Thursday, July 30, 2009

कसाबला भरचौकात फाशी द्या!

26/11 : सोलापूरच्या जखमी शब्बीरचा उद्वेग

योगेश पवार / सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 25 : हज यात्रेला निघालेल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी सीएसटी रेल्वेस्थानकावर आलेल्या सोलापूर येथील जाडभाई पेठेत राहणारे शब्बीर सलाम दलाल हे 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सापडले. सीएसटी रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात जबर जखमी झालेल्या शब्बीर यांच्यावर जे.जे. रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. सहा महिन्यांनंतरही दहशतवादी हल्ल्यातील त्यांच्या आठवणी आणि अंगावरील जखमा ओल्या आहेत. शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या कसाबला भरचौकात फाशी झाली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली.हजला निघालेल्या आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी शब्बीर दलाल आपल्या अन्य नातेवाईकांसह त्या दिवशी सीएसटी रेल्वेस्थानकावर आले होते. त्यावेळी अतिरेक्‍यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अजीज रामपुरे, इजाज दलाल हे त्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले. प्रसंगावधान राखून जमिनीवर झोपल्याने शब्बीर वाचले. मात्र अतिरेक्‍यांच्या गोळ्यांनी त्यांच्या उजव्या पायाचा वेध घेतला. पायात दोन गोळ्या घुसल्या. एका व्यक्तीने त्यांना हातगाडीवर झोपवून जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शब्बीर यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. ते जायबंदी झाल्याने तो बंद झाला आहे. चार मुली, एक मुलगा, आई, पत्नी असा मोठा परिवार आहे. एका मुलीचे लग्न तोंडावर आले आहे. सरकारने दिलेली मदतही औषधोपचारात खर्च झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे शब्बीर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. जगाला हादरविणाऱ्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांना अजूनही शिक्षा झाली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या कसाबचे लाड करण्यापेक्षा त्याला भर चौकात फाशी द्या. असे हल्ले करण्यासाठी पुन्हा कोणी धजावणार नाही अशीच शिक्षा त्याला झाली पाहिजे, असे ते सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील संताप आणि हल्ल्याच्या वेळचा थरार स्पष्टपणे जाणवतो. इस्लाम धर्म एखाद्याचा जीव घ्यायची शिकवण देत नाही. कोणाला मारण्याचा कोणालाही अधिकार नाही. हिंदू, सीख, इसाई सारे भाई भाई अशी धर्माची शिकवण आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना माफ करू नये, असे ते संतापाने सांगतात. जे.जे. रुग्णालयात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मृत्यूच्या दाढेतून आपल्याला डॉक्‍टरांनीच बाहेर काढले, असे ते आवर्जून सांगतात.

........

26/5/09

No comments: