Thursday, September 25, 2008

"डेस्टिनेश मार्स' हा मराठी चित्रपट राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये

योगेश पवार/सकाळ वृत्तसेवा ंमुंबई, ता. 8 : मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले असले तरी ग्रह मालिकेतील अन्य ग्रहांच्या बाबतीत त्याच्या मनातील कुतूहल सातत्याने वाढतच आहे. विशेषतः उपवर तरुण-तरुणींच्या लग्नपत्रिकेत आड येणाऱ्या मंगळ ग्रहावर सजीव सृष्टी असण्याची शक्‍यता वैज्ञानिक व्यक्त करीत असल्याने त्याबाबत अधिक उत्सुकता आहेत. मानवाला अंतराळात अन्य एखादा शेजारी शोधण्यासाठी मंगळावर आजवर वेगवेगळ्या मोहिमा आखल्या आहेत. या मोहिमांचे माहिती असणारा "डेस्टिनेश मार्स' हा मराठी चित्रपट राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखविण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थिदशेतच ग्रहांबाबतच्या "पूर्वग्रहांना' पूर्णविराम व वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळणार आहे.भारताचे चांद्रयान आजच चंद्राच्या कक्षेत पोचले आहे. शास्त्रज्ञांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे देशभरात उत्साहाची लाट पसरली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याने त्याचे स्वागत होत आहे. ग्रह आणि ताऱ्यांबाबत ज्योतिष शास्त्रातून वेगवेगळी माहिती मिळत असते. ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, असे ज्योतिष शास्त्र सांगते. त्यामुळे "मंगळ' ग्रह उपवर तरुण-तरुणींकडून नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जातो. तर "शनी'ला सततच्या टिकेचे धनी व्हावे लागते. चंद्रावरील विवरे सशाचे कान भासतात. बाल्यावस्थेपासून मिळणारी माहिती पुढे मनावर बिंबवली जाते. मंगळ ग्रहाची आणि अंतराळातील आश्‍चर्यकारक घडामोडींची माहिती "डेस्टिनेशन मार्स' सारख्या चित्रपटातून आता विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार असून ग्रह-ताऱ्यांबाबत वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेली माहिती व त्यांची गुपिते विद्यार्थ्यांपुढे उघड होणार आहेत. यातून स्फूर्ती घेऊन उद्याचा खगोलशास्त्रज्ञ निर्माण होईल."नासा'च्या मोहिमेची माहितीअमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा'ने मंगळावर आखलेल्या मोहिमेची माहिती या चित्रपटात आहे. 2018 मध्ये आखण्यात आलेल्या मोहिमेबाबत शास्त्रज्ञांचे मनोगत याद्वारे विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. हा 33 मिनिटांचा शैक्षणिक चित्रपट असून खास विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांत दाखविण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. चित्रपट दाखविण्यासाठी येणारा खर्च सादिल (शिक्षणेत्तर निधी) मधून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान सरकारच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीव- जागृती निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास राज्य शैक्षणिक गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे संचालक एस. एस. म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

No comments: