Thursday, July 30, 2009

"मनसे'मुळे भाजपची हार हत्ती बसला :

विकासाचा मुद्दा प्रिया दत्त यांच्यासाठी लाभदायक

योगेश पवार : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 16 : मतदारसंघांच्या पुनर्रचनेत झालेले बदल आणि "बसप'चा प्रवेश यामुळे कॉंग्रेसला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात या वेळी तरी मात देता येईल, अशी अटकळ भाजपचे चाणक्‍य बांधून होते, मात्र मोठी हवा करूनही बसपचा बार फुसका ठरल्याने व भाजपच्या पारड्यात पडणाऱ्या मराठी मतांमध्ये "मनसे' वाटेकरी झाल्याने भाजपचे हे मनसुबे पार धुळीस मिळाले आहेत. भाजप आणि मनसेच्या मतांमध्ये असलेल्या अवघ्या काही हजार मतांच्या फरकावरूनच हे स्पष्ट होते. थोडक्‍यात "मनसे'ची भूमिका भाजपच्या पराभवाला कारण ठरली; तर बसपचा फेल गेलेला फॅक्‍टर कॉंग्रेसच्या विजयाला हातभार लावणारा ठरला आहे. मतदारांना नवा चेहरा दिल्याचा फटकाही भाजपला बसला आहे. विकासाचा मुद्दा ही प्रिया दत्त यांची जमेची बाजू ठरली आहे. "बसप'ची हवा काढत मतदारांनी त्यांचे पानिपत केले. हत्तीला येथे जागा नाही, असाच कौल मतदारांनी दिला आहे.कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त, भाजपचे ऍड. महेश जेठमलानी, मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि बसपचे हाजी इब्राहिम शेख असा चौरंगी सामना रंगेल अशी शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती, मात्र कॉंग्रेसने येथे एकतर्फी विजय मिळविला आहे. प्रिया दत्त यांना तब्बल एक लाख 74 हजार 755 हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. उत्तर मध्य मुंबई हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. दिवंगत खासदार सुनील दत्त यांनी या मतदारसंघाची बांधणी केली आहे. पुनर्रचनेत यामध्ये मोठा बदल झाला असला, तरी ज्या कुर्ला आणि चांदीवलीचा यात नव्याने समावेश झाला तो भागही कॉंग्रेसच्या वर्चस्वाचा असल्याने प्रिया दत्त यांना ही निवडणूक सोपी गेली. विरोधकांकडून विकासकामांवरून टीका होत असताना प्रिया यांनी विकासकामालाच प्रचाराचा मुद्दा बनविला होता आणि हाच मुद्दा त्यांच्या पथ्यावर पडला. शिवाय "मै सुनील दत्त और नर्गीस दत्त की बेटी हूँ' या भावनिक आवाहनाला मतदारांकडून मिळालेली सहानुभूतीही त्यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. प्रिया दत्त यांची ही दुसरी निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी मतदारसंघही पिंजून काढला. प्रचाराच्या हायटेक यंत्रणा वापरल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बड्याबड्या नेत्यांनी प्रचारात घेतलेल्या सहभागाचा त्यांना फायदा झाला. प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याचे त्यांनी पद्धतशीरपणे टाळले; तर दुसऱ्या बाजूला ऍड. महेश जेठमलानी प्रचारात कमी पडले. प्रचारासाठी ठोस मुद्दाच त्यांच्याकडे नव्हता. शिवाय भाजपचा हा चेहरा लोकांसाठी परिचयाचा नसल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला या निवडणुकीत बसला. शिवसेनेकडून बऱ्याच कालावधीनंतर हा मतदारसंघ भाजपकडे आला होता. शेवटपर्यंत भाजपला येथे उमेदवार सापडत नव्हता. शेवटी ऍड. महेश जेठमलानी यांच्या रूपाने भाजपने उमेदवार दिला, मात्र तोही नवखा असल्याने भाजपला अपेक्षित मजलही मारता आली नाही. भाजपच्या पारड्यात एक लाख 44 हजार 697 मते पडली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रचाराला लोकांनी प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होते. मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांचीही ही पहिलीच निवडणूक होती, मात्र यापूर्वी त्यांनी सासरे मधुकर सरपोतदार यांच्या प्रचारात सहभाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात पूर्वीपासून जनसंपर्क होता. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. सरपोतदार यांना तब्बल एक लाख 32 हजार 555 मते मिळाली आहेत. थोडक्‍यात या मतदारसंघातील निकाल अपेक्षित असला तरी मनसेने मारलेली मजल साऱ्यांच्याच भुवया उंचावणारी आहे.

-----------------------------------

15/5/09

No comments: