Thursday, July 30, 2009

उमेदवारांनी मुंबईकरांना गाठले घरात

उत्तर मध्य : राजकीय वातावरणही तापले
सकाळ वृत्तसेवा ंमुंबई, ता. 19 : रविवारची हक्काची सुट्टी आणि रेल्वेचा जंबोब्लॉक यामुळे आज घरातच आराम करणाऱ्या मुंबईकर मतदारांना गाठण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चढाओढ लागली होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात कॉंग्रेस, भाजप, मनसे, बसपच्या उमेदवारांनी "डोअर टू डोअर' प्रचाराने मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे वाढत्या तापमानाबरोबरच आज राजकीय उष्माही कमालीचा वाढला होता.मतदानाचा दिवस जवळ येत चालल्याने मतदारसंघातील प्रचार हळूहळू शिगेला पोहोचत आहे. कॉंग्रेस आघाडीतर्फे प्रिया दत्त, शिवसेना-भाजप युतीचे ऍड. महेश जेठमलानी, मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि बसपचे हाजी इब्राहिम शेख अशी यांच्यात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत या मतदारसंघात आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांनी सध्या घरोघरी पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रचाररथा बरोबरच गल्ली, मोहल्यात आणि इमारतीत जाऊन उमेदवारांनी प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधला. नोकरी व्यवसायामुळे घरात न भेटणारे मुंबईकर आज सुट्टी व रेल्वेच्या जम्बोब्लॉकमुळे फारसे बाहेर पडणार नाहीत याची अटकळ उमेदवारांनी आधीपासून बांधली होती. त्यामुळे प्रचाररथांना काहीसा आराम देऊन त्यांनी "पायी हळूहळू चाला, मुखाने मते द्या बोला' असा प्रचाराचा फंडा अमलात आणला. डोक्‍यावर पक्षाची टोपी, खांद्यावर पक्षाचा झेंडा घेतलेले भाजप, कॉंग्रेस, मनसे, बसपचे शिलेदार रणरणत्या उन्हातून प्रचार करताना आढळत होते. मतदारांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले; पण पाठोपाठ प्रश्‍नांचा भडिमार करून निवडून आल्यावर ते काय काय करणार आहेत, प्रश्‍नांना कसा न्याय देणार, हे वदवून घ्यायची संधी त्यांनी सोडली नाही. नेत्यांनीही सरावाप्रमाणे आश्‍वासनांची खैरात करून मग वेळ मारून नेली. झोपडपट्टीत प्रचारभाजपचे उमेदवार ऍड. जेठमलानी यांनी वांद्रे पूर्वेकडील गोळीबार नाका झोपडपट्टी भाग, जनरल हॉस्पिटल, सांताक्रूझ जिमखाना, हनुमान टेकडी, सांताक्रूझ डावरीनगर, चैतन्यनगर या भागांतून प्रचारफेरी काढली. येथील सुमारे 70 टक्के भाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे. संरक्षण खात्याच्या जागेवर या झोपड्या वर्षानुवर्षांपासून वसलेल्या आहेत. त्यामुळे या झोपडीवासीयांना त्यांच्या पुनर्वसनाबाबतच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागले. आपले सरकार आल्यास आपण या प्रश्‍नाला न्याय देऊ, असे आश्‍वासन जेठमलानी यांनी या वेळी दिले."मनसे'चा जाहीरनामा (मराठीनामा) शनिवारी जाहीर झाल्याने "जाहीरनाम्यातील किती कामे करणार, अशा प्रश्‍नांना सामोरे जावे लागले. येथील मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांनी वांद्रे पश्‍चिमेकडील हसनाबाद, खिरानगर, सांताक्रूझ, जहू आदी भागांतून प्रचारफेरी काढली. या वेळी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. सुमारे चारशे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त आणि बसपचे हाजी इब्राहिम ऊर्फ भाईजान यांनीही आज पदयात्रांच्या माध्यमातून मतदाराला साकडे घातले.............

No comments: