मुंबई, ता. 26 : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या ज्वलंत विषयावर आधारित "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या मराठी चित्रपटाचा खास शो राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासाठी मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी कुटुंबीयांसह हा चित्रपट पाहिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रपटात उभे करण्यात आलेले दाहक चित्र पाहून क्षणभर राष्ट्रपतीही हेलावल्या.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी देवीसिंह शेखावत उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीयांनी राष्ट्रपतींशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राष्ट्रपती भवनाची पाहणी करून स्नेहभोजन केले. सायंकाळी राष्ट्रपतींसाठी "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपतींसह, उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस, उद्धव यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर आणि चित्रपटातील कलावंत मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले यावेळी उपस्थित होते.
"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटातील शेतकऱ्यांची कथा पाहून राष्ट्रपती आणि उद्धव ठाकरेही क्षणभर हेलावले. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर अधिक लक्ष देण्याची गरज राष्ट्रपतींनी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केली, असे चित्रपटातील कलावंतांनी सांगितले.
........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment