Thursday, September 25, 2008
अंधश्रद्धेला "बेस्ट' खतपाणी!
योगेश पवार ः सकाळ वृत्तसेवा ंमुंबई : आसनांसह बसच्या प्रत्येक भागावर जाहिराती झळकावून उत्पन्न मिळविणाऱ्या बेस्टने आता चक्क बसच्या तिकिटांवर "दैवी सल्ला' देणाऱ्या बुवा-बाबांच्या जाहिराती छापून उत्पन्नाचा नवा मार्ग धुंडाळण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक उपक्रम असलेल्या बेस्टने अशा जाहिरातींना मान्यता देऊन बुवा-बाबांचा उदोउदो करून एक प्रकारे अंधश्रद्धेलाच खतपाणी घातले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांवर जाहिरातींसाठी परवानगी देऊन उत्पन्न वाढविण्याचा हा मार्ग शोधला आहे. बसच्या तिकिटांवर अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती छापल्या जात आहेत. शीव ते मंत्रालय या मार्गावर धावणाऱ्या काही बसमध्ये अशा प्रकारची तिकिटे प्रवाशांना दिली गेली आहेत. तिकिटांच्या मागच्या बाजूला कथित समस्यांतून मुक्ती देणाऱ्या बाबाचे छायाचित्र आणि त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक छापण्यात आला असून त्याखाली आध्यात्मिक व दैवी सल्ला, वास्तुशास्त्र व ज्योतिष मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढती महागाई, नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेली स्पर्धा, गरिबी, निरक्षरता, ताणतणावाने ग्रासलेले लोक अशा प्रकारच्या जाहिरातींना लगेच बळी पडतात. त्यामुळे बुवा-बाबांचे उखळ पांढरे होते. सामान्य माणूस नागवला जातो. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांत सामान्य नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या हातात पडणाऱ्या अशा तिकिटांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधला असता, बेस्टच्या जाहिरातींचे कंत्राट "केपी ऍण्ड बी' या जाहिरात कंपनीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. या कंपनीने या जाहिराती प्रसिद्ध केल्या असतील, असे सांगून जबाबदारी टाळण्याचा बेस्ट प्रशासनाने प्रयत्न केला. बेस्टचे उत्पन्न वाढावे आणि तिकिटांसाठी लागणाऱ्या कागदाचा खर्च वसूल व्हावा यासाठी जाहिरातींचे कंत्राट देण्यात येते. कोणत्या जाहिराती छापाव्यात आणि कोणत्या छापू नयेत, यासाठीही काही नियम आहेत. वास्तुशास्त्र किंवा ज्योतिष मार्गदर्शनाच्या जाहिराती छापण्यात काही गैर नाही, असे बेस्टचे म्हणणे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment