Thursday, July 30, 2009
ऐक्याचे वारे कोरडेच !
..योगेश पवार , मुंबई
स्वच्छ प्रतिमेची तरुण खासदार
..........- योगेश पवार
शेवटच्या टप्प्यात मुंबईत रणकंदन
,ता. 21 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा मुंबईच्या दिशेने वळणार आहेत. चौथ्या आघाडीचे नेते लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, रामविलास पासवान, अमर सिंह आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जाहीर प्रचारसभा होणार असल्याने शेवटच्या टप्प्यात मुंबईत चांगलेच राजकीय धुमशान होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्याने राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने वळला आहे. मुंबई, ठाणे परिसरातील दहा मतदारसंघांत येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप युती, कम्युनिस्ट व जनता दलाची (सेक्युलर) तिसरी आघाडी आणि जनता दल (राष्ट्रीय), "सप', "लोक जनशक्ती पार्टी'च्या चौथ्या आघाडीचे नेते मुंबईत डेरेदाखल होणार आहेत. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची 26 एप्रिल रोजी मुंबईत जाहीर सभा होत आहे. तत्पूवी 24 एप्रिलला केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान, समाजवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि महासचिव अमर सिंग, प्रजाराज्यमचे अध्यक्ष चिरंजीवी यांची संयुक्त सभा आणि रोड शो होणार आहे. या सभेत कॉंग्रेस, भाजपवर, शिवसेना आणि मनसेवर हे नेते टीकेच्या फैरी झाडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील हे नेते मुंबईत दाखल होत आहेत, त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांना गोंजारण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. बहुजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे यांच्या आंदोलनासंदर्भात फारसे बोलण्याचे टाळले होते. ही कसर चौथ्या आघाडीचे नेते भरून काढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जाणे अपेक्षित असल्याने शाब्दिक युद्ध भडकण्याची शक्यता आहे.दरम्यान, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी चौथ्या आघाडीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी चालविली असून ही सभा जंगी होईल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
..........sakal
उमेदवारांनी मुंबईकरांना गाठले घरात
सकाळ वृत्तसेवा ंमुंबई, ता. 19 : रविवारची हक्काची सुट्टी आणि रेल्वेचा जंबोब्लॉक यामुळे आज घरातच आराम करणाऱ्या मुंबईकर मतदारांना गाठण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चढाओढ लागली होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात कॉंग्रेस, भाजप, मनसे, बसपच्या उमेदवारांनी "डोअर टू डोअर' प्रचाराने मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे वाढत्या तापमानाबरोबरच आज राजकीय उष्माही कमालीचा वाढला होता.मतदानाचा दिवस जवळ येत चालल्याने मतदारसंघातील प्रचार हळूहळू शिगेला पोहोचत आहे. कॉंग्रेस आघाडीतर्फे प्रिया दत्त, शिवसेना-भाजप युतीचे ऍड. महेश जेठमलानी, मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि बसपचे हाजी इब्राहिम शेख अशी यांच्यात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत या मतदारसंघात आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांनी सध्या घरोघरी पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रचाररथा बरोबरच गल्ली, मोहल्यात आणि इमारतीत जाऊन उमेदवारांनी प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधला. नोकरी व्यवसायामुळे घरात न भेटणारे मुंबईकर आज सुट्टी व रेल्वेच्या जम्बोब्लॉकमुळे फारसे बाहेर पडणार नाहीत याची अटकळ उमेदवारांनी आधीपासून बांधली होती. त्यामुळे प्रचाररथांना काहीसा आराम देऊन त्यांनी "पायी हळूहळू चाला, मुखाने मते द्या बोला' असा प्रचाराचा फंडा अमलात आणला. डोक्यावर पक्षाची टोपी, खांद्यावर पक्षाचा झेंडा घेतलेले भाजप, कॉंग्रेस, मनसे, बसपचे शिलेदार रणरणत्या उन्हातून प्रचार करताना आढळत होते. मतदारांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले; पण पाठोपाठ प्रश्नांचा भडिमार करून निवडून आल्यावर ते काय काय करणार आहेत, प्रश्नांना कसा न्याय देणार, हे वदवून घ्यायची संधी त्यांनी सोडली नाही. नेत्यांनीही सरावाप्रमाणे आश्वासनांची खैरात करून मग वेळ मारून नेली. झोपडपट्टीत प्रचारभाजपचे उमेदवार ऍड. जेठमलानी यांनी वांद्रे पूर्वेकडील गोळीबार नाका झोपडपट्टी भाग, जनरल हॉस्पिटल, सांताक्रूझ जिमखाना, हनुमान टेकडी, सांताक्रूझ डावरीनगर, चैतन्यनगर या भागांतून प्रचारफेरी काढली. येथील सुमारे 70 टक्के भाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे. संरक्षण खात्याच्या जागेवर या झोपड्या वर्षानुवर्षांपासून वसलेल्या आहेत. त्यामुळे या झोपडीवासीयांना त्यांच्या पुनर्वसनाबाबतच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. आपले सरकार आल्यास आपण या प्रश्नाला न्याय देऊ, असे आश्वासन जेठमलानी यांनी या वेळी दिले."मनसे'चा जाहीरनामा (मराठीनामा) शनिवारी जाहीर झाल्याने "जाहीरनाम्यातील किती कामे करणार, अशा प्रश्नांना सामोरे जावे लागले. येथील मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांनी वांद्रे पश्चिमेकडील हसनाबाद, खिरानगर, सांताक्रूझ, जहू आदी भागांतून प्रचारफेरी काढली. या वेळी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. सुमारे चारशे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त आणि बसपचे हाजी इब्राहिम ऊर्फ भाईजान यांनीही आज पदयात्रांच्या माध्यमातून मतदाराला साकडे घातले.............
दिल और शरीर एकदम फिट!
... तर पुन्हा तोंड दाखविणार नाही : राज ठाकरे
वृत्तसेवा मुंबई, ता. 10 : माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी मी पूर्ण करू शकलो नाही तर तुम्हाला पुन्हा तोंड दाखविणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील "मनसे'च्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांच्या प्रचारासाठी एव्हरार्डनगर येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते.लोकसभेत लाचार माणसे खासदार म्हणून पाठवलीत तर प्रश्न कसे सुटणार? राज्याच्या भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकही खासदार संसदेत बोलला नाही. कारण त्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. पैशाची कामे रखडतील म्हणून ते बोलत नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. माझ्या उमेदवारांना एक संधी द्या. त्यांच्यावर माझा अंकुश असेल, ते कसे बोलत नाहीत ते मी बघेन, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेप्रमाणे "मनसे'तही रिमोट कंट्रोलचे राजकारण राहील, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.राज यांनी कॉंग्रेस आणि शिवसेना-भाजपवरही टीकेची झोड उठवली. कॉंग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अफजल गुरूला फाशीची भाषा करणारे भाजपवाले देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रकरणातील आरोपींचे पैशासाठी वकीलपत्र घेणाऱ्या राम जेठमलानींना आणि आता त्यांच्या मुलाला उमेदवारी देतात, अशी टीका त्यांनी केली. राममंदिर बांधणार बांधणार म्हणता, बांधा ना मंदिर, मग तुम्हाला अडवले कोणी? निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भूलथापा देण्याचे आता बंद करा, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. शिवसेनेच्या मराठी प्रेमावरही त्यांनी सडकून टीका केली. एनडीए सरकारमध्ये असताना शिवसेना सीमाप्रश्नावर का बोलली नाही, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. सगळ्याच पक्षांच्या जाहीरनाम्यात दहा वर्षांपूर्वीचेच मुद्दे आहेत. एवढ्या वर्षांत कोणतेच प्रश्न सुटले नाहीत हे यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. प्रिया दत्त यांना खासदार म्हणून मतदारसंघात कोणी ओळखत नाही. त्यांनाच पुन्हा निवडून देणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अबू आझमींचाही त्यांनी समाचार घेतला. आपला पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
विदर्भ-मराठवाड्यातील 41 उमेदवार गुन्हेगार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 : विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 लोकसभा मतदारसंघांत तब्बल 41 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यात शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रत्येकी चार उमेदवारांचा समावेश आहे, असा दावा "नॅशनल इलेक्शन वॉच' या सामाजिक संस्थेने आज पत्रकार परिषदेत केला. सत्तावीस करोडपती उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शिक्षणाच्या दृष्टीनेही उमेदवारांची बोंब असल्याचे सांगण्यात आले.राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना नॅशनल इलेक्शन वॉचने राज्यातील पहिल्या टप्पात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांच्या कुंडलीवर प्रकाशझोत टाकला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 जागांसाठी तब्बल 223 उमेदवार रिंगणात आहेत. पैकी 41 उमेदवारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक मतदारसंघात दोन-तीने उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. चंद्रपूर आणि अमरावती मतदारसंघात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. अपक्ष 95 उमेदवारांपैकी 11, तर अन्य पक्षांच्या 83 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी चार, बसपचे पाच, तर कॉंग्रेसचे सात करोडपती उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. अकोला, हिंगोली, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ-वाशिम येथे करोडपती उमेदवारांची संख्या जास्त आहे. शिक्षणाच्या बाबतीतही भावी नेत्यांची जागृती फारशी उत्साहवर्धक नाही. सुमारे 100 उमेदवार पदवीधर आहेत, तर 58 उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंतही झालेले नाही.कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड आवश्यक बनले असताना विदर्भ मराठवाड्यातील 151 उमेदवारांकडे पॅन कार्ड नाही. करोडपती उमेदवारांचाही यात समावेश असल्याचे संस्थेचे संचालक अजित रानडे यांनी सांगितले. आपला प्रतिनिधी निवडून देताना मतदारांमध्ये जागृती व्हावी, यासाठी आपण ही माहिती उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे, असे रानडे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत परप्रांतीयांना सापत्न वागणूक
मुंबई, ता. 8 : मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्या परप्रांतांतील गरिबांना येथे सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज शिवाजी पार्क येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना केला. "बसप'चे सरकार सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशाच्याच धर्तीवर मुंबईतील झोपडपट्टीचा विकास केला जाईल; तसेच सर्व सवर्णांतील आर्थिक दुर्बलांसह सर्व वर्गाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे "जो जे वांछिल तो ते लाहो...' धर्तीचे आश्वासनही त्यांनी दिले.मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील "बसप' उमेदवारांची संयुक्त प्रचारसभा आज शिवाजी पार्क मैदानावर झाली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मायावती यांचे सभास्थानी आगमन झाले. अर्ध्या तासाच्या भाषणात मायावती यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच कॉंग्रेस व भाजपवर कडाडून टीका केली. मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे रोजीरोटीसाठी सर्व राज्यांतील लोक येतात. येथील मराठी बांधवांचे काही प्रश्न आहेत, हे आपल्याला माहीत आहे, अशा भाषेत त्यांनी मराठी मतदारांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे अथवा त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख मात्र मायावती यांनी टाळला. मुंबईतील झोपडीवासीयांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट आहे. त्यांना सन्मानाचे जीवन जगता येत नाही; मात्र कॉंग्रेसकडून ही स्थिती बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपला सत्तेत येऊ देऊ न देता "बसप'च्या "हत्ती'वर बटन दाबा, असे आवाहन मायावती यांनी या वेळी केले."कॉंग्रेसच जबाबदार'स्वातंत्र्यानंतर केंद्रात कॉंग्रेसचीच सत्ता राहिली आहे. मात्र गेल्या 61 वर्षांत सर्वसामान्य लोकांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत काहीच बदल झाला नाही. गरिबी आणि बेरोजगारीमुळे लोक नक्षलवादी बनले, त्याला कॉंग्रेसच जबाबदार असल्याची टीका मायावती यांनी केली. "बसप'च्या हातात सत्ता दिल्यास गरिबी आणि बेरोजगारीवर कायमस्वरूपी उपाय काढू, असा दावा त्यांनी केला. कॉंग्रेस भांडवलदारांच्या जोरावर सत्तेत येते. त्यामुळे कॉंग्रेसची आर्थिक नीती ही त्यांचेच हित साधणारी असते. सर्वसामान्य समाजाचे दु:ख त्यांना कळत नाही. "बसप'च्या हाती सत्ता दिल्यास सर्वसामान्यांसाठी आर्थिक धोरण तयार करू, असे त्या म्हणाल्या. विरोधकांकडून "बसप' जातीयवादी असल्याच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "बसप' समतामूलक समाजव्यवस्थेचे तत्त्व मानतो आणि त्याच्या जोरावर केंद्रात सत्ता संपादन करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या साम, दाम, दंड भेद या नीतीपासून सावध राहा, असा इशारा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
................................
चौकट.....
"भावी पंतप्रधान'पक्षाचे केंद्रीय महासचिव खासदार सतीश मिश्रा यांच्यासह साऱ्याच वक्त्यांनी मायावतींचा उल्लेख भावी पंतप्रधान असाच केला. व्यासपीठावर पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार वीरसिंह, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्यासह राज्यातील 24 उमेदवार उपस्थित होते. सभेची वेळ दुपारी तीनची जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे खांद्यावर हत्ती निशाणी असलेले निळे झेंडे घेऊन हजारो लोक कडक उन्हात बसले होते. उपस्थितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक होते. "सारे देशमें एकही शोर, हाथी चला संसद की ओर' या घोषणेबरोबरच "बसप' आणि मायावतींच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. मायावतींना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याने त्यांना कडाक्याच्या उन्हातच त्यांची वाट पाहावी लागली. काही कार्यकर्त्यांनी कापडी झेंड्यांचाच सावलीसाठी आधार केल्याचे दिसत होते.
"एनर्जेटीक' प्रिया!
तुझ्या गळा, माझ्यागळा
नेत्यांनी भांडायचे आणि त्याचे खापर प्रसिद्धिमाध्यमांवर फोडायचे हे नेहमीचेच झाले आहे. त्याला कॉंग्रेसचे नेते तरी कसे अपवाद असतील? परवाचेच बघा ना, मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे काही मतदारसंघ विभागले गेले. त्यामुळे विद्यमान खासदारांची चांगलीच पंचाईत झाली. वायव्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातील काही भाग एकनाथ गायकवाड यांच्या मतदारसंघात समाविष्ट झाल्याने या मतदारसंघावर हक्क सांगण्यावरून दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. मग उभयतांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या. आपापल्या "गॉडफादर'कडे वजन वापरून मतदारसंघावर ताबा मिळविण्याचे प्रयत्न झाले. अखेर गायकवाड यांनी कामत यांच्यावर कुरघोडी करीत हा मतदारसंघ पटकावला. त्यामुळे कामत यांनी आपण निवडणूक लढवणारच नाही, अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती. कामत आणि गायकवाड यांच्यातील हा वाद चांगलाच गाजला होता. मात्र या दोन्ही बंडोबांचे पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यानंतर त्यांनी "तुझ्या गळा माझ्या गळा...' अशी भूमिका घेतली आहे असल्याची चर्चा आहे. चेंबूर येथे नुकताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात दोघांची एकाच व्यासपीठावर "भरतभेट' झाली. कार्यक्रमात दोघांनीही आमच्यात जणू कधी काही झालेच नाही, अशी भूमिका घेतली. एकनाथ गायकवाड यांनी तर आमच्या दोघांत वाद नव्हता. हा वाद मीडियाने रंगवला, असे सांगतानाच आठवणींना उजाळा दिला. आपण जेव्हा जिथे उभे राहिलो तेव्हा तेव्हा निवडून आलो आहोत. मी बळीचा बकरा नाही. "हमने अच्छे अच्छोंको किनारे लगाया है', "हमसे पंगा मत लेना', असा इशारा दिला आणि एका दगडात स्वकीय आणि विरोधक असे दोन पक्षी मारण्याची संधी सोडली नाही. कामत यांनी आपण दक्षिण मध्य मुंबईतून इच्छुक नव्हतोच, असे सांगितले. गायकवाडांच्या मतदारसंघात माझे दोनच भाग गेले आहेत. त्यामुळे मी त्यावर कसा दावा सांगणार, अशी सारवासारवही कामत यांनी केली. गायकवाड यांच्या विजयासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे फर्मान सोडत कामत यांनी गायकवाड यांना प्रचंड मतांनी निवडून आणू, असे आश्वासन देवून टाकले. काही दिवसांपूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते हेच ते का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला. त्यामुळेच बहुधा दोघांच्याही नावाने "आगे बढो'च्या घोषणा देऊन सूत्रसंचालक जेरीस आला तरी कार्यकर्त्यांनी कोणाच्याच घोषणेला "हम तुम्हारे...' चा टिपिकल रिस्पॉन्स दिला नाही. अगदी "मॅडम'च्या विजयाच्या घोषणेवरही कुठून तरी कोपऱ्यातून तुरळक आवाज उमटले.
................. योगेश पवार
भाजपवर कॉंग्रेसचे नेतृत्व मोडून काढण्याचे आव्हान
लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप झालेली नाही. कॉंग्रेसतर्फे खासदार प्रिया दत्त येथून प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या वाट्याला आला असून, प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन आणि राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांची नावे चर्चेत आहेत, तर "मनसे'तर्फे महिला आघाडी प्रमुख शिल्पा सरपोतदार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक काळ कॉंग्रेसने याचे नेतृत्व केले आहे. कॉंग्रेसचे हे वर्चस्व मोडून काढण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. अतापर्यंत चर्चेत आलेली उमेदवारांची नावे पाहता, युती आणि मनसेकडूनही महिला उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता असल्याने येथे महिलांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.पुनर्रचनेत या मतदारसंघात मोठा बदल झाला आहे. खासदार गुरुदास कामत, प्रिया दत्त आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मतदारसंघातील भाग मिळून या नव्या मतदारसंघाची रचना झाली आहे. पूर्वी या मतदारसंघात विलेपार्ले, कुर्ला, नेहरूनगर, खेरवाडी, वांद्रे, सांताक्रूझ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. नव्या रचनेनुसार विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला (राखीव), वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम, कालिना या मतदारसंघांचा समावेश झाला आहे. चांदिवली आणि कुर्ला या मतदारसंघांचा नव्याने समावेश झाला आहे. ते गुरुदास कामत यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात होते, तर कुर्ला (नेहरूनगर) हा विधानसभा मतदारसंघ खासदार एकनाथ गायकवाड यांच्या उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात होता. विलेपार्ले, कुर्ला, नेहरूनगर कुर्ला, खेरवाडी, वांद्रे (पश्चिम), सांताक्रूझ (कालिना) या विधानसभा मतदारसंघातील आमदारही कॉंग्रेसचे आहेत. त्यांनी युतीच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात युतीचा एकही आमदार नाही. फेब्रुवारी 2007 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मात्र येथील जनतेने युतीच्या पारड्यात आपले माप टाकले आहे. या मतदारसंघावर सध्या कॉंग्रेसचा प्रभाव असल्याने येथे कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहणार, अशी चिन्हे आहेत. एकूण 16 लाख 68 हजार 903 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. गुजराती आणि मुस्लिम समाजाचे प्रमाण येथे जास्त आहे. उत्तर भारतीय मतदारांची संख्या सांताक्रूझ-कालिना, वांद्रे भागात आहे. या मतदारांनी आजवर कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. झोपडीवासीयांचे पुनर्वसन, रखडलेली एसआरएची कामे, बेरोजगारी आदी प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत.वायव्य मुंबई आणि आताच्या उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व 1971 मध्ये कॉंग्रेसच्या एच. आर. गोखले यांनी केले. त्यानंतर 1977 ला तो जनता पार्टीच्या राम जेठमलानींनी कॉंग्रेसकडून खेचून आणला. 1980 पर्यंत त्यांनी नेतृत्व केले. सुनील दत्त यांनी भाजपचे वर्चस्व मोडून हा मतदारसंघ 1984 मध्ये पुन्हा कॉंग्रेसकडे खेचून आणला. 1996 ते 98 हा काळ वगळता सन 2004 पर्यंत त्यांनी या मतदासंघावरील आपली पकड ढिली पडू दिली नाही. भाजपची येथील ताकद कमी होत गेल्याने 1996 व 1998 या काळात भाजपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा लागला. शिवसेनेचे विद्यमान विधान परिषद सदस्य मधुकर सरपोतदार येथून दोन वेळा निवडून आले होते; मात्र त्यानंतर सरपोतदार यांच्या वाट्याला येथून सातत्याने पराभवच आला. सुनील दत्त यांच्या निधनानंतर 2005 माध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांनी येथून कॉंग्रेसच्या विजयाचा वारसा कायम राखला. या पोटनिवडणुकीतही सरपोतदारांना पराभवाचे पाणी चाखावे लागले. शिवसेनेची या मतदारसंघात डाळ न शिजल्याने आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ सेनेकडून भाजपच्या वाट्याला आला आहे.कॉंग्रेसतर्फे खासदार प्रिया दत्त यांना पुन्हा मैदानात उतरविण्यात येणार आहे. त्यांच्या नावाची दिल्ली दरबारी एकमुखी शिफारस झाल्याचे कळते. प्रिया दत्त यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. विशेषत: नव्याने समावेश झालेल्या मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रिया दत्त यांच्या विरोधात भाजपतर्फे नक्की कोण, हा प्रश्न अजून अधांतरी आहे. भाजप तोडीस तोड उमेदवाराचा शोध घेत आहे. पूनम महाजन आणि नजमा हेपतुल्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मनसेतर्फे शिल्पा सरपोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सरपोतदार यांची ही निवडणूक पहिलीच असली, तरी त्यांनी शिवसेनेत असताना मधुकर सरपोतदार यांच्या प्रचारासाठी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. या जनसंपर्काचा त्यांना फायदा होईल, असे मनसेच्या धुरीणांना वाटत आहे. उत्तर भारतीय, मुस्लिम, दलित यांच्या मतांवर मदार असलेल्या बसपने या मतदारसंघातील आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत; मात्र बसपची उमेदवारी एखाद्या बड्या उद्योजकाला मिळण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघातील जनतेचे नेतृत्व करण्यासाठी कोण कोण उत्सुक आहे, कोणाच्या विरोधात कोण उभे ठाकणार, हे चित्र अजून धूसरच आहे.
....योगेश पवार
हत्तीच्या पावलांचा ठसा उमटणार?
योगेश पवार/ सकाळ वृत्तसेवांमुंबई, ता. 17 : तळकोकणातील दोडामार्गात धुमाकूळ घालणाऱ्या कर्नाटकच्या हत्तींनी सरकारच्या नाकीनऊ आणले असताना उत्तरेकडील "हत्ती'च्या चालीने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना सध्या अस्वस्थ केले आहे. या लोकसभा निवडणुकीत मायावतींचे "मायाजाल' महाराष्ट्र काबीज करणार नसले, तरी त्यांची मोहिनी मात्र राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेली आणि अनेकांचा पराभव करण्यात प्रमुख भूमिका वठवणारा बहुजन समाज पक्ष या वेळी मुंबईतील सहा आणि ठाण्यातील चार जागांवर पुन्हा त्याच भूमिकेत वावरेल. त्यामुळे हत्तीच्या पावलांचा ठसा राज्याच्या भूमीवर उठून दिसणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. धीम्या गतीची चाल चालणाऱ्या हत्तीने आता आपली चाल वेगवान केली आहे. उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशामुळे "बसप'च्या महत्त्वाकांक्षेने भरारी घेतली. "तिलक, तराजू और तलवार; इनको मारो जुते चार' अशी हाकाटी देणाऱ्या बसपने यू टर्न घेत, "हाती नही गणेश है..'चा नारा दिला आहे. सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला महाराष्ट्रात आजमावू पाहत आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये हा फॉर्म्युला त्यांनी वापरला आहे. सोशल इंजिनिअरिंगबरोबरच गेल्या काही निवडणुकांतील अनुभव गाठीशी घेऊन "बसप'चे या वेळी तगडे उमेदवार दिले आहेत. उद्योजक आणि बड्या माशांना गळाला लावले आहे. निवडणुकीत पैशासह बलशक्तीचा वापर होतो. याला चोख उत्तर देता यावे, यासाठी "लोहा लोहे को काटता है' या न्यायाने उमेदवारांची निवड केली आहे. मुंबईतून मोहम्मद अली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार अरुण गवळी, ठाण्यातून उद्योजक त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे; तर मुंबई - ठाण्यात अन्य जागांवरही धनशक्ती आणि बलशक्ती असणाऱ्यांना उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.2004 मध्ये दक्षिण मध्य मुंबईतून "बसप'च्या अब्दुल चौधरी यांना 1.35 टक्के मते मिळाली होते. येथून लढलेल्या अरुण गवळींना 26.50 टक्के मते मिळाली होती. या वेळी गवळी "बसप'च्या तंबूत डेरेदाखल झालेत. ते येथील संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात "बसप' वरचढ ठरणार आहे. दक्षिण मुंबईत 0.62 टक्के, उत्तर पूर्वमध्ये 1.01, उत्तर पश्चिम मध्ये 0.92, उत्तर मुंबईत 0.83; तर ठाण्यात 1.89 टक्के मते मिळविली होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ही मते होती. या वेळी या टक्केवारीत सुधारणा होईल; पण विजयी मते मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बसपने 1984 पासून निवडणुका लढायला सुरुवात केली. तेव्हा भूमिका वेगळी होती. या वेळी पडण्यासाठी वा पाडण्यासाठी लढायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला असला, तरी महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई - ठाण्यात बसपच्या सीट जिंकण्याएवढे वातावरण नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बसपचा भर उत्तर भारतीय आणि दलित मुस्लिमांवर आहे. लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. संभाव्य उमेदवारांना कामाला लावले. ठाणे, मुंबईसह विदर्भ, कोकण, मराठवाडा या भागांत संमेलने घेतली. मुंबईत "भाईचारा' संमेलनावर भर दिला आहे. सत्तेची मोठा मोठी आश्वासने न देता सामान्य व्यक्तीच्या प्रश्नाला हात घालत सर्वांना समान वागणूक देण्याचा वादा ते करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाला आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या पाठीमागे सुरू असलेल्या लांगूलचालनाला कंटाळलेली आंबेडकरी जनता, मनसेच्या आंदोलनामुळे बुजलेले उत्तर भारतीय, झोपडीवासीय या वेळी एक संधी यांनाही देऊन बघू, असा विचार करण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन नेते बसपचा आपल्याला काहीच धोका नसल्याचे छातीठोकपणे सांगत असले, तरी त्यांनीही बसपच्या वाढत्या ताकदीचा अंदाज घ्यायला सुरवात केली आहे. बसपच्या नेत्यांनी आपल्या मुंबईसह राज्यातील काही जागांवर विजय अपेक्षित असल्याचा दावा केला असला, तरी घोडामैदान जवळच आहे.
......
अखेर दिलीप देशमुख मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 : कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणातील हिशेब पूर्ण करण्याचा भाग म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे बंधू दिलीप देशमुख यांचा आज अचानक राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देशमुख यांच्या समावेशाने आता मंत्रिमंडळातील सर्व जागा पूर्ण झाल्या असून, कॉंग्रेसच्या विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाचे तरी खाते कमी करून, ते देशमुख यांना द्यावे लागणार आहे.गेल्या महिन्यात (19 फेब्रुवारी) तीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्या वेळी दिलीप देशमुख, गोविंदराव आदिक, राजेंद्र दर्डा व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे समर्थक कालिदास कोळंबकर यांच्यापैकी कोणाचा समावेश करायचा यावरून पेच निर्माण झाल्याने पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे एक जागा रिक्त ठेवूनच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या राजकारणाला कंटाळून गोविंदराव आदिक यांनी कॉंग्रेसचा त्याग करून, आज नाशिक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नेमका हाच मुहूर्त साधून दिलीप देशमुख यांची तडकाफडकी मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या मेळाव्याचा उल्लेख करीत आम्ही या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम घेतल्याची टिप्पणी केली. घाईघाईत झाला शपथविधीदेशमुख यांना त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचा फोन दुपारी 4 वाजता आला. त्या वेळी ते लातूरला होते. सायंकाळी 6 वाजता शपथविधीची वेळ ठरविण्यात आली होती. मात्र, एवढ्या कमी वेळेत त्यांना मुंबईत येणे शक्य न झाल्याने शपथविधी अखेर सायंकाळी 7.30 वाजता झाला. देशमुख हे खास विमानाने मुंबईत दाखल झाल्याचे कळते. दिलीप देशमुख यांच्या समावेशाने विलासराव देशमुख यांचे मंत्रिमंडळातील वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, त्यांनी नारायण राणे यांच्यावर कुरघोडी करीत बाजी मारली आहे. लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच रिक्त पद भरून असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते.देशमुखांची अनुपस्थितीधाकट्या भावाच्या शपथविधीला विलासराव देशमुख यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री या वेळी उपस्थित नव्हता. दिलीप देशमुख यांच्या पत्नीसाठी राखून ठेवण्यात आलेले आसनही रिकामेच होते. तसेच लातूर येथील एका सामूहिक विवाह सोहळ्याला विलासराव गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे दिलीप देशमुख यांनी सांगितले.मराठवाड्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नव्हते यासाठी आपण दिलीप देशमुख यांचा समावेश केल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्याचा आपण प्रयत्न केला, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. विलासराव देशमुख यांच्या वर्चस्वाबद्दल विचारले असता, त्यांनी विलासरावांचे वर्चस्व नेहमीच राहिल्याचे सांगितले.दिलीप देशमुख यांनी मात्र आपण कोणत्याही खात्यासाठी आग्रही नाही. मुख्यमंत्री देतील त्या खात्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. आपण सभागृहाचे सदस्य असून, लोकांनीही निवडून दिलेले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळणे यात काहीही गैर नाही आणि घराणेशाहीचाही प्रश्न नाही. आम्हा दोघांपैकी कोणी तरी राज्याच्या सेवेत राहावे, असा उद्देश असल्याची प्रतिक्रियाही देशमुख यांनी व्यक्त केली.
......
अमरावतीच्या कांचनमालाचे सागराला आव्हान
सकाळ वृत्तसेवा ंमुंबई, ता. 7 : स्वत:च्या डोळ्यांनी तिने कधीही जग पाहिले नाही; मात्र या जगावर अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांशा तिने मनाशी बाळगली आहे. सागराला आव्हान देणाऱ्या या सागरकन्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत. ही यशोगाथा आहे अमरावती येथील सतरा वर्षांच्या कांचनमाला ज्ञानेश्वर पांडे या अंध मुलीची. कांचनमालाच्या विक्रमांची नोंद "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने'ही घेतली आहे.जन्मताच कांचनमालाची दृष्टी नियतीने हिरावून घेतली. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिला पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास तिच्या पालकांनी सुरुवात केली. त्यामुळे कांचनमालाची जणू पाण्याशीच मैत्री जडली. यातून तिने स्थानिक व शालेय पातळीवरील जलतरण स्पर्धांतून सहभाग घेत अपंगांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदके पटकाविली. अमरावती येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍण्ड ह्युमॅनिटी या शिक्षण संस्थेत बारावीत शिकत असून नुकतीच तिने परीक्षा दिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिने 14 सुवर्णपदके पटकावली आहेत. 2001 ते 2007 या कालावधीत झालेल्या अपंगांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहा सुवर्णपदके, 2004 मध्ये पॅराऑलिम्पिक कमिटीच्या वतीने बेंगळूरु येथे आयोजित करण्यात आलेल्या अपंगांच्या क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके, तसेच 2006 मध्ये आठव्या सीनिअर नॅशनल स्पर्धेत तीन सुवर्ण, नागपूर येथे 2007 मध्ये झालेल्या "आठव्या सीनिअर महाराष्ट्र स्टेट पॅराऑलिम्पिक' स्पर्धेत चार सुवर्णपदकांची तिने कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कांचनमालाने आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. 2006 मध्ये झालेल्या आठराव्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही तिने सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभाग घेणारी ती पहिली अंध जलतरणपटू ठरली. बर्लीन येथे झालेल्या फॅसिफिक क्रीडा स्पर्धेत तिने एक सुवर्ण आणि एक रजतपदक पटकावले आहे. 2008 मध्ये बाविसाव्या जर्मन खुल्या जलतरण स्पर्धेत तिने 50 आणि 100 मीटर बॅस्ट्रोक स्पर्धेत सुवर्ण आणि रजतपदक पटकावले आहे. "सनरॉक ते गेट वे' हे अंतरही तिने यशस्वीपणे पार केले आहे. "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नेही तिच्या या कामगिरीची नोंद घेतली आहे.इन्फोबॉक्सपोहताना लक्ष्य गाठणे हेच उद्दिष्ट"सकाळ'शी बोलताना कांचनमाला म्हणाली की, पाण्याशी माझे नाते जडले आहे. मी जेव्हा पोहायला उतरते तेव्हा मला कसलीच भीती वाटत नाही. माझ्या दोन्ही बाजूला रस्सी धरली जात असल्याने त्याच्या अंदाजने मी पोहते. तेव्हा केवळ लक्ष्य गाठणे हेच माझे उद्दिष्ट असते. अंध-अपंग म्हणून सहानुभूती मिळण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने नाव कमवावे, असे मनाशी ठरविले असल्याचे तिने सांगितले.
.........
मग रेल्वे घरी नेऊन पार्क कर...
रेल्वेच्या डब्यात किंवा बसमध्ये खिडकीजवळची जागा पटकाविण्यासाठी प्रवाशांमध्ये नेहमीच चढाओढ लागते. जागा अडविण्याच्या स्पर्धेत मग भांडणेही जुंपतात. परवाचीच घटना सीएसटीहून अंबरनाथला जाणाऱ्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी नसतानाही झुंबड उडाली (सवयीप्रमाणे). एका प्रवाशाने गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर खिडकीतून रुमाल टाकून जागा अडवून ठेवली, मात्र गाडीत चढल्यावर दुसऱ्याच प्रवाशाने ती जागा पटकाविली. त्यामुळे दोघेही त्या जागेवर आपला दावा सांगू लागले. मग दोघांत जोरदार बाचाबाची सुरू झाली, हमरीतुमरीवरून प्रकरण गुद्द्यावर आले. दोघेही एकमेकांच्या आई-बहिणींचा उद्धार करीत मनसोक्त शिव्या हासडीत होते. गाडीतील सारे प्रवासी त्यांचा हा "तमाशा' गंभीरपणे पाहत होते. आता एकमेकांची डोकी फुटणारच, असे वाटत असताना काही प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले, मात्र तरीही त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच होते. "तुझ्या बापाची गाडी आहे काय? गाडी विकत घेतलीय काय तुझ्या बापाने...?' असे त्यातील एकाने सुनावले. त्यावर चवताळलेल्या दुसऱ्याने त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं. "अरे जारे... माझ्या बापाची गाडी नाही, पण तुझ्या बापाने खरेदी केली असेल, तर घरी नेऊन पार्क कर जा,' असे म्हणताच येवढा वेळ दोघांचे भांडण गांभीर्याने पाहणाऱ्या प्रवाशांच्या हास्याचा बांध फुटला आणि सारे खो-खो हसू लागलं. गाडीतील वातावरण क्षणार्धात बदललं. त्यामुळे खजील झालेल्या एका भांडखोराने पुढच्या स्टेशनला गाडी सोडली की हो...
- योगेश पवार
बाजारात तुरी...
..........
योगेश पवार...
हत्ती' रुतला; पण टक्का वाढलाबसपची वाटचाल
ंमुंबई, ता. 17 : लोकसभा निवडणुकीत राज्यात बहुजन समाज पक्षाचा हत्ती धुमाकूळ घालणार असा अंदाज होता; मात्र या पक्षाला राज्यात आपले खातेसुद्धा उघडता आलेले नाही. बसपचा हत्ती पराभवाच्या गर्तेत रुतल्याचे दिसत असले तरी 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी बसपच्या मतांच्या टक्केवारीत 3.35 टक्केवरून सहा टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसते. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीयांनी ठेंगा दाखवल्याने मुंबईत "बसप' प्रभाव दाखवू शकली नाही. राज्यातील 21 मतदारसंघात "बसप' तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. मनसेच्या तुलनेत बसपला मिळालेली मते पाहता "हत्ती छाप' अजूनही राज्यातील जनतेला फारसा मान्य नसल्याचे दिसते. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटावर "हत्ती'ला आता आपली चाल बदलावी लागणार आहे.उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींना सत्तेचे सिंहासन बहाल करणाऱ्या "सोशल इंजिनिअरिंग'चा फॉर्म्युला महाराष्ट्रात फसला. त्यामुळे मायावतींची "माया' राज्यात चालली नाही. राज्यातील 47 मतदारसंघांत बसपने स्वबळावर उमेदवार उभे केले होते. एकाही जागेवर त्यांना विजय मिळविता आला नाही. या वेळी बसपने कोट्यधीश उमेदवार दिले होते. अन्य पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी "बसप' बाजी मारेल, अशी हवा होती. बसपच्या नेत्यांचाही तसा दावा होता; मात्र विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख उमेदवारांना पाडण्याच्या भूमिकेतच बसप वावरल्याचे दिसून आले.बसप आणि मनसे सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत बसपला राज्यात सुमारे 10 लाख 30 हजार मते मिळाली होती. या वेळी त्यात वाढ होऊन ती 18 लाख इतकी झाली आहेत. मराठवाडा, विदर्भ, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी भागांत बसपच्या मतांमध्ये सुमारे दीड लाख मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यापुरतेच समाधान बसपला आहे. नवख्या मनसेच्या 12 उमेदवारांनी बसपच्या 47 उमेदवारांच्या तुलनेत पहिल्याच दणक्यात मिळवलेल्या मतांची टक्केवारी पाहता, बसपच्या राज्याच्या राजकारणातील मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.कॉंग्रेसच्या प्रचाराचा फटका गडचिरोली- चिमूर, वर्धा, हिंगोली, नागपूर, अहमदनगर या ठिकाणी बसपच्या उमेदवारांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली. राज्यात 21 ठिकाणी बसप तिसऱ्या स्थानावर राहिली. मुंबईतील उत्तर भारतीय आणि दलित व मुस्लिम मतांवर बसपची मदार होती. त्यासाठी भाईचारा मेळावे घेतले गेले; मात्र या मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजूने कौल देत बसपला ठेंगा दाखविल्याने बसपचे मुंबईत पानिपत झाले. कॉंग्रेसची लाट आल्याने बसपला फटका बसला. तसेच दलित मुस्लिमांनी बसपला मते दिल्यास शिवसेना-भाजपचा फायदा होईल, असा प्रचार कॉंग्रेसने केल्याने त्याचा फटका बसल्याचा दावा बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केला आहे. दरम्यान "सोशल इंजिनिअरिंग'चा झालेला विचका आणि उत्तर प्रदेशची राज्यात सर्व बाबतीत "कॉपी टू कॉपी' करण्याची भूमिका याचा फटका बसपला बसला असल्याचे दिसते.
........
17/5/09
"मनसे'मुळे भाजपची हार हत्ती बसला :
विकासाचा मुद्दा प्रिया दत्त यांच्यासाठी लाभदायक
योगेश पवार : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 16 : मतदारसंघांच्या पुनर्रचनेत झालेले बदल आणि "बसप'चा प्रवेश यामुळे कॉंग्रेसला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात या वेळी तरी मात देता येईल, अशी अटकळ भाजपचे चाणक्य बांधून होते, मात्र मोठी हवा करूनही बसपचा बार फुसका ठरल्याने व भाजपच्या पारड्यात पडणाऱ्या मराठी मतांमध्ये "मनसे' वाटेकरी झाल्याने भाजपचे हे मनसुबे पार धुळीस मिळाले आहेत. भाजप आणि मनसेच्या मतांमध्ये असलेल्या अवघ्या काही हजार मतांच्या फरकावरूनच हे स्पष्ट होते. थोडक्यात "मनसे'ची भूमिका भाजपच्या पराभवाला कारण ठरली; तर बसपचा फेल गेलेला फॅक्टर कॉंग्रेसच्या विजयाला हातभार लावणारा ठरला आहे. मतदारांना नवा चेहरा दिल्याचा फटकाही भाजपला बसला आहे. विकासाचा मुद्दा ही प्रिया दत्त यांची जमेची बाजू ठरली आहे. "बसप'ची हवा काढत मतदारांनी त्यांचे पानिपत केले. हत्तीला येथे जागा नाही, असाच कौल मतदारांनी दिला आहे.कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त, भाजपचे ऍड. महेश जेठमलानी, मनसेच्या शिल्पा सरपोतदार आणि बसपचे हाजी इब्राहिम शेख असा चौरंगी सामना रंगेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती, मात्र कॉंग्रेसने येथे एकतर्फी विजय मिळविला आहे. प्रिया दत्त यांना तब्बल एक लाख 74 हजार 755 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. उत्तर मध्य मुंबई हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. दिवंगत खासदार सुनील दत्त यांनी या मतदारसंघाची बांधणी केली आहे. पुनर्रचनेत यामध्ये मोठा बदल झाला असला, तरी ज्या कुर्ला आणि चांदीवलीचा यात नव्याने समावेश झाला तो भागही कॉंग्रेसच्या वर्चस्वाचा असल्याने प्रिया दत्त यांना ही निवडणूक सोपी गेली. विरोधकांकडून विकासकामांवरून टीका होत असताना प्रिया यांनी विकासकामालाच प्रचाराचा मुद्दा बनविला होता आणि हाच मुद्दा त्यांच्या पथ्यावर पडला. शिवाय "मै सुनील दत्त और नर्गीस दत्त की बेटी हूँ' या भावनिक आवाहनाला मतदारांकडून मिळालेली सहानुभूतीही त्यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. प्रिया दत्त यांची ही दुसरी निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी मतदारसंघही पिंजून काढला. प्रचाराच्या हायटेक यंत्रणा वापरल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बड्याबड्या नेत्यांनी प्रचारात घेतलेल्या सहभागाचा त्यांना फायदा झाला. प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याचे त्यांनी पद्धतशीरपणे टाळले; तर दुसऱ्या बाजूला ऍड. महेश जेठमलानी प्रचारात कमी पडले. प्रचारासाठी ठोस मुद्दाच त्यांच्याकडे नव्हता. शिवाय भाजपचा हा चेहरा लोकांसाठी परिचयाचा नसल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला या निवडणुकीत बसला. शिवसेनेकडून बऱ्याच कालावधीनंतर हा मतदारसंघ भाजपकडे आला होता. शेवटपर्यंत भाजपला येथे उमेदवार सापडत नव्हता. शेवटी ऍड. महेश जेठमलानी यांच्या रूपाने भाजपने उमेदवार दिला, मात्र तोही नवखा असल्याने भाजपला अपेक्षित मजलही मारता आली नाही. भाजपच्या पारड्यात एक लाख 44 हजार 697 मते पडली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रचाराला लोकांनी प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होते. मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांचीही ही पहिलीच निवडणूक होती, मात्र यापूर्वी त्यांनी सासरे मधुकर सरपोतदार यांच्या प्रचारात सहभाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात पूर्वीपासून जनसंपर्क होता. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. सरपोतदार यांना तब्बल एक लाख 32 हजार 555 मते मिळाली आहेत. थोडक्यात या मतदारसंघातील निकाल अपेक्षित असला तरी मनसेने मारलेली मजल साऱ्यांच्याच भुवया उंचावणारी आहे.
-----------------------------------
15/5/09
कसाबला भरचौकात फाशी द्या!
26/11 : सोलापूरच्या जखमी शब्बीरचा उद्वेग
योगेश पवार / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 25 : हज यात्रेला निघालेल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी सीएसटी रेल्वेस्थानकावर आलेल्या सोलापूर येथील जाडभाई पेठेत राहणारे शब्बीर सलाम दलाल हे 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सापडले. सीएसटी रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात जबर जखमी झालेल्या शब्बीर यांच्यावर जे.जे. रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. सहा महिन्यांनंतरही दहशतवादी हल्ल्यातील त्यांच्या आठवणी आणि अंगावरील जखमा ओल्या आहेत. शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या कसाबला भरचौकात फाशी झाली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली.हजला निघालेल्या आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी शब्बीर दलाल आपल्या अन्य नातेवाईकांसह त्या दिवशी सीएसटी रेल्वेस्थानकावर आले होते. त्यावेळी अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अजीज रामपुरे, इजाज दलाल हे त्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले. प्रसंगावधान राखून जमिनीवर झोपल्याने शब्बीर वाचले. मात्र अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या उजव्या पायाचा वेध घेतला. पायात दोन गोळ्या घुसल्या. एका व्यक्तीने त्यांना हातगाडीवर झोपवून जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शब्बीर यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. ते जायबंदी झाल्याने तो बंद झाला आहे. चार मुली, एक मुलगा, आई, पत्नी असा मोठा परिवार आहे. एका मुलीचे लग्न तोंडावर आले आहे. सरकारने दिलेली मदतही औषधोपचारात खर्च झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे शब्बीर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. जगाला हादरविणाऱ्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांना अजूनही शिक्षा झाली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या कसाबचे लाड करण्यापेक्षा त्याला भर चौकात फाशी द्या. असे हल्ले करण्यासाठी पुन्हा कोणी धजावणार नाही अशीच शिक्षा त्याला झाली पाहिजे, असे ते सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील संताप आणि हल्ल्याच्या वेळचा थरार स्पष्टपणे जाणवतो. इस्लाम धर्म एखाद्याचा जीव घ्यायची शिकवण देत नाही. कोणाला मारण्याचा कोणालाही अधिकार नाही. हिंदू, सीख, इसाई सारे भाई भाई अशी धर्माची शिकवण आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना माफ करू नये, असे ते संतापाने सांगतात. जे.जे. रुग्णालयात मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मृत्यूच्या दाढेतून आपल्याला डॉक्टरांनीच बाहेर काढले, असे ते आवर्जून सांगतात.
........
26/5/09
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेलामुंबई विद्यापीठाचा
मुंबईता. 30 : मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रकियेत मोठ्या प्रमाणावर अडचणी जाणवल्याने या वर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया न राबविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, बी.एस्सी. आय. टी. विद्यार्थ्यांना जून 2009 मध्ये होणाऱ्या परीक्षेत ऑनलाइन हॉल तिकीट देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाच्या दूरस्थ विभागाच्या वतीने गतवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी दूरस्थ विभागाद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रवेश पद्धतीसह ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा पर्याय उपलब्ध करून दिला होता; मात्र गेल्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या 70 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 550 विद्यार्थ्यांनी ऑनलाइनचा पर्याय निवडून प्रवेश घेतला. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ संगणक येऊन चालत नाही; त्यासाठी "नेटसॅव्ही' असण्याची गरज आहे. तसेच संगणकावरील अर्जावरच्या सूचना विद्यार्थी काळजीपूर्वक वाचत नाहीत. ऑनलाइन अर्ज भरायचा असल्याने विद्यार्थी गडबडून जातो, त्यामुळे तो चुकीची माहिती भरतो, क्लास, कॅटेगरी यांच्या संकल्पना त्यांना स्पष्ट होत नाहीत, डीडी नंबर आणि डीडीवरील एमआयसीआर नंबर यातील घोळ विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे ते चुकीची माहिती भरतात, असे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या वेळी ऑनलाइन प्रवेश पद्धतीला रामराम करण्याचे ठरविण्यात आले आहे.ऑनलाइन हॉल तिकीटबी.एस्सी. आय.टी.च्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट देण्याची विद्यापीठाची नवी योजना आहे. पुणे विद्यापीठाने ऑनलाइन हॉल तिकीट देण्याची योजना राबविली होती; त्याला चांगले यश मिळाल्याने मुंबई विद्यापीठही हा प्रयोग करणार आहे. या माध्यमतून ऑनलाइन पद्धतीचीच एकप्रकारे पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.दरम्यान, गेल्या वर्षीचा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाचा अनुभव चांगला नसताना सरकारने या वेळी पारंपरिक पद्धतीचा पर्याय न ठेवता केवळ ऑनलाइन प्रवेशावर मदार ठेवली आहे. ऑनलाइन प्रवेशात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्याचा फटका अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन पद्धतीलाही बसू शकतो, असे मत विद्यापीठातील काही जाणकारांनी व्यक्त केले.
........
30/5/09
भाजप आळवतोय "चलो ! फिर दीप जलाये'
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे मुंबईत पानिपत झाल्याने भाजपची अवस्था "भरी दुपहारी में अंधियारा...' अशी झाली आहे. निराश झालेल्या युतीच्या कार्यकर्त्यांत पुन्हा नव्याने जान फुंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काव्य पक्तींचाच आधार सध्या वाटत आहे. लोकसभा निवडणुकीतील श्रम परिहार करण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी "भरी दुपहारी में अंधियारा...चलो ! फिर दीप जलाये...' चे सूर आळवत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून माजीमंत्री राम नाईक तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून ऍड्. महेश जेठमलानी हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले. या पराभवाने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने लोकसभेतील पराभवाची मरगळ झटकून कार्यकर्त्यांना रिफ्रेश करण्यासाठी भाजपने मेळावे सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाट्याला आलेला पराभव हे वास्तव असले तरी त्याचा सूड आपण विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ, असा इशारा विरोधकांना दिला आहे. लोकसभेच्या निकालामुळे कार्यकर्त्यांनी हताश होण्याचे कारण नाही. लोकसभेत जनतेने ना "भाजप'ला पूर्णपणे नाकारले ना कॉंग्रेसला संपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळे पक्षाला अजूनही चांगली संधी आहे, असा दावा तावडे यांनी केला.केंद्रीयमंत्री राम नाईक यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात मनसेमुळे कॉंग्रेसचा विजय झाला व आपल्याला हार पत्करावी लागल्याचे सांगितले. आगामी काळात राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून नवीन रणनीती ठरविण्याची गरज असल्याचे राम नाईक यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची, "चलो ! फिर दीप जलाये' कविता म्हटली. मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या निवडणुकीतही लोकसभेतील आव्हानेच पुढे उभी राहणार असल्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य वेधले. तर शिवसेना विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांनी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून उत्तर मुंबईत पुन्हा युतीचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला उत्तर मुंबईतील युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
.........
5/6/06
जीव गेला तरी बेहत्तर, आता माघार नाही!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 28 : "उपोषणाचा इशारा दिला की, सरकारने आश्वासने देऊन स्वतःची सुटका करून घ्यायची व पुढे काहीच करायचे नाही, हे आता चालणार नाही. आपल्या मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय दिल्याशिवाय माघार घेणार नाही. मग जीव गेला तरी बेहत्तर', अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सरकारच्या विरोधात 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणाऱ्या "ऐलान-ए-जंग'चा निर्धार व्यक्त केला. या लढाईत जनतेने रस्त्यावर उतरून साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.पीपल्स ऍक्शन कमिटी आणि लोकभारतीच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात "शिक्षण, आरोग्याचे बाजारीकरण आणि शिक्षणाचे गुन्हेगारीकरण या विरोधातील इशारा सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती दरवर्षी संकेतस्थळावर जाहीर करावी, नगरसेवकांना परत बोलाविण्याचा कायदा करावा, विकासनिधीच्या खर्चासाठी वॉर्ड सभेची मंजुरी घेण्याचा कायदा करावा, निवडणुकीत नापसंतीचा अधिकार द्यावा, दारूबंदीचा कायदा अंमलात आणावा, राज्यातील पतसंस्था व बॅंकांमधील ठेवी बुडालेल्या ठेवीदारांचा पैसा सरकारने द्यावा, आदी मागण्या हजारे यांनी केल्या आहेत. मी काही पक्षांच्या विरोधात निवडणुकीच्या तोंडावर आंदोलने करतो असा काही लोकांना भास होतो. पण कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. कोणी भ्रष्टाचारात ग्रॅज्युएशन केले आहे तर कोणी पीएचडी केली आहे. त्यामुळे कोणाची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चर्चा झाली. मात्र राज्याच्या ग्रामीण भागात गावगुंडांच्या दहशतीखाली जगणाऱ्या जनतेची अवस्था त्याहीपेक्षा वाईट असून सरकारला त्याची अजिबात काळजी नाही.महाष्ट्राचा बिहार करणार काय ?राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव झाला आहे. बिहारमधले सुपाऱ्यांचे लोण राज्यातही आले आहे. माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली. राजकारणी महाराष्ट्राचा बिहार करीत असून सत्ताधारी बेहोश झाले आहेत, अशी टीका हजारे यांनी केली. येत्या निवडणुकीत जनतेने चारित्र्यवान प्रतिनिधी निवडावेत. राजकारणाला गटारगंगेची अवकळा आली असली तरी ती साफ करण्यासाठी चांगल्या लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. इशारा सभेत बोलताना आमदार कपिल पाटील यांनी व खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा केल्याचे त्यांनी सांगितले.
..........
27/7/09
Saturday, July 25, 2009
डॉक्टरांअभावी राज्यातील शासकीय रुग्णालये अत्यवस्थ
योगेश पवार : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 : राज्य सरकारच्या आरोग्य सेवेतील "अ' वर्ग दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुमारे दोन ते अडीच हजार पदे रिक्त आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांचाही दुष्काळ आहे. त्यामुळे राज्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची हेळसांड होत असून, रुग्णालयांची स्थिती अत्यवस्थ झाली आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपकरणांसह तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत, अशी स्थिती बहुतांश ठिकाणी आढळते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. परिणामी येथील रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणेसारख्या शहरात धाव घ्यावी लागते, तर काही वेळा रुग्ण उपचारांअभावीच मृत्यूपंथाला लागतात.सध्या आरोग्य खात्यात "अ' वर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ आदी; तसेच पदव्युत्तर पात्रता असणाऱ्या डॉक्टरांच्या सरासरी 50 टक्के जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, अशी माहिती "आरोग्य सेवा अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य' यांनी दिली.राज्यात 1,817 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण, कुटीर, उपजिल्हा रुग्णालये यांची संख्या 443 असून, मनोरुग्णालय, स्त्रीरुग्णालय, क्षयरोग रुग्णालये 17 व जिल्हा रुग्णालये 23 आहेत. शासकीय सेवेत मिळणारा कमी पगार आणि सुविधा यामुळे डॉक्टरांची नवी पिढी सरकारी सेवेकडे वळत नसल्याचे मत आरोग्य सेवा अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अशोक कांबळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. जिल्हा रुग्णालये, मनोरुग्णालये, स्त्रीरुग्णालये, कुटीर व उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्यवसाय रोध भत्ता मिळत नाही. हा भत्ता सुरू केल्यास; तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोग शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होईल. त्यामुळे केवळ पैसे नाहीत म्हणून खासगी सेवेकडे वळणारे तज्ज्ञ डॉक्टर शासकीय सेवेकडे वळतील, असा विश्वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.
वर्ग मंजूर जागा रिक्तवैद्यकीय अधिकारी
गट "अ'- 7281 2200
जिल्हा शल्यचिकित्सक- 611 371
जिल्हा आरोग्य अधिकारी- 277 96
तज्ज्ञ डॉक्टर- 516 348
................................................
महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणार
सकाळ/वृत्तसेवा
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचा झपाट्याने विकास होत आहे. या विकासात सुसूत्रता असावी. हे शहर न्यूयॉर्क, टोकियो या शहरांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांशी स्पर्धा करणारे असावे; मात्र शहराचा विकास करताना त्याचा मानवी चेहरा हरवता कामा नये, यासाठी मी येत्या पाच वर्षांच्या काळात अधिक जोमाने काम करणार आहे. तसेच मुंबईच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करू, अशी ग्वाही लोकांशी "हार्ट टू हार्ट' संवाद साधणारे नवनिर्वाचित खासदार एकनाथ गायकवाड यांनी "सकाळ'च्या "मुंबई टुडे'च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त दिली. मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रश्नांचा वेध घेणाऱ्या "मुंबई टुडे'च्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा देताना गायकवाड यांनी मुंबईच्या समस्या आणि त्यांचे निराकरण याविषयी आपली स्पष्ट मते मांडली. दिल्लीत सेंटर हॉलच्या छताखाली अन्य राज्यातील खासदार एकत्रित येऊन त्यांच्या राज्यातील विकासकामांबाबत धोरणे ठरवतात; मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रातील खासदार कोणत्याच प्रश्नावर एकत्रित येत नाहीत. मुंबईतून आम्ही कॉंग्रेसचे सहा खासदार दिल्लीत गेलो आहोत, तर महाराष्ट्रातील एकूण 48 खासदार दिल्लीत आहेत. या सर्वांनी अन्य राज्यांच्या खासदारांप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे. यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे.विकास निधीसाठी पाठपुरावांमुंबईच्या विकासाचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहेत. वाहतुकीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या "मोनो रेल', "मेट्रो रेल' प्रकल्पासाठी विकास निधी उपलब्ध व्हावा, म्हणून केंद्रात पाठपुरावा करणार आहे. मिठी नदी विकास प्रकल्प, ब्रिमस्टोवॅड, मुंबईला पाणीपुरवठा करणारा मध्य वैतरणाचा प्रकल्प यांसाठी निधी मिळावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा ही जीवनवाहिनी आहे. या सेवेवर पडणारा ताण कमी व्हावा, रेल्वेच्या विकास योजनांना निधी मिळावा यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करणार आहे. मुंबईतील विकासाचे हे प्रकल्प मार्गी लागले तरच मुंबईकरांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे.विकासाला मानवी चेहरा हवा मुंबईचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने बदलत आहे; मात्र यातून सामान्य माणूस दूर फेकला जाऊ नये, त्यालाही सहज जीवन जगता येईल असा विकास असावा, असा माझा प्रयत्न आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजना राबविताना केवळ सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. यात बदल झाला पाहिजे. "एसआरए' योजना राबविताना तेथील रहिवाशांचा सर्वंकष विकास लक्षात घ्यायला हवा. त्यांना आरोग्य, शैक्षणिक सुविधेसह सर्व सुख-सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी मी सरकारी पातळीवर आग्रही आहे. सामान्य माणसाला आयुष्यात एकदाच घर मिळते. त्यामुळे त्याला मिळणारे घर दर्जेदार असायला हवे. यासाठी "एसआरए'च्या योजना अधिक चांगल्या व्हाव्यात. जनतेचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धारावीच्या झोपडपट्टी विकासाची योजनाही मानवी चेहरा असणारी असावी, असा माझा प्रयत्न आहे. येथील लोकांना घरे मिळावीत, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठीही मी प्रयत्नशील राहणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न सध्या आवासून उभा आहे. शहरात रोजगार उपलब्ध व्हावेत, आर्थिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण झाले तरच रोजगार उपलब्ध होईल आणि बेरोजगारीची समस्या सुटेल. शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन काही लोक राजकारणासाठी कृत्रिम शत्रू उभा करीत आहेत. कधी उत्तर भारतीय, कधी दलित, कधी छत्रपती शिवाजी महाराज, अशा भावनिक मुद्द्यांना हात घालून मूळ प्रश्नांपासून दूर नेत आहेत. उत्तर भारतीय लोक मुंबईत येऊन व्यवसाय करतात. ते व्यवसाय येथील स्थानिक मराठी माणूस का करीत नाही? स्थानिकांनी हे रोजगार हस्तगत केले तर अन्य लोकांना तेथे शिरकाव करण्याची संधीच राहणार नाही. त्यामुळे मराठी माणसाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. भाषा, प्रांत, विभाग यांचे लढे उभारून मुंबईचा विकास होणार नाही. जनतेच्या सामाजिक, आर्थिक, वैचारिक विकासाकडे लक्ष द्यायला हवे. आज उत्तर भरतीयांविरोधात लढणारे दलित, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींना त्यांच्या विकासासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधांच्या विरोधात आंदोलने करतात. सवलती मिळणारी ही माणसे मराठी नसतात का? सोयीनुसार रंग बदलून लोकांना खऱ्या प्रश्नापासून दूर नेणाऱ्यांपासून सावध राहण्याची आज गरज आहे....चौकट : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणारमुंबईच्या वैभवात भर टाकण्यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य स्मारक सरकारने उभारावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. चैत्यभूमीची जागा अपुरी असल्याने "एनटीसी' गिरण्यांच्या जागेची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनकार्याची माहिती देणारी आर्ट गॅलरी उभारण्याचाही माझा प्रयत्न आहे.
........
ठळक मुद्दे :- मुंबई जागतिक दर्जाचे सुंदर शहर व्हावे
- वाहतूक, राहणीमान, आरोग्याच्या समस्या सोडविण्यावर भर
- सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर भर
- विकास सर्वसामान्यांना सामावून घेणारा हवा
- बेरोजगारीवर मात करण्यासाठी गुंतवणूक वाढली पाहिजे
योगेश पवार......
चिमटे, कोपरखळ्या आणि मैत्रीची ग्वाही...!"
ब्रिटिशकालीन "वॉटर हायड्रण्ट' सध्या धूळ खात पडले
मुंबई : शहरात आपत्कालीन स्थितीत अत्यंत उपयोगी ठरणारे ब्रिटिशकालीन "वॉटर हायड्रण्ट' सध्या धूळ खात पडले आहेत. बहुतांशी वॉटर हायड्रण्ट रस्ता रुंदीकरणामुळे जमिनीत गाडले गेले असून, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दलाला घटनास्थळी पोचण्यासाठी बराच वेळ जातो. शहरातील काही भाग आता विकासामुळे व नव्या बांधकामांमुळे अरुंद आणि चिंचोळे झाले आहेत. झोपडपट्टी भागात आग लागल्यास तिथपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे तत्काळ आग आटोक्यात आणणे सहज शक्य होत नाही. वांद्रे येथील बेहरामपाड्यात नुकत्याच लागलेल्या आगीनंतर प्रकर्षाने ही गोष्ट पुढे आली. आग विझविण्यासाठी पाणी तत्काळ उपलब्ध व्हावे यासाठी ब्रिटिशांनी जमिनीखालील जलवाहिनीला जोडलेले "वॉटर हायड्रण्ट (पाण्याचे खांब) शहरातील मोक्याच्या जागी, रस्त्यालगत जागोजागी उभारले होते. ब्रिटिशांनंतर महापालिकेने ही यंत्रणा स्वीकारली खरी; मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची पूर्णतः वाताहत झाली आहे. काही वॉटर हायड्रण्ट मोडले आहेत. काही रस्त्याच्या आणि पदपथांच्या कामात जमिनीत गाडले गेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत यातून पाणी उपलब्ध होऊ शकत नाही; शिवाय अत्यंत हलगर्जीपणे ते जमिनीत गाडल्याने ते पदपथावर अडथळा बनले आहेत.सर्व्हे करण्याची मागणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत आता आवाज उठविला असून, मनसेचे प्रभाग संघटक मिलिंद पांचाळ यांनी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे "वॉटर हायड्रण्ट'चा सर्व्हे करावा आणि ते पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख टी. डी. करगोप्पीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वॉटर हायड्रण्टचा सध्या वापर होत नसल्याचे सांगितले. शहरात मोठी आग लागल्यास ती विझविण्यासाठी वॉटर हायड्रण्टद्वारे पाणी घेतले जात असे. मोक्याच्या जागी असणाऱ्या वॉटर हायड्रण्टमुळे आग विझविण्यासाठी मोठी मदत होत असे. पूर्वी यामध्ये सातत्याने पाणी असायचे; मात्र कालांतराने अन्य पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी कबूल केले."वॉटर हायड्रण्ट' जुन्या जलवाहिनीला जोडण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करायचा झाल्यास जलवाहिनी कार्यरत करावी लागेल, असे करगोप्पीकर यांनी स्पष्ट केले. हे "वॉटर हायड्रण्ट'चे पुनरुज्जीवन होणार काय, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे...............................
रामदास आठवले नव्या भिडूंच्या शोधात
योगेश पवार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले नव्या भिडूंच्या शोधात आहेत. आठवलेंच्या समोर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणे, डाव्यांच्या सेक्युलर आघाडीशी सलगी करणे किंवा रिपब्लिकन गटांचे ऐक्य घडवून आणणे, असे पर्याय असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे अन्य नेतेही ऐक्याची भाषा बोलत असल्याने आगामी काळात हे गट एकत्र येण्याची शक्यता आहे.कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपल्याला पराभूत केले, अशी भावना झालेले आठवले सध्या दोन्ही कॉंग्रेसवर खट्टू आहेत. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी दोन्ही कॉंग्रेसशी काडीमोड घेऊन शिवसेना- भाजपशी युती करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आठवले युतीच्या तंबूत जाणार, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिवसेना-भाजप किंवा "मनसे'बरोबर जाणार नसल्याचा निर्वाळा दिला. कार्यकर्त्यांचा युतीसोबत जाण्याचा आग्रह असला, तरी तो आता मावळल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनवणे यांनी पक्षाची भूमिका धर्मनिरपेक्ष असल्याने आपण शिवसेना-भाजपबरोबर जाण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगितले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप या पक्षांच्या व्यतिरिक्त एखादी सेक्युलर आघाडी स्थापन करण्याचा विचार सुरू असून, रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे ऐक्य घडवून आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार्य करण्यास तयार नसेल, तर स्वबळावर निवडणूक लढू, पक्षाची ताकद आजमावू, असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. सध्या पक्षाच्या विविध ठिकाणी बैठका सुरू असून, कार्यकर्त्यांची मते जाणून निर्णय घेतले जात आहेत, असे सोनवणे यांनी सांगितले.प्रा. कवाडेंचा ऐक्यासाठी पुढाकारपीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी, रिपब्लिकन ऐक्याची गरज असून, यासाठी आपण प्रत्येक गटाच्या नेत्याची भेट घेऊन ऐक्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. ऐक्य झाले नाही, तर स्वतःच्या गटाचे अस्तित्व कायम ठेवून सामुदायिकरीत्या रिपब्लिकन गटांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेक्युलर म्हणविणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस जर पुण्यात शिवसेनेशी युती करीत असेल, तर त्या पक्षाशी आठवलेंची मैत्री सेक्युलर कशी समजायची, असा सवाल त्यांनी केला. युती सोबत न जाण्याचा आठवलेंचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचे ते म्हणाले. जिथे आठवले तेथे भारिप नाहीरामदास आठवले ज्या आघाडीत असतील तेथे आपण जाणार नाही, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाने स्पष्ट केली आहे. आठवले जातील तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध असतो. त्यामुळे आठवलेप्रणीत आघाडीत जाऊन आम्ही आमच्या पायावर राजकीय धोंडा मारणार नाही, असे भारिपचे प्रवक्ते बाबूराव पोटभरे यांनी सांगितले. रिपब्लिकन (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते टी. एम. कांबळे यांनीदेखील रिपब्लिकन ऐक्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
-----------------
ममतांकडूनही "समता' नाही
योगेश पवार
रेल्वे बजेट : मुंबई, महाराष्ट्राच्या अपेक्षा फोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 3 : मुंबई उपनगरी रेल्वेच्या रखडलेल्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी निधी मिळेल, अशी अपेक्षा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून असताना त्यांनी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेतून अब्जावधी रुपयांचा महसूल मिळत असताना या सेवेबाबत रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक शब्दही न उच्चारल्याने मुंबईसह राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईला नेहमीच सावत्र वागणूक दिली गेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील उपनगरी रेल्वे सेवा अन्य राज्यांच्या तुलनेत त्यामुळे उपेक्षित राहिली. ममतांच्या कारकिर्दीत तरी महाराष्ट्राला समान वागणूक मिळेल, अशी आशा होती; पण आज तीही फोल ठरली. वाजपेयी सरकारच्या काळात मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. चार हजार 174 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध योजना एमयूटीपी-1 योजनेंतर्गत 2006 पर्यंत पूर्ण करावयाच्या होत्या; मात्र मार्च 2009 पर्यंत दोन हजार 800 कोटी रुपयेच या प्रकल्पावर खर्च झाले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी एक हजार 374 कोटी रुपयांची गरज आहे."एमयूटीपी-2' प्रकल्पात पाच हजार 300 कोटी रुपयांच्या योजना आहेत. या प्रकल्पाला मान्यताही देण्यात आली आहे; मात्र त्यावर प्रत्यक्षात 31 मार्चअखेर अवघे 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी अजून एक हजार 700 कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वे अर्थसंकल्पात ही तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली. विरार-डहाणू रोड मार्गाचे रुंदीकरण प्रलंबित आहे. 12 डब्यांच्या नव्या अत्याधुनिक 129 गाड्यांपैकी आणकी 78 गाड्या दाखल व्हायच्या आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आमूलाग्र बदलाची गरज आहे. मुंबईत लोकल गाड्यांना सकाळी व सायंकाळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावर आणखी महिला विशेष गाड्या सुरू करण्याची गरज आहे. मुंबईची तशी मागणी असताना रेल्वेमंत्र्यांनी चेन्नई व कोलकत्ता येथे महिला विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. गेल्या दोन अर्थसंकल्पांत द्वितीय श्रेणीचे भाडे कमी करण्यात आले; परंतु यातून मुंबई उपनगरी रेल्वे सेवेला मात्र वगळण्यात आले. ममतांच्या अर्थसंकल्पामध्येही हा अन्याय दूर झालेला नाही. महाराष्ट्राच्या अन्य भागांसाठीही काही देण्यात आलेले नाही. एकंदरीत रेल्वेमंत्र्यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबई, पुणे, नागपूर आदी रेल्वेस्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा दिलासादायक आहे. नाशिकमध्येही नाराजीनाशिक-मुंबई अशा दोन गाड्या सुरू कराव्यात, इगतपुरी-भुसावळ शटल सेवा सुरू करावी, अशा नाशिककरांची मागण्या होत्या; त्याही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. धुळे-इंदूर मार्गाचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. धुळे-चाळीसगाव-मुंबई गाडी सुरू करावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलने होत होती. त्यामुळे अर्थसंकल्पात या मागणीचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती; ती फोल ठरली आहे. औरंगाबादच्या पदरातही रेल्वेमंत्र्यांनी निराशाच घातली आहे. बीड-नगर रेल्वेमार्ग, नांदेड-मुंबई अशी नवी रेल्वेगाडी सुरू करावी, उत्तर भारताला जोडण्यासाठी नांदेडहून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात आदी मागण्या होत्या; मात्र या साऱ्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने मराठवाडाही नाराज आहे. हैदराबाद-उस्मानाबाद ही गाडी पुण्यापर्यंत चालविण्याचा निर्णय समाधानकारक आहे.पश्चिम महाराष्ट्राला दिलासापश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे. बेंगळूरु-हुबळी-सोलापूर आणि पुणे-दौंड-सोलापूर या गाड्या सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे; तर सोलापूर-हैदराबाद गाडी सुरू करण्याची मागणी मंजूर झालेली नाही. रेल्वे डबे बनविण्याच्या कुर्डुवाडी येथील कारखान्याला 250 कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अर्थसंकल्प संतापजनकमाजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक व संतापजनक असल्याची जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बजेट तयार करण्यापूर्वी आपण ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन मुंबईच्या समस्या मांडल्या होत्या; मात्र महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.रेल्वेच्या जागा विकसित करण्याची घोषणा प्रत्येक अर्थसंकल्पात केली जाते. माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनीही तशी घोषणा केली होती; मात्र ती कागदावरच राहिल्याची टीका नाईक यांनी केली. वांद्रे येथील जागा पडून असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. संसदेत चर्चेदरम्यान अर्थसंकल्पात दुरुस्ती करावी आणि मुंबईसाठी निधी द्यावा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
....
रखडलेले प्रकल्प आवश्यक निधी
मुंबईतील एमयूटीपी प्रकल्प-1 - एक हजार 374 कोटी
एमयूटीपी प्रकल्प-2 - एक हजार 700 कोटी
नवीन रेल्वेगाड्यांच्या खरेदीसाठी - एक हजार 751कोटी
सोलापूर-कुर्डुवाडी रेल्वे डबा कारखाना - 250 कोटी
ये रे घना ये रे घना...
माझ्या घराच्या खिडकीतून तो वाऱ्याबरोबर आत शिरतो म्हणून मी कधिचा खिडकीला प्लास्टिकचा कागद लावून ठेवला. आमच्या घराशेजारील दत्ताच्या मंदिरातही तो असाच अवचित घुसतो आणि जलाभिषेक करून जातो. दरवर्षीचा त्याचा हा नित्यक्रम. म्हणून पुजाऱ्यानेही त्या जागेवर मेन कापड लावून ठेवलेय. तू असा, साऱ्यांना त्रास देतोस खरा पण तू अगदी अवचित पावलांनी यावं आणि आमच्यासह झाडं, वेली, प्राणी अगदी सिमेंटच्या इमारतींनाही चिंब भिजवून टाकावेस असं वाटतं. म्हणूनच तुझी आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहतोय. होय अगदी अधीर झाले आहेत आम्ही तुझ्या आगमनासाठी. तू केव्हा येतोस? त्या वेध शाळेवाल्यांनी तुझ्या आगमनाची वर्दी दिलीय पण तू तुझ्या सवयीप्रमाणे त्यांना हुलकावणी दिलीसच. वेधशाळेला चकविण्यात आणि त्यांची हुर्ये उडविण्यात तुझा हातखंडाच आहे म्हणा. असो पण तुझं काय झालंय ? का रुसला आहेस ? गेले काही वर्षे अगदी मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अचानक हजर व्हायचास. आणि बेसावध असणाऱ्या नवरा, नवरीला मांडवात लग्न लागत असतानाच चिंब भिजवून काढायचा. पाऊस आला पाऊस आला म्हणत मग व्हराडाची एकच धावपळ उडायची. लोक तुझ्या नावाने बोटं मोडत. पण दुसरीकडे भीषण पाणी टंचाईने होरपळलेले असल्याने तुझ्या आगमनासरशी ते सुखावून जात. त्यांचा तो राग अगदीच लटका आणि तात्पुरता असायचा. ते तुलाही माहीत आहे. मग तू का रागावलायस ? अजून तुझा साधा शिडकावाही नाही किंवा तुझ्या येण्याची खबर देणारा वळीवाचा पाऊसही आला नाही. काय चुकले आमचे? आम्ही निसर्गावर केलेल्या आक्रमणाची शिक्षा तू आम्हाला देतोस? कदाचित तसेच असेल. आम्ही बेभान झालोय. निसर्गाच्या चक्रातील आम्ही एक़ इवलासा घटक आहोत हे विसरलो आहोत. बुद्धीच्या जोरावर निसर्गचक्रात ढवळाढवळ करून ते बिघडविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कदाचित सारे विस्कळित झाले असावे. माफ कर आम्हाला. तू खरच आता धुवाधार बरस. फार अंत पाहू नको रे आमचा. गोठ्यातील जनावरेही पाठीवर तुषारांचा शिडकावा व्हावा म्हणून आसुसली आहेत. एव्हाना "जोत' शेतात फिरत असते. शेतकरी कुटुंबासह क्षणभर विश्रांतीसाठी बांधावर बसून भाकरीचा तुकडा मोडायचा. पण हे सारे थांबलेय तुझ्यासाठी . गावातील घरांना गवताची झडी बांधून पूर्ण झाली आहे. पावसाळी जळणासाठी लागणारे सर्पन घरात भरून झालेय. शेतमळ्या स्वच्छ करून झाल्या आहेत. विहिरीचा कोरडा तळ साफ करून ठेवला आहे. तुझ्या आगमनाने काळ्या कातळाला पाझर फुटेल. विहीर काठोकाठ भरून जाईल. खरं म्हणजे एव्हाना ती भरायला हवी होती. पण तू रुसला आहेस ना. विहिरीच्या काठच वडाच भलं मोठं झाड आणि त्यावर बसणारे पक्षी चातकाप्रमाणे तुझी आळवणी करीत आहेत. त्यांची तरी किमान पर्वा कर. ंबईत तू कोसळलास की, जागो जागी पाणी तुंबत. रेल्वे रस्ते जाम होतात. अशा वेळी तुझी चीड येते. पण खरं सांगू ती तेवढ्यापुरतीच. म्हणूनच 26 जुलैच्या भयंकर प्रलयानंतरही मुंबईकर तुझी तेवढ्याच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अगदी सिमेंटच्या इमरतींही क्षणभर शिडकाव्यासाठी कासावीस झाल्या आहेत. मग कधी येतोस...
.....योगेश पवार
मान्सून आला तरी "तहान' कायम!
मान्सून आला तरी "तहान' कायम!
टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या झाली दुप्पट
योगेश पवार ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 26 : मान्सूनचा पाऊस दाखल झाला असला तरी राज्यातील पाणीटंचाईने सरकार आणि जनतेच्या नाकीनऊ आणले आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या गतवर्षाच्या तुलनेत जूनअखेरपर्यंत दुप्पट असून, या आठवड्याअखेरीस राज्यातील दोन हजार 467 गावे आणि दोन हजार 884 वाड्यांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त भागाची तहान भागविण्यासाठी हजारो टॅंकर्स युद्धपातळीवर कार्यरत असून, तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत 55 कोटी 49 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यातील मराठवाडा व कोकण विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मान्सून दाखल झाला असला तरी चालू आठवड्याच्या अखेरीस दोन हजार 467 गावे आणि दोन हजार 884 वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत या आठवड्यात 100 गावांची आणि तीन वाड्यांची भर पडली आहे. विशेषतः औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांतील 965 गावे आणि 509 वाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 530 गावे व 1043 वाड्या तहानलेल्या आहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर येथील 122 गावे, 308 वाड्या आणि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील 208 गावे, 910 वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 423 गावे आणि 24 वाड्यांत तर नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीटंचाई कमी आहे. टंचाईग्रस्त भागांना दोन हजार 119 टॅंकर व 44 बैलगाड्या अहोरात्र पाणीपुरवठा करीत आहेत.गतवर्षी 21 जूनअखेरीस एक हजार 548 गावे आणि 1036 वाड्यांमध्ये पाणीटंचाई हाती. या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाईची होरपळ वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जूनअखेरपर्यंत पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या दुप्पट झाली आहे. मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला असला तरी काही भागांत तो अद्यापही कागदावरच आहे. तलाव क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईचा आलेख वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.राज्यातील पाणीटंचाई 30 जूनअखेरपर्यंत राहील, असे गृहीत धरलेले असते; मात्र या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्याने पाणीटंचाई जुलैअखेरपर्यंत टिकण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.
.इन्फोबॉकस
पाणीपुरवठ्यासाठी झालेला खर्च (कोटीमध्ये) मराठवाडा - 12.97
अमरावती - 18.35
नागपूर - 6.27
कोकण - 5.63
नाशिक - 4.12
पुणे - 8.16
शाळेभोवती तळे साचून बच्चेकंपनीला सुट्टी!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 : सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, अशी आपल्या बोबड्या शब्दांत भोलानाथाकडे विचारणा करणाऱ्या बच्चेकंपनीच्या शाळेभोवती आज खरेच तळे साचले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सुट्टीचे गिफ्ट मिळाले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने शाळा भरल्या नाहीत. तर काही शाळा तत्काळ सोडण्यात आल्या. त्यामुळे शाळेच्या वाटेवर रस्त्यात साचलेल्या पाण्यातून दंगामस्ती करीत घराकडे जाताना विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला पुन्हा एकदा जलमय केले. दक्षिण मुंबईत जागोजागी पाणी साचले होते. वडाळा, परळ, दादर, भायखळा, माझगाव, काळाचौकी आदी भागातील रस्ते बुडाले होते. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली, तर काही ठिकाणी शाळा भरल्यानंतर त्या तत्काळ सोडण्यात आल्या. आपल्या आई-बाबांचे बोट धरून रस्त्यात तुंबलेल्या पाण्यातून घराकडे निघालेले विद्यार्थी जागोजागी दिसत होते. काही अल्लड आणि खोडकर विद्यार्थ्यांनी पाण्यातच खेळ सुरू करून धम्माल केली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत खेळणाऱ्या या विद्यार्थ्यांना पाठीवरील दप्तर आणि शाळेचा गणवेश, छत्री याचेही भान राहिले नव्हते. भोलानाथने त्यांचे आर्जव मान्य करून दिलेल्या सुट्टीचा पावसात भिजून त्यांनी मनमुराद आनंद घेतला.