Tuesday, August 25, 2009

मंदीतही 80 हजार लोकांना मिळाल्या नोकऱ्या

मुंबई, ता. 21 : जागतिक मंदीचा फटका बसल्याने गेल्या वर्षभरात खासगी क्षेत्रातील हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत; मात्र राज्यातील सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांतील रिक्त जागांवर झालेल्या नोकरभरतीमुळे गेल्या दहा महिन्यांत 80 हजार 415 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, तर ऑक्‍टोबर महिन्यात आणखी तीन हजार जणांना नोकऱ्या मिळणार आहेत. खासगी बॅंकांतही हजारो पदे भरली जाणार आहेत. आर्थिक वर्षाच्या सहामाहीपूर्वीच आर्थिक मंदीचे सावट दूर होत असल्याने आश्‍वासक वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक स्तरावर आलेल्या वित्तीय संकटामुळे भारतातही अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला होता. मंदीच्या तडाख्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. विशेषतः खासगी सेवाक्षेत्राला मंदीचा तडाखा बसला. मंदी सुमारे दोन वर्षे टिकेल असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता.
राज्यात मात्र मंदीतही सप्टेंबर 2008 ते जून 2009 अखेरपर्यंत प्रथम, द्वितीय आणि तृतीय व चतुर्थ श्रेणीतील हजारो रिक्त पदे जाहिरातींच्या माध्यमातून भरण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेतील विविध वर्गांतील 36 हजार 334 पदांचा समावेश आहे. मंदी असली तरी सरकारने मात्र रिक्त पदांवरील नोकरभरती सुरू ठेवली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि न्यायालयीन खटले निकाली निघाल्यानंतर अनेक जागा भरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चालू महिन्यातही शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील सुमारे तीन हजार रिक्त जागांवर नोकरभरती होत असून याबाबतच्या जाहिराती गेल्या दोन महिन्यांत वाढल्या आहेत. म्हाडा, मुंबई पोलिस आयुक्तालय, एस. टी. महामंडळ, समाजकल्याण संचालनालय, अन्ननागरी पुरवठा विभाग, सहकार आणि पणन व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई महानगरपालिका, राज्य शिक्षण संचालनालय, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल, नाशिक आदिवासी विभाग, भारतीय खाद्य महामंडळ आणि शासनाच्या कृषी विभागातील विविध पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे.

मंदीच्या छायेखाली असलेल्या बॅंका आणि वित्तीय संस्थांतही नोकरभरती सुरू झाली असून स्टेट बॅंकेत 11 हजार पदे भरली जाणार आहेत. बॅंक ऑफ इंडिया आणि एस. बी. आय. बॅंकेतही भरती होणार आहे. मंदीचे सावट दूर होत असल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.
...........

No comments: