एका शेतकऱ्याने आपल्या मुलांना एक एक काठी देऊन ती मोडण्यास सांगितली आणि मुलांनी त्या पटापट मोडल्या. त्यानंतर शेतकऱ्याने सर्व काठ्यांची एकत्रित मोळी करून ती प्रत्येकाला मोडावयास दिली, तेव्हा ती त्यांना मोडता आली नाही. यातून शेतकऱ्याने आपल्या मुलांना एकीच्या बळाचा प्रत्यय घडवला होता. शाळकरी अवस्थेत शिकविली जाणारी ही गोष्ट राज्यातील रिपब्लिकन नेत्यांच्या सोईस्करपणे विस्मरणात गेली आहे.त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन चालणारा रिपब्लिकन पक्ष गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात क्षीण झाला आहे. रिपब्लिकन पक्षांची शकले झाली आहेत. वेगवेगळ्या गटांचे नेते उदंड जाहले आणि त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते आणि जनता किती हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना -भाजप युती यांना पाठिंबा देऊन निवडणूक लढविणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांचा दारुण पराभव झाला. कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओसरीवर जाणाऱ्या नेत्यांना त्यामुळे अद्दल घडली. लोकसभा निवडणुकीतील हाराकीरीमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर कार्यकर्त्यात नैराश्य पसरले आहे. नेत्यांच्या "राजकारणा" विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. याचाच परिपाक म्हणून सध्या पुन्हा एकदा "ऐक्याचा फुगा" फुगविण्याच्या कामगिरीवर नेत्यांनी आपापल्या परीने स्वतः:ला जुंपून घेतले आहे. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, टी.एम. कांबळे आदी नेते ऐक्याचे नारे देऊ लागले आहेत. मात्र गेल्या काही निवडणुकांमधला इतिहास पाहता निवडणुकांच्या तोंडावर ऐक्याचे धुमारे असेच फुटतात. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दबावाचे राजकारण म्हणून रिपब्लिकन गटांच्या ऐक्याचा नारा द्यायचा आणि निवडणुकीत मात्र ऐनवेळी कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस वा अन्य पक्षांशी तडजोडी करायच्या व आपली पोळी भाजून मोकळे व्हायचे, असेच चित्र दिसते.सन 1974 साली रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्रित आले होते. त्यानंतर रिडल्सच्या आंदोलनानंतर 6 डिसेंबर 1989 रोजी ऐक्य झाले होते. मात्र ते मोडल्याने पुन्हा सुमारे सहा वर्षांनी 15 डिसेंबर 1995 साली सर्व गट एकत्रित येऊन प्रेसिडीअम (अध्यक्षीय मंडळ) स्थापन झाले होते. सन 1996च्या निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीशी युती करून 11 जागा लढविल्या होत्या मात्र त्यावेळी एकही जागा निवडून येऊ शकली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसारखी त्यावेळी स्थिती होती. मात्र समाधानाची बाब म्हणजे 22 वर्षानंतर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाकडे मान्यता मिळाली. कॉंग्रेस आणि रिपब्लिकन पक्षांची 1998च्या लोकसभा निवडणुकीत युती झाली. रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून आले खरे पण ऐक्याला सुरुंग लागला आणि त्या स्फोटात उडालेली शकले पुढील काळात कॉग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओसरीवर पडू लागली. ही स्थिती 2009 च्या लोकसभेत पर्यंत कायम राहिली. शिर्डी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या रामदास आठवले यांचा दारुण पराभव झाला. पांडुरंगाच्या कृपेने खासदार होणाऱ्या आठवलेंवर शिर्डीच्या साईबाबांची कृपादृष्टी झाली नाही.त्यामुळे अस्वस्थ असलेल्या आठवलेंचा आता कोणत्या तंबूत शिरायचे हे उमजत नाही.त्यामुळे त्यांनी एकीकडे ऐक्याचा सुर आळवला आहे, अन् दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यसभेवर वर्णी लावून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आठवलेंचा राज्यसभा मिळाल्यास त्यांचा आताचा ऐक्याचा विचार कायम राहण्याची खात्री कोण देणार म्हणूनच आठवले यांचे ऐक्याचे नारे हा दबावाचा भाग व स्टंट असू शकतो. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी ऐक्याची गरज व्यक्त केली आहे.प्रा. कवाडे यांनी ऐक्याचा राग लोकसभा निवडणुकीच्या आधीही आळवला होता.मात्र त्यांनीही शिवसेना - भाजपला पाठिंबा देऊन लोकसभा निवडणूक "साजरी' केली. रिपब्लिकन डेमॉक्रेटीकचे अध्यक्ष व माजी आमदार टी.एम. कांबळे यांनी ऐक्यासाठी विदर्भ मराठवाड्याचा दौरा आखला आहे. प्रसिद्धी पत्रक काढून आंबेडकरी अनुयायी आणि रिपब्लिकन नेत्यांना ऐक्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी एक स्वतंत्रपणे बैठका आयोजित केली आहे. आवाहना बरोबरच "भारिप"चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यावर टीकेची झोड उठविण्याची संधी सोडली नाही.अमरावतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या डॉ. राजेंद्र गवई यांनाही पराभवानंतर ऐक्याची स्वप्ने पडू लागली आहेत.तर आंबेडकर यांचा भारिप बहुजन पक्ष मात्र स्वतः:ला रिपब्लिकन पक्ष नसल्याचे मानतो. त्यामुळे ऐकण्यात आम्हाला मोजू नका अशी या पक्षाच्या नेत्यांची भूमिका असते. जिथे रामदासआठवले असतील त्या आघाडीत भरीप जाणार नाही असे पक्षाचे धोरण असल्याने संभाव्य ऐक्यात प्रकाश आंबेडकर सहभागावर प्रश्न चिन्ह आहे. तर नामदेव ढसाळ यांच्या पॅंथरने शिवसेनेच्या वाघाशी हातमिळवणी केलेली आहे. नेते ऐक्याचे नारे देत असली तरी ही त्यांची आपापले इप्सित साधण्यासाठी खेळी असू शकते.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर व बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन नेत्यांच्या तोडांत ऐक्याचे नारे असले तरी त्यांचा सुर एक नाही. ऐक्याच्या प्रश्नावरही वेगळ्या चुली मांडल्या गेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस , शिवसेना - भाजप यांच्याकडून होणाऱ्या कृपादृष्टीसाठी नेते अधीर झाले आहेत. येत्या काही दिवसात अपेक्षित तडजोडी झाल्या तर ऐक्याचे धुमारे खुडून जाण्याची शक्यता आहे. आणि ऐक्य झालेच तरी नेतृत्व कोणी करायचे कोणाचे आदेश कोणी मानायचे यावरून ऐक्य किती दिवस टिकेल हा ही एक महत्त्वाचा विषय आहे. नेतृत्वाचा मुद्दा हीच ऐक्याच्या मार्गातील धोंड आहे
..योगेश पवार , मुंबई
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
wow wat a gr8 articale....
Post a Comment