगली आहे. सागराला आव्हान देणाऱ्या या सागरकन्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत. ही यशोगाथा आहे अमरावती येथील सतरा वर्षांच्या कांचनमाला ज्ञानेश्‍वर पांडे या अंध मुलीची. कांचनमालाच्या विक्रमांची नोंद "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने'ही घेतली आहे.जन्मताच कांचनमालाची दृष्टी नियतीने हिरावून घेतली. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिला पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास तिच्या पालकांनी सुरुवात केली. त्यामुळे कांचनमालाची जणू पाण्याशीच मैत्री जडली. यातून तिने स्थानिक व शालेय पातळीवरील जलतरण स्पर्धांतून सहभाग घेत अपंगांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदके पटकाविली. अमरावती येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍण्ड ह्युमॅनिटी या शिक्षण संस्थेत बारावीत शिकत असून नुकतीच तिने परीक्षा दिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिने 14 सुवर्णपदके पटकावली आहेत. 2001 ते 2007 या कालावधीत झालेल्या अपंगांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहा सुवर्णपदके, 2004 मध्ये पॅराऑलिम्पिक कमिटीच्या वतीने बेंगळूरु येथे आयोजित करण्यात आलेल्या अपंगांच्या क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके, तसेच 2006 मध्ये आठव्या सीनिअर नॅशनल स्पर्धेत तीन सुवर्ण, नागपूर येथे 2007 मध्ये झालेल्या "आठव्या सीनिअर महाराष्ट्र स्टेट पॅराऑलिम्पिक' स्पर्धेत चार सुवर्णपदकांची तिने कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कांचनमालाने आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. 2006 मध्ये झालेल्या आठराव्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही तिने सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभाग घेणारी ती पहिली अंध जलतरणपटू ठरली. बर्लीन येथे झालेल्या फॅसिफिक क्रीडा स्पर्धेत तिने एक सुवर्ण आणि एक रजतपदक पटकावले आहे. 2008 मध्ये बाविसाव्या जर्मन खुल्या जलतरण स्पर्धेत तिने 50 आणि 100 मीटर बॅस्ट्रोक स्पर्धेत सुवर्ण आणि रजतपदक पटकावले आहे. "सनरॉक ते गेट वे' हे अंतरही तिने यशस्वीपणे पार केले आहे. "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नेही तिच्या या कामगिरीची नोंद घेतली आहे.इन्फोबॉक्‍सपोहताना लक्ष्य गाठणे हेच उद्दिष्ट"सकाळ'शी बोलताना कांचनमाला म्हणाली की, पाण्याशी माझे नाते जडले आहे. मी जेव्हा पोहायला उतरते तेव्हा मला कसलीच भीती वाटत नाही. माझ्या दोन्ही बाजूला रस्सी धरली जात असल्याने त्याच्या अंदाजने मी पोहते. तेव्हा केवळ लक्ष्य गाठणे हेच माझे उद्दिष्ट असते. अंध-अपंग म्हणून सहानुभूती मिळण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने नाव कमवावे, असे मनाशी ठरविले असल्याचे तिने सांगितले.
.........

No comments: