Tuesday, August 18, 2009

स्वाइन फ्लूचा राजकीय पक्षांनाही दणका


मुंबई, ता. 14 : पुण्या- मुंबईसह राज्यातील काही भागात थैमान घालणाऱ्या स्वाइन फ्लूचा राजकीय पक्षांनाही दणका बसला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या धास्तीने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपला राज्यव्यापी दौरा रद्द केला आहे, तर भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, बहुजन समाज पक्षाने जाहीर मेळावे, सभा, संमेलने यांना फाटा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वाइन फ्लूची आपत्ती निर्माण झाल्याने निवडणूकपूर्व प्रचारात मरगळ आली आहे.स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढत असल्याने साऱ्यांचीच पाचावर धारण बसली आहे. या रोगाची साथ रोखण्यासाठी सध्या सर्वच पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना दहीहंड्या रद्द कराव्या लागल्या. या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आणि आपला प्रचार दणक्‍यात करण्याची नामी संधी अनेक राजकीय नेत्यांना आणि विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांना गमवावी लागली. गणेशोत्सवावरही या साथीचे सावट राहण्याची शक्‍यता असल्याने सारेच धास्तावले आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या तालुका पातळीपर्यंत सभा, बैठका सुरू झाल्या आहेत. प्रमुख नेतेही राज्याच्या दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत; मात्र पुण्या-मुंबईतून येणारे कार्यकर्ते व नेत्यांच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत साथीचे लोण पसरण्याची शक्‍यता असल्याने राजकीय पक्षांनी जाहीर मेळावे, सभा घेण्याचे टाळून कार्यकर्त्यांच्या बैठका आणि घरोघरी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपला 16 ऑगस्टपासून सुरू होणारा दौरा रद्द केला आहे. मुंबईतले अनेक कार्यक्रमही रद्द केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कार्यकर्त्यांना सभा, संमेलने, मेळावे न घेण्याचे आवाहन केले आहे, असे प्रवक्ते मदन बाफना यांनी सांगितले. भाजपनेही जाहीर मेळावे, सभांना फाटा दिला आहे. गर्दीच्या माध्यमातून स्वाइन फ्लूचा फैलाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाइन फ्लूबाबत जनजागृतीची मोहीम पक्षाच्या "डॉक्‍टर्स सेल'मार्फत हाती घेण्यात आल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. बहुजन समाज पक्षानेही पुणे, मुंबई आणि राज्याच्या अन्य भागांतील आपले मेळावे रद्द केले असल्याचे बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले.-

---------------------

No comments: