Thursday, July 30, 2009

भाजपवर कॉंग्रेसचे नेतृत्व मोडून काढण्याचे आव्हान

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप झालेली नाही. कॉंग्रेसतर्फे खासदार प्रिया दत्त येथून प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या वाट्याला आला असून, प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन आणि राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांची नावे चर्चेत आहेत, तर "मनसे'तर्फे महिला आघाडी प्रमुख शिल्पा सरपोतदार रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक काळ कॉंग्रेसने याचे नेतृत्व केले आहे. कॉंग्रेसचे हे वर्चस्व मोडून काढण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. अतापर्यंत चर्चेत आलेली उमेदवारांची नावे पाहता, युती आणि मनसेकडूनही महिला उमेदवार उभे केले जाण्याची शक्‍यता असल्याने येथे महिलांमध्ये लढत होण्याची शक्‍यता आहे.पुनर्रचनेत या मतदारसंघात मोठा बदल झाला आहे. खासदार गुरुदास कामत, प्रिया दत्त आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मतदारसंघातील भाग मिळून या नव्या मतदारसंघाची रचना झाली आहे. पूर्वी या मतदारसंघात विलेपार्ले, कुर्ला, नेहरूनगर, खेरवाडी, वांद्रे, सांताक्रूझ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. नव्या रचनेनुसार विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला (राखीव), वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्‍चिम, कालिना या मतदारसंघांचा समावेश झाला आहे. चांदिवली आणि कुर्ला या मतदारसंघांचा नव्याने समावेश झाला आहे. ते गुरुदास कामत यांच्या उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघात होते, तर कुर्ला (नेहरूनगर) हा विधानसभा मतदारसंघ खासदार एकनाथ गायकवाड यांच्या उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात होता. विलेपार्ले, कुर्ला, नेहरूनगर कुर्ला, खेरवाडी, वांद्रे (पश्‍चिम), सांताक्रूझ (कालिना) या विधानसभा मतदारसंघातील आमदारही कॉंग्रेसचे आहेत. त्यांनी युतीच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात युतीचा एकही आमदार नाही. फेब्रुवारी 2007 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मात्र येथील जनतेने युतीच्या पारड्यात आपले माप टाकले आहे. या मतदारसंघावर सध्या कॉंग्रेसचा प्रभाव असल्याने येथे कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहणार, अशी चिन्हे आहेत. एकूण 16 लाख 68 हजार 903 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. गुजराती आणि मुस्लिम समाजाचे प्रमाण येथे जास्त आहे. उत्तर भारतीय मतदारांची संख्या सांताक्रूझ-कालिना, वांद्रे भागात आहे. या मतदारांनी आजवर कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. झोपडीवासीयांचे पुनर्वसन, रखडलेली एसआरएची कामे, बेरोजगारी आदी प्रश्‍न महत्त्वाचे ठरणार आहेत.वायव्य मुंबई आणि आताच्या उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व 1971 मध्ये कॉंग्रेसच्या एच. आर. गोखले यांनी केले. त्यानंतर 1977 ला तो जनता पार्टीच्या राम जेठमलानींनी कॉंग्रेसकडून खेचून आणला. 1980 पर्यंत त्यांनी नेतृत्व केले. सुनील दत्त यांनी भाजपचे वर्चस्व मोडून हा मतदारसंघ 1984 मध्ये पुन्हा कॉंग्रेसकडे खेचून आणला. 1996 ते 98 हा काळ वगळता सन 2004 पर्यंत त्यांनी या मतदासंघावरील आपली पकड ढिली पडू दिली नाही. भाजपची येथील ताकद कमी होत गेल्याने 1996 व 1998 या काळात भाजपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा लागला. शिवसेनेचे विद्यमान विधान परिषद सदस्य मधुकर सरपोतदार येथून दोन वेळा निवडून आले होते; मात्र त्यानंतर सरपोतदार यांच्या वाट्याला येथून सातत्याने पराभवच आला. सुनील दत्त यांच्या निधनानंतर 2005 माध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांनी येथून कॉंग्रेसच्या विजयाचा वारसा कायम राखला. या पोटनिवडणुकीतही सरपोतदारांना पराभवाचे पाणी चाखावे लागले. शिवसेनेची या मतदारसंघात डाळ न शिजल्याने आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ सेनेकडून भाजपच्या वाट्याला आला आहे.कॉंग्रेसतर्फे खासदार प्रिया दत्त यांना पुन्हा मैदानात उतरविण्यात येणार आहे. त्यांच्या नावाची दिल्ली दरबारी एकमुखी शिफारस झाल्याचे कळते. प्रिया दत्त यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विशेषत: नव्याने समावेश झालेल्या मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रिया दत्त यांच्या विरोधात भाजपतर्फे नक्की कोण, हा प्रश्‍न अजून अधांतरी आहे. भाजप तोडीस तोड उमेदवाराचा शोध घेत आहे. पूनम महाजन आणि नजमा हेपतुल्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मनसेतर्फे शिल्पा सरपोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सरपोतदार यांची ही निवडणूक पहिलीच असली, तरी त्यांनी शिवसेनेत असताना मधुकर सरपोतदार यांच्या प्रचारासाठी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. या जनसंपर्काचा त्यांना फायदा होईल, असे मनसेच्या धुरीणांना वाटत आहे. उत्तर भारतीय, मुस्लिम, दलित यांच्या मतांवर मदार असलेल्या बसपने या मतदारसंघातील आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत; मात्र बसपची उमेदवारी एखाद्या बड्या उद्योजकाला मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या या मतदारसंघातील जनतेचे नेतृत्व करण्यासाठी कोण कोण उत्सुक आहे, कोणाच्या विरोधात कोण उभे ठाकणार, हे चित्र अजून धूसरच आहे.

....योगेश पवार

No comments: