Thursday, July 30, 2009

शेवटच्या टप्प्यात मुंबईत रणकंदन

प्रचार शिगेला : सोनिया, लालू, मुलायमसिंह येणार
,ता. 21 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा मुंबईच्या दिशेने वळणार आहेत. चौथ्या आघाडीचे नेते लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, रामविलास पासवान, अमर सिंह आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जाहीर प्रचारसभा होणार असल्याने शेवटच्या टप्प्यात मुंबईत चांगलेच राजकीय धुमशान होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्याने राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने वळला आहे. मुंबई, ठाणे परिसरातील दहा मतदारसंघांत येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप युती, कम्युनिस्ट व जनता दलाची (सेक्‍युलर) तिसरी आघाडी आणि जनता दल (राष्ट्रीय), "सप', "लोक जनशक्ती पार्टी'च्या चौथ्या आघाडीचे नेते मुंबईत डेरेदाखल होणार आहेत. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची 26 एप्रिल रोजी मुंबईत जाहीर सभा होत आहे. तत्पूवी 24 एप्रिलला केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान, समाजवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि महासचिव अमर सिंग, प्रजाराज्यमचे अध्यक्ष चिरंजीवी यांची संयुक्त सभा आणि रोड शो होणार आहे. या सभेत कॉंग्रेस, भाजपवर, शिवसेना आणि मनसेवर हे नेते टीकेच्या फैरी झाडण्याची शक्‍यता आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तरेतील हे नेते मुंबईत दाखल होत आहेत, त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांना गोंजारण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. बहुजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे यांच्या आंदोलनासंदर्भात फारसे बोलण्याचे टाळले होते. ही कसर चौथ्या आघाडीचे नेते भरून काढण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जाणे अपेक्षित असल्याने शाब्दिक युद्ध भडकण्याची शक्‍यता आहे.दरम्यान, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी चौथ्या आघाडीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी चालविली असून ही सभा जंगी होईल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
..........sakal

No comments: