Friday, August 28, 2009

रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्थापन

रिपब्लिकन ऐक्‍यासह 20 पक्षांची मोट; 288 जागा लढविणार


मुंबई, ता. 24 : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना - भाजपला टक्कर देण्यासाठी डावे पक्ष आणि रिपब्लिकन ऐक्‍यात सामील सर्व गटांसह सुमारे 20 पक्षांची मोट बांधून "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती' नावाची जंबो आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीत आज आमदार कपिल पाटील, अबू आझमी सहभागी झाले. विधानसभेच्या 288 जागा लढविण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी बैठकीत घेतला. मात्र जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

दुष्काळ, महागाई, भारनियमन, दलित अत्याचार, सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी हे निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहतील, असे आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले. जागावाटपाबाबत मात्र आजच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीत "रिपब्लिकन ऐक्‍य' कायमस्वरूपी राहील, अशी ग्वाही माजी खासदार रामदास आठवले यांनी दिली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आपल्याशी संपर्क साधत असले, तरी आपण मात्र त्यांच्या संपर्कात नाही. आपण कोणत्याही स्थितीत कॉंग्रेससोबत जाणार नाही. निवडणुकीत "रिपब्लिकन'ची ताकद कॉंग्रेसला दाखवून देऊ, असे आठवले यांनी सांगितले. सत्ताधारी भ्रष्टाचारी झाले आहेत, विरोधी पक्षाचा त्यांच्यावर अंकुश नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला तिसरी आघाडी हा सक्षम पर्याय असेल, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले; तर अबू आझमी यांनी ही समिती राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

रिपब्लिकनचा पगडा
तिसऱ्या आघाडीवर रिपब्लिकन पक्षाचा पगडा आहे. आघाडीच्या नावात रिपब्लिकनचा समावेश करण्याचा आग्रह नेत्यांनी धरला. त्यामुळे आघाडीचे नाव बदलण्यात आले. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाने जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरला आहे. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री हा रिपब्लिकनचा असेल, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. रामदास आठवले आणि डॉ. गवई दोघांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छाही प्रदर्शित केली.

...तरच आंबेडकरांना घेऊ
ऍड्‌. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्‍यात सामील झाल्याशिवाय त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून तिसऱ्या आघाडीत प्रवेश दिला जाणार नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले. डाव्या नेत्यांनी त्यांना आघाडीत घेतल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकी आठवले यांनी दिल्याने नेत्यांनी ही भूमिका घेतल्याचे कळते. दरम्यान, राज्यातील आघाडी सरकारमधील राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांच्या राजीनाम्याबाबत मात्र आठवले यांनी टोलवाटोलवीलीची उत्तरे दिली.
आघाडीत आमदार हितेंद्र ठाकूर यांना घेण्याची डाव्या नेत्यांची इच्छा होती; मात्र आमदार कपिल पाटील, डॉ. कुमार सप्तर्षी व राजू शेट्टी यांनी ठाकूर यांच्या समावेशास विरोध केला.

(चौकट)
संयुक्त मेळावा सप्टेंबरमध्ये
येत्या 12 सप्टेंबर रोजी तिसऱ्या आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येईल.

(चौकट)
आघाडीतील घटक पक्ष
शेकाप, माकप, भाकप, रिपब्लिकन ऐक्‍य, जनता दल सेक्‍युलर, समाजवादी जनपरिषद, समाजवादी पक्ष, सोशालिस्ट फ्रंट, लोकभारती, राष्ट्रीय समाज पक्ष, लोक संघर्ष मोर्चा, लोक राजनीती मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष.

No comments: