सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 : मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या परप्रांतांतील गरिबांना येथे सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज शिवाजी पार्क येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना केला. "बसप'चे सरकार सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशाच्याच धर्तीवर मुंबईतील झोपडपट्टीचा विकास केला जाईल; तसेच सर्व सवर्णांतील आर्थिक दुर्बलांसह सर्व वर्गाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे "जो जे वांछिल तो ते लाहो...' धर्तीचे आश्वासनही त्यांनी दिले.मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील "बसप' उमेदवारांची संयुक्त प्रचारसभा आज शिवाजी पार्क मैदानावर झाली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मायावती यांचे सभास्थानी आगमन झाले. अर्ध्या तासाच्या भाषणात मायावती यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच कॉंग्रेस व भाजपवर कडाडून टीका केली. मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे रोजीरोटीसाठी सर्व राज्यांतील लोक येतात. येथील मराठी बांधवांचे काही प्रश्न आहेत, हे आपल्याला माहीत आहे, अशा भाषेत त्यांनी मराठी मतदारांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे अथवा त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख मात्र मायावती यांनी टाळला. मुंबईतील झोपडीवासीयांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट आहे. त्यांना सन्मानाचे जीवन जगता येत नाही; मात्र कॉंग्रेसकडून ही स्थिती बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपला सत्तेत येऊ देऊ न देता "बसप'च्या "हत्ती'वर बटन दाबा, असे आवाहन मायावती यांनी या वेळी केले."कॉंग्रेसच जबाबदार'स्वातंत्र्यानंतर केंद्रात कॉंग्रेसचीच सत्ता राहिली आहे. मात्र गेल्या 61 वर्षांत सर्वसामान्य लोकांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत काहीच बदल झाला नाही. गरिबी आणि बेरोजगारीमुळे लोक नक्षलवादी बनले, त्याला कॉंग्रेसच जबाबदार असल्याची टीका मायावती यांनी केली. "बसप'च्या हातात सत्ता दिल्यास गरिबी आणि बेरोजगारीवर कायमस्वरूपी उपाय काढू, असा दावा त्यांनी केला. कॉंग्रेस भांडवलदारांच्या जोरावर सत्तेत येते. त्यामुळे कॉंग्रेसची आर्थिक नीती ही त्यांचेच हित साधणारी असते. सर्वसामान्य समाजाचे दु:ख त्यांना कळत नाही. "बसप'च्या हाती सत्ता दिल्यास सर्वसामान्यांसाठी आर्थिक धोरण तयार करू, असे त्या म्हणाल्या. विरोधकांकडून "बसप' जातीयवादी असल्याच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "बसप' समतामूलक समाजव्यवस्थेचे तत्त्व मानतो आणि त्याच्या जोरावर केंद्रात सत्ता संपादन करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या साम, दाम, दंड भेद या नीतीपासून सावध राहा, असा इशारा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
................................
चौकट.....
"भावी पंतप्रधान'पक्षाचे केंद्रीय महासचिव खासदार सतीश मिश्रा यांच्यासह साऱ्याच वक्त्यांनी मायावतींचा उल्लेख भावी पंतप्रधान असाच केला. व्यासपीठावर पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार वीरसिंह, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्यासह राज्यातील 24 उमेदवार उपस्थित होते. सभेची वेळ दुपारी तीनची जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे खांद्यावर हत्ती निशाणी असलेले निळे झेंडे घेऊन हजारो लोक कडक उन्हात बसले होते. उपस्थितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक होते. "सारे देशमें एकही शोर, हाथी चला संसद की ओर' या घोषणेबरोबरच "बसप' आणि मायावतींच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. मायावतींना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याने त्यांना कडाक्याच्या उन्हातच त्यांची वाट पाहावी लागली. काही कार्यकर्त्यांनी कापडी झेंड्यांचाच सावलीसाठी आधार केल्याचे दिसत होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment