देशातील तरुण नेतृत्वाच्या हाती सत्ता असावी, असा एक मतप्रवाह सध्या राजकारणात जोर धरतो आहे. चौदाव्या लोकसभेतील तरुण खासदारांपैकी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रिया दत्त या आहेत. प्रिया दत्त यांनी पंधराव्या लोकसभेच्या रिंगणातही उडी घेतली असून या मतदारसंघाचे पुन्हा नेतृत्व करण्यासाठी त्या उत्सुक आहेत. सुनील दत्त यांच्या निधनानंतर नोव्हेंबर 2005 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या मधुकर सरपोतदार यांचा पराभव करून सुमारे पावणे दोन लाखांच्या मताधिक्क्याने विजय मिळवत प्रत्यक्ष राजकारणात दणदणीत प्रवेश केला. खासदार सुनील दत्त यांच्या मुशीतून प्रिया तयार झाल्या आहेत. उच्चशिक्षित असणाऱ्या प्रिया यांना सुनील दत्त यांनी समाजकारणासह राजकारणाचीही तालीम दिली. त्यांना या मतदारसंघात काम करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा किंवा गैरवर्तनाचा पक्षात किंवा पक्षाबाहेर एकही आरोप नाही. स्वच्छ प्रतिमेची तरुण खासदार असा त्यांचा लौकिक आहे. संसदेतही अन्य खासदारांच्या तुलनेत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रचारसभांतून त्यांच्या कामाची वाहवा केली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून टीका होत असताना त्यांनी मात्र कोणावरही टीका करण्याचे टाळले. लोकांचा त्यांना मतदारसंघात पाठिंबा वाढत आहे. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर माझा भर आहे. लोकांना आश्वासने देऊन भुलवण्यापेक्षा मला त्यांच्यासाठी काम करणे जास्त महत्त्वाचे वाटते, असे त्या सांगतात. खलिस्तानी चळवळीने देशातील वातावरण कलुषित झाले होते. यावेळी सुनील दत्त यांनी मुंबई ते अमृतसर अशी शांतियात्रा काढली होती. या यात्रेत प्रिया यांनी सहभाग घेतला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या फिरल्या होत्या. लोकांशी संवाद साधला होता. या यात्रेतूनच देशातील प्रश्नांचे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाचे गांभीर्य आपल्याला कळले, असे त्या सांगतात. देशातील युवा पिढीचे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचीही त्यांना जाण आहे. मी माझ्या वडिलांचा वारसा घेऊन राजकारणात उतरले आहे. माझ्या वडिलांना लोक राजकारणापेक्षा समाजकारणाने जास्त ओळखत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला काम करायचे आहे. असे आपल्या प्रचारसभांतून सांगणाऱ्या प्रिया यांनी आपला कल समाजकारणाकडे जास्त असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकांच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा ते प्रश्न सोडवले पाहिजेत. आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या नागरिकांचा विश्वास सार्थकी लावला पाहिजे, असे त्या मानतात. नर्गीस दत्त मोबाईल हॉस्पिटलची कुर्ला नेहरूनगर व विलेपार्ले या झोपडपट्टी भागात त्यांनी स्थापना केली. एक्स रे, इसीजी यांसारख्या सुविधा येथील लोकांना उपलब्ध करून दिल्या. मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटांतही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली होती. आपल्या कार्यालयात हेल्पलाइन सुरू केली होती. तसेच 26 जुलैच्या महापुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी मदत केली होती. त्यांना अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे चालवली होती. त्यांनी राजीव गांधी कॉम्प्युटर शिक्षण योजनेच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीय महिला तसेच विद्यार्थ्यांना संगणक साक्षर केले. पालिका शाळांतील व रस्त्यावरील मुलांसाठी "प्रोजेक्ट मुस्कुराहट'द्वारे शैक्षणिक साहित्य पुरविले. अमली पदार्थ विरोधी मोहीम, एड्स जनजागृती मोहीम यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. मतदारसंघातील विकास कामेही मार्गी लावली आहेत.सुनील दत्त यांच्या कामाची पोचपावती त्यांच्यासह प्रिया दत्त यांनाही लोकांनी दिली. आपण मागच्यावेळी वडिलांच्या करिष्म्यावर निवडून आलो. ती निवडणूक माझ्या वडिलांची होती. आताची निवडणूक खऱ्या अर्थाने माझी आहे, असे सांगणाऱ्या प्रिया दत्त यांनी यावेळी निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे. आपली भूमिका लोकांपुढे ठामपणे मांडली आहे.
..........- योगेश पवार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment