Thursday, July 30, 2009

दिल और शरीर एकदम फिट!

निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे तो विजय मिळविण्यासाठी. मतदारसंघातील जास्तीत जास्त भागात पोचण्यासाठी मी मतदासंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. रणरणत्या उन्हातून निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरताना तब्येत सांभाळणे हे एक आव्हानच बनले आहे. मात्र मला हे आव्हान फारसे कठीण वाटत नाही. कारण अनेक वर्षांपासून मी आठवड्यातील चार दिवस योगासने आणि दररोज जीम सायकलिंग, वेटलिफ्टिंग करतो. अपना दिल और शरीर एकदम फिट हैं. मात्र प्रचारासाठी फिरताना दमछाकही होतेच. निवडणूक आणि तब्येत हे दोन्ही माझ्यासाठी परीक्षा आहेत, असे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार ऍड्‌. महेश जेठमलानी सांगतात. निवडणुकीचे शिवधनुष्य मी उचलले आहे, ते विजय मिळाल्याशिवाय खाली ठेवणार नाही. प्रचाराच्या धबडग्यातून व्यायामासाठी आता काही वेळा वेळ मिळत नाही. प्रचारफेऱ्या आणि पदयात्रांतून आठ-आठ तास चालावे लागते. त्यातच मग चांगला व्यायाम घडतो. भाजून काढणारे ऊन आणि असह्य उकाडा यामुळे अंगाची काहिली होते. घामाच्या धारा लागतात. त्यात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येणाऱ्या बौद्धिक ताणामुळे अधिक थकवा येतो. खर्च होणारी ही ऊर्जा भरून काढण्यासाठी पिण्याच्या पाण्यात "इलेक्‍ट्रॉल' पावडर मिसळून ते पाणी मी पिण्यासाठी वापरतो. दुपारचे जेवण फारसे होत नाही. प्रचारादरम्यान लोक चहाचा आग्रह करतात. त्यामुळे वारंवार चहा होतो. काही ठिकाणी लोक लाडू आणि गोड पदार्थ देऊन स्वागत करतात. या खाण्यामुळेच पोट गच्च होते. त्यामुळे वेगळे जेवण करण्याची आवश्‍यकताच उरत नाही. निवडणुकीत शेवटपर्यंत झुंजायचे तर स्वतःला एकदम फिट ऍण्ड फाईन राखायलाच हवे, हे मी जाणतो. म्हणूनच योगासनांवर जास्त भर दिला आहे."एसी'मध्ये राहणाऱ्या माणसांना सामान्य माणसांचे कष्ट जाणून घ्यायचे असतील तर असे फिरलेच पाहिजे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखरपणा आपल्यात असल्याने आपण हा ताण पचवू शकतो आणि निवडणुकीच्या आखाड्यातही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतो. .........

No comments: