Thursday, September 25, 2008
क्रौर्यावर माणुसकीचा विजय! धुळे दंगल
मुंबई, ता. 8 : अफवांचे लोण त्यांच्या गावात हा हा म्हणता पसरले आणि गेली अनेक वर्षे सलोख्याने राहणाऱ्या दोन्ही समाजाचा तोल ढळला... सूडाच्या भावनेने ते पेटून उठले खरे; परंतु जेव्हा गाव सोडून जाणाऱ्या मुस्लिम समाजावर हल्ला करण्यासाठी सुमारे पाचशे समाजकंटक चालून आले, तेव्हा छातीचा कोट करून हिंदू समाजातीलच गावचे धुरीण हल्लेखोरांना सामोरे गेले व त्यांना परतवून लावले. त्यामुळे 80 कुटुंबांचे प्राण वाचले. माणुसकीने क्रौर्यावर विजय मिळविला आणि दोन्ही समाजातील लोकांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. ही कथा आहे धुळे जिल्ह्यातील जातीय दंगलीत होरपळलेल्या न्याहळोद या गावाची. येथे झालेल्या जाळपोळीमुळे गावातून परागंदा झालेल्या अशफाक खाटीक याने "सकाळ'ला ही माहिती दिली. धुळे शहरापासून 20 कि. मी. अंतरावर असणाऱ्या न्याहळोद या गावात हिंदू- मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे 12 हजार आहे. आजवर कोणत्याही जातीय झगड्याला आमचे गाव बळी पडले नव्हते; मात्र मंगळवारी धुळ्यातील दंगलीनंतर आलेल्या अफवेने साऱ्यांचा घात केला. सूडाच्या भावनेने साऱ्यांचीच माथी भडकली. गावात जाळपोळ सुरू झाली. गावातील काही मुस्लिम कुटुंबे आधीच गाव सोडून निघून गेली. उर्वरित लोकही आपल्या बायका-मुलांसह गाव सोडून निघाले होते. तेवढ्यात सुमारे पाचशे जणांचा जमाव त्यांच्यावर चालून आला. हा जमाव त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना गावातील अरविंद पवार (जिल्हा परिषद सदस्य), रामभाऊ माडी, पुंडलिक कोडी, प्रकाश वाघ, राजू भवसार, अर्जुन कोडी आदी पुढे आले व त्यांनी "त्यांना मारण्याआधी प्रथम तुम्हाला आमचा जीव घ्यावा लागेल', अशी ललकारी देऊन छातीचा कोट करून समोर उभे राहिले. त्यांच्या या पवित्र्यामुळे हल्लेखोरांना अखेर माघार घ्यावी लागली, असे अशफाक यांनी सांगितले. अशफाक हा लोकभारतीचा जिल्हा संघटक आहे. न्याहळोद गावातील उमदा कार्यकर्ता आहे; मात्र या जातीय दंगलीमुळे त्याला त्याच्याच गावातून परागंदा व्हावे लागले असले, तरी गावाबद्दलचा आदर कायम आहे. "आमच्या गावातील लोक मुळात असे हिंसाखोर नाहीत; मात्र उलटसुलट पसरलेल्या अफवांनी दोन्ही समाजांचा घात केल्याने सारे चित्र पालटले, असे सांगताना अशफाकचा हुंदका आवरत नव्हता. धुळ्याच्या दंगलीबाबत जिल्ह्यातील गावागावांत पसरलेल्या अफवांनीच येथील सामाजिक सौहार्द नष्ट केले आहे. न्याहळोदप्रमाणेच उजेर, कुसुंबा, मुफ्ती, ऊयणे, वार, कुंडाने बिलाडी, चिमठाणे यांसारखी अनेक गावे अशीच अफवांना बळी पडली असून, दोन्ही समाजातील हजारो लोकांना आपले गाव, घर सोडून अन्यत्र परागंदा व्हावे लागले आहे. -----------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment